मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी भाष्य करत केवळ पुरस्कार देऊन चालणार नाही त्यांना कामही मिळायला हवं असं मत मांडलं आहे. निवेदिता यांनी सौमित्र पोटे याच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
निवेदिता म्हणाल्या की, “ज्येष्ठ अभिनेत्रींना केवळ पुरस्कार देऊन चालणार नाही तर त्यांना कामं देखील मिळाली पाहिजे. तुम्ही वहिदा रेहमान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं, पण एवढ्यावरच ते थांबायला नको. त्यांना चित्रपटात भूमिका मिळायला हव्यात. त्यांना केवळ एक पुरस्कार देऊन कोपऱ्यात बसवून ठेवणं योग्य नाही.” याबरोबरच निवेदिता यांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. नाटक आणि रंगभूमीसाठी नेमके कोणते बदल घडणं अपेक्षित आहे यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.