रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणार्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी राहिली पाहिजे, असा जणू काही नकळत अट्टहास करत योगेश सोमण त्यांच्या प्रत्येक कलाकृती घडवत असतात. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीही यश मिळवले. याव्यतिरिक्त ‘आनंदडोह’ या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील एकपात्री नाट्य प्रयोगातून त्यांनी आगळावेगळा विक्रम केला आहेच. पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांच्या ‘आतुर’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने योगेश सोमण यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..
शिवाजी लोटण पाटील यांच्यासोबत काम करणे म्हणजे....
आजवर विविधांगी भूमिका साकारत कायमच प्रेक्षकांना अचंबित करणारे चतुरस्त्र अभिनेते योगेश सोमण दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांच्या आगामी ‘आतुर’ या चित्रपटात आगळीवेगळी भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना योगेश सोमण म्हणाले की, कथानक आणि चित्रपट माझ्यापर्यंत आला त्याहीपेक्षा जास्त मला शिवाजी लोटण पाटील यांच्यासोबत चित्रपट करायचा होता. या चित्रपटात ज्यापद्धतीने रंगभूमीवर काम करत असताना अभिनय करत रंगभूमीवर रंगभूमीलाच दाखवायचे असते. तसेच, चित्रपटातील माझ्या भूमिकेचे एक वैशिष्ट्य असे आहे. ज्यात मी प्रेक्षकांसाठी एक अभिनय करत आहे आणि चित्रपटातील माझ्या वास्तव जीवनात मी वेगळा अभिनय करत आहे. खरं तर हे माझ्यासाठी एक आवाहनचहोतं. परंतु ती भूमिका पार पाडताना आनंद आणि समाधान एक कलाकार म्हणून नक्कीच होत होता.
मराठी चित्रपट मागे पडण्यासाठी काही अंशी प्रेक्षक जबाबदार!
दाक्षिणात्य चित्रपटांनी कोरोना काळानंतर सर्व परिसीमा ओलांडत जगभरातील प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांची भुरळ घातली. मात्र, या शर्यतीत गेली काही वर्षं मराठी चित्रपट मागे पडलेले दिसतात. याबद्दल आपली भूमिका मांडताना योगेश सोमण म्हणतात की, “या परिस्थितीला काही अंशी प्रेक्षकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. इतर प्रादेशिक चित्रपट आणि मराठी चित्रपट यांच्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे मराठी प्रेक्षक बहुसंख्येने हिंदी चित्रपटही बघतो. जसे दाक्षिणात्य प्रेक्षक इतर भाषिक चित्रपटदेखील पाहात असले तरी त्यांचे प्राधान्य हे त्यांच्या चित्रपटांना अधिक असते. तसेच, मराठी प्रेक्षकांच्या बाबतीतला एकोपा दिसून येत नाही आणि परिणामी मराठी चित्रपट मागे पडतात. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहता, आशय आणि विषयांच्या बाबतीत आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिग्गज दिग्दर्शक, कलाकारांनी दिले आहेत. अतिशय गंभीरपणे चित्रपट करणार्या दिग्दर्शक आणि कलावंतांच्या पिढ्यान्पिढ्या याच महाराष्ट्रात घडल्या आहेत. पण, बॉलीवूड आपल्याला अधिक जवळचे वाटते हेदेखील तितकेच स्वच्छ सत्य आहे.”
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘सिक्वेल’ येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मागणी...
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात एकेकाळी अधिराज्य गाजवणार्या हिंदी चित्रपटसृष्टीला अर्थात आजच्या काळातील बॉलीवूडला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने आशय आणि विषयांच्या बाबतीत मागे टाकलेले दिसून येते. याचा परिणाम म्हणजे हिंदीत सद्यःस्थितीला केवळ काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे दुसरे, तिसरे भाग प्रदर्शित होतात. याबद्दल अधिक बोलताना योगेश सोमण म्हणाले की, “चित्रपटांचे पुढचे भाग (सिक्वेल) येत आहेत. कारण, त्यांना पसंती, प्रसिद्धी आणि मागणी आहे. शेवटी चित्रपट हा व्यवसाय आहे आणि जो विषय प्रेक्षकांना आवडेल तोच बॉक्स ऑफिसवर कमाई करेल आणि आर्थिक गणित या क्षेत्राचं चालेल, हा एक भाग आहेच. परंतु, चांगल्या लेखक आणि दिग्दर्शकांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे ‘सिक्वेल्स’ येत आहेत, असे याचे कारण नसून जो विषय चालत आहे, त्याच विषयावर आधारित चित्रपट अधिक तयार केले जात आहेत.”
