बारीपाड्याची यशोगाथा तशी सुपरिचित. पण, ती समाजासमोर येण्यासाठी चैत्राम पवार व ग्रामस्थांना अनेक कष्ट उपसावे लागले. त्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रगतिशील मानसिकतेची कहाणी...
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून २५ किमी अंतरावर वसलेले बारीपाडा हे सुमारे ८०० लोकवस्तीचे गाव. माणसाने निसर्गाशी मैत्री केली, तर त्याच्यातील उणिवा कायमच्या दूर होऊ शकतात, हे बारीपाड्याने सिद्ध केले. एकेकाळी पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेला बारीपाडा आज आजूबाजूच्या पाच गावांना पिण्याचे पाणी पुरवतो. हे खरं तर ग्रामस्थांच्या संघटित प्रयत्नांचे फळच. ज्या गावात पूर्वी केवळ १५ हेक्टर जमीन शेतीयोग्य होती, त्या गावात आज १२० हेक्टर जमिनीवर तीन चक्रीय शेती केली जाते. कांदा, डाळी, स्ट्रॉबेरी या नगदी पिकांमधून मिळणार्या उत्पन्नामुळे आता या गावातील वनवासी कुटुंबांची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू असून, वर्षभरासाठी लागणारे अन्नधान्य घरात उपलब्ध आहे. बदलाची ही कहाणी त्याच गावातील वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या चैत्राम देवचंद पवार यांनी लिहिलेली.
आपल्या मुलांनी खूप शिकावे, मोठे व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. चैत्राम यांचे ज्येष्ठ बंधू पाटबंधारे विभागात नोकरी करतात, तर लहान बंधू शेती करतात. चैत्राम यांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यामुळे ते गावातील सर्वाधिक शिक्षण घेतलेले व्यक्ती झाले. बारीपाड्याची प्रेरणा घेऊन वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ४० गावांना ११ हजार, २०० हेक्टर वनक्षेत्र ग्रामसभेला मिळाले. बारीपाडा आणि परिसर मिळून सामुदायिक वन अधिकार २००६च्या कायद्यानुसार मिळाले, ज्याने या गावासाठी समृद्धीचे दरवाजे उघडले. एवढेच नाही तर या गावाला २००३ मध्ये कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी, भारत जैवविविधता पुरस्कार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पुरस्कारांसह इतर ३३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
८०च्या दशकाबद्दल सांगायचे झाले, तर कोकणी आणि भिल्ल जमातींच्या या गावात दिवाळीनंतर पाणी संपायचे. त्यावेळी बारीपाड्यात दोनच विहिरी होत्या. त्या डिसेंबरपर्यंत पूर्णपणे कोरड्या पडायच्या. नाईलाजास्तव ग्रामस्थांवर सहा महिने रोजगाराच्या शोधात स्थलांतराची वेळ यायची. गावात राहूनही एकट्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नव्हता. लाकूड तोडणे किंवा महुचे मद्य बनविणे व त्याची विक्री करणे, हे अवैध धंदे त्यांच्या उत्पन्नाचे एकमात्र साधन होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता.
पण, कालांतराने विकासाचे पीक विनाशाच्या भूमीवर उगवत नाही, हे पवार आणि डॉ. आनंद यांच्याशिवाय कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सततच्या संवादातून गावकर्यांना पटवून देण्यात यशस्वी झाले तेव्हा हा बदल घडला. मग वनवासींनी जंगलाला आपला मित्र बनवले आणि ओसाड होणारी वनसंपदा वाचवण्यासाठी वनविभागाच्या सोबत पाऊल टाकून चालू लागले. ते सांगतात की, “गावातील वृद्ध लोकांनी आळीपाळीने वनरक्षकाची जबाबदारी घेतली. बेकायदेशीर वृक्षतोड थांबवण्यासाठी, गावातील लोकांनी लाकूड तोडणार्यांची आणि बैलगाडीतून डोक्यावर घेऊन जाणार्यांची व्यवस्था केली. ज्यांनी ओले लाकूड तोडले, त्यांच्याकडून वेगवेगळे दंड घोषित करून वसूल करण्यास सुरुवात केली. ही तर सुरुवात होती, त्यानंतर या पाड्यावरील लोकांनी मागे वळून पाहिले नाही.”
आता गावात पाणी आणण्याची गरज होती. वनविभागाच्या मदतीने वनवासी बांधवांनी स्वत: श्रमदान करून गावकर्यांनी ४८० छोटे दगडी बांध बांधले. त्यामुळे आज गावात ४० विहिरी आहेत, ज्यांना वर्षभर पाणी असते. एवढेच नाही, तर गाव समितीने प्रत्येक मुलाला शिक्षण अनिवार्य केले. ज्या कुटुंबांनी मुलांना शाळेत पाठवलं नाही, त्यांच्याकडून होणारा दंड टाळण्यासाठी मुलं नियमित शाळेत जाऊ लागली.
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांचे १५ बचतगट तयार करण्यात आले. ज्यांना तीन गावांची जोड आहे. गावातील तलावात मत्स्यपालन सुरू केले. बारीपाडा येथील प्रसिद्ध तांदूळ बाजारात आणण्यासाठी ‘फार्मर प्रोड्युसर’ कंपनीची स्थापना करण्यात आली, ज्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून दोन कोटी, एक लाख रुपये मंजूर झाले. ही कंपनी तांदूळ आजूबाजूच्या जिल्ह्यांना पुरवते. ज्या गावात लोक चौथीही उत्तीर्ण झाले नाहीत, त्या गावात सुनील पवार, अभिमत पवार यांसारखे तरुण शिक्षण पूर्ण करून सरकारी शाळेत शिक्षक आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला बारीपाड्याचा ‘वनभाजी महोत्सव’ हा ज्ञानाचे पिढ्यान्पिढ्या हस्तांतरणाचे अनोखे उदाहरणच. जंगलात पिकवलेल्या भाज्यांच्या पाककला स्पर्धेत सहभागी होणार्या महिलांना भाजीचे औषधी गुणधर्मही समजावून सांगावे लागतात. पवार जेव्हा गावकर्यांना ‘तुम्ही करोडो रुपयांचे मालक आहात’ असे सांगतात, तेव्हा ऐकून आश्चर्य वाटत असले तरी गावकर्यांनी पुनरुज्जीवित केलेल्या बारीपाड्याच्या या अवाढव्य जंगलातील वनसंपत्तीची किंमतच तितकी आहे. येथे शेकडो सागवान लाकडाची झाडे आहेत. वनविभागाने सागवान लाकूड तोडण्यावर बंदी घातली असली तरी भविष्यात जेव्हा सागवान लाकूड वापरले जाईल, तेव्हा, बारीपाडा येथील रहिवाशांना त्यातून मिळणार्या रकमेपैकी निम्मी रक्कम मिळणार आहे. चैत्राम पवार यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
गौरव परदेशी