प्रोडक्शन हाऊसमुळे मराठी चित्रपटांना बळकटी मिळेल
मराठी चित्रपटसृष्टी आशयाने जरी श्रीमंत असेल तरी आर्थिक बाजू ही कमकुवत आहेच. याबद्दल सोमण म्हणतात की, “मराठी चित्रपटसृष्टीत आर्थिक चणचण हा विषय खरं तर गेली अनेक वर्षं प्रलंबित आहेच. कारण, निर्माते पैसे एखाद्या चित्रपटासाठी लावताना त्यानंतर त्यांना नफा किती होणार, याचा व्यावहारिकपणे विचार करतातच. अलीकडच्या काळात कमीत कमी बजेटचा चित्रपटदेखील एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत जातो. अनेकजण मराठी चित्रपटांच्या प्रेमाखातर पैसे गुंतवतात. पण, तरीही नफा हा पाहिलाच जातो. परंतु, चित्रपटगृहांतून जर का एखाद्या चित्रपटाची कमाई अपेक्षितपणे नाही झाली, तर सध्या निर्मात्यांकडे ‘ओटीटी’ हे उत्तम शस्त्र हाती लागले आहे. त्यामुळे ‘ओटीटी’ वाहिनीवरील मराठी आशयनिर्मिती प्रदर्शित करून प्रेक्षकांपर्यंत उत्तम कलाकृती मिळत निर्मात्यांची आर्थिक बाजू देखील सक्षम होण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे, मराठीतील आशयाला मरण नाही. त्यामुळे दर्जेदार चित्रपट हे तयार होतच राहणार, पण या सगळ्याच्या साथीला इतर चित्रपटसृष्टीत जसे प्रोडक्शन हाऊस आहेत, तशी साथ जर का मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शकांच्या हाती लागली तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो,” असे मतदेखील यावेळी योगश सोमण यांनी मांडले. “प्रोडक्शन हाऊसच्या मदतीने व्यावयायिक रुप जर का अधिक भरभक्कमपणे चित्रपटसृष्टीला लाभले, तर मराठी चित्रपटही अधिक मोठा होऊ शकतो,” असा विश्वासदेखील यावेळी सोमण यांनी व्यक्त केला.
‘ओटीटी’ वाहिन्यांवरील दर्जेदार विषयांची मागणी मराठी पूर्ण करेल
‘ओटीटी’ वाहिनीवर त्याच विषयांना उगाळून प्रेक्षकांसोमर कलाकृती मांडत असल्यामुळे हळूहळू प्रेक्षकदेखील फार सजग होत नव्या आशयांकडे वळत आहेत. ‘ओटीटी’च्या वाढत्या प्रभावाबद्दल सोमण यांनी आपले मत मांडले आहे. “मला असं वाटतं की, आता तीन-चार वर्षांत ‘ओटीटी’चे आभाळ अधिक वाढत चालले आहे. त्यामुळे जसं चित्रपटगृहात जाऊन किती टक्के प्रेक्षक चित्रपट पाहतात आणि कोणत्या प्रकारचे पाहतात. तसेच, काहीसे गणित हे ‘ओटीटी’च्या बाबतीतदेखील असते. माणसांची मनोरंजनाची भूक खूप वाढली आहे. प्रेक्षकांना निराळ्या भाषेतील आशय पाहण्याची चुणूक लागली आहे. हिंदीतील काही ठरावीक विषयांवर आधारित वेब मालिकांचा अथवा चित्रपटांचा आता प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. सुरुवातीच्या काळात ज्या पद्धतीची हिंसा किंवा कंटेन्ट ‘ओटीटी’ वाहिनीवरील काही वेबमालिका किंवा चित्रपटांत दाखवला जात होता, त्याचा आता प्रेक्षकांना कंटाळा आला असून आता या पलीकडील विषय पाहण्याची इच्छा प्रेक्षकांना आहे आणि त्यांची ही इच्छा मराठी भाषेतील प्रत्येक कलाकृती पूर्ण करू शकते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर किंवा अन्य महापुरुष, ऐतिहासिक व्यक्ती यांचे जीवन हे अडीच-तीन तासांत दाखवलेच जाऊ शकत नाहीत. कोणताही बायोपिक किंवा चित्रपट तयार करताना घेतलेलेस्वातंत्र्य हे हानिकारक असते. त्यामुळे बायोपिक करताना घडलेल्या इतिहासाला धरून आणि उपयुक्त दस्तऐवजांचा वापरच अधिक झाला पाहिजे, या विचारांचा मी असून वीर सावरकरांच्या या वेबमालिकेत मी चित्रपट तयार करतानाचे कोणतेही स्वातंत्र्य घेतले नाही,” असेदेखील योगेश सोमण यांनी ठामपणे सांगितले.
आजच्या पिढीने माहिती आणि ज्ञान यातला फरक समजून घ्यावा
“तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणामुळे आजची तरुण पिढी ही फारच जलद झाली आहे. त्यांना जगाच्या पाठीवरील प्रत्येक गोष्टींबद्दल इत्थंभूत माहिती मिळत असते. परंतु, त्यांना मिळणारी माहिती आणि त्यातून ते समजत असलेले ज्ञान यातला त्यांनी फरक जाणून घ्यावा,” असा मोलाचा सल्ला यावेळी योगेश सोमण यांनी दिला. “आजच्या पिढीला माहिती सर्व स्तरांतून फार कमी वेळात मिळते आणि त्याचा अर्थदेखील त्यांना लगेचच समजतो, पण ते ज्ञान नाही असं माझं मत आहे. आजच्या तरुण पिढीचे वाचनदेखील तितकेच दांडगे आहे. पण, त्यांनी वाचलेल्या गोष्टींचं त्यांची व्यक्त होण्याची साधन फार वेगळी आहेत. भलेही त्यांनी व्यक्त होण्यासाठी कोणत्याही माध्यमाची, व्यक्तींची निवड केली असली, तरी निर्भिडपणे व्यक्त होणं सोडलं नाही पाहिजे. पण, व्यक्त होणं म्हणजे प्रस्थापितांना शिव्या घालणं नव्हे. तसेच, सर्व विचारसरणींचा अभ्यास करून आपली विचारसरणी ठरवावी आणि मग त्यावर भाष्य करावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर नेमंक कोणत्या क्षेत्रात करावं हेदेखील वेळीच ठरवलं, तर पुढचं आयुष्य सुखकर होण्यास अधिक मदत होईल,” असा मोलाचा सल्ला यावेळी योगेश सोमण यांनी नव्या पिढीला दिला.
रसिका शिंदे-पॉल