व्यसनाच्या चक्रव्यूहातून स्वत: बाहेर पडून हजारो तरुणांना ‘स्माईल’ या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रकाशमार्ग दाखवणार्या हर्षल पंडितचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास...
व्यसनाच्या विळख्यात अडकलेली व्यक्ती त्यात आणखीनच गुरफटत जाते. मात्र, व्यसनाच्या या दुष्टचक्रातून स्वतः बाहेर पडल्यावर न थांबता, हर्षल पंडितने तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. गेली काही वर्षे हर्षलने स्वतःचे आयुष्य व्यसनमुक्तीच्या या उदात्त कार्यासाठी समर्पित केले आहे. अवघ्या दोन रुग्णांपासून सुरू झालेला हर्षलचा हा व्यसनमुक्तीचा ध्यास आज हजारो तरुणांपर्यंत पोहोचला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या हर्षलच्या घरी तसे धार्मिक वातावरण. त्यामुळे हर्षललाही धर्माबद्दल प्रचंड आस्था. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही हर्षलने बर्यापैकी गुणांनी उत्तीर्ण केले. पुढे धुळ्याला शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर तेथे मात्र हर्षलला व्यसनाची सवय जडली. शिक्षणासाठी मिळणारे पैसे हर्षल या व्यसनात उधळू लागला. परिणामी, शिक्षणाला पैसे कमी पडू लागले. अभ्यासाकडेही काहीसे दुर्लक्ष झाले. हाताशी पैसे हवे म्हणून हर्षलने इंजिनिअरिंगच्या चित्रांच्या विक्रीस सुरुवात केली. त्यानंतर पदरी चार पैसे पडले खरे. मात्र, व्यसनाने आयुष्यच पोखरल्यामुळे हर्षलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दारूच्या व्यसनामुळे हर्षलचा आत्मविश्वासदेखील खालावला. यादरम्यान नोकरीतही सातत्य नसल्याने हर्षलचे कुटुंबीयही अस्वस्थ होते.
अखेर हर्षलच्या वडिलांनी त्याला थेट व्यसनमुक्ती केंद्राचा रस्ता दाखवला. तेथेही व्यसनाच्या नशेचे पाश तोडण्यासाठी हर्षलला साहजिकच काही कालावधी लागला. हळूहळू हर्षलचे मतपरिवर्तन, विचारपरिवर्तन होऊ लागले. व्यसनामुळे उजाड झालेला संसार, वैचारिक व शारीरिक हेळसांड, यांमुळे आपण आयुष्यात काय गमावले, याचा हर्षलने विचार केला. एवढेच नाही तर व्यसनमुक्ती केंद्राच्या कामांत हर्षल हिरिरीने पुढाकार घेऊ लागला. व्यसनमुक्ती केंद्रातील यशस्वी उपचारांनंतर चार वर्षांनी हर्षलची कुटुंबीयांशी भेट झाली.
पण, या चार वर्षांत हर्षलमध्ये झालेला आमूलाग्र बदल त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांसाठीही हर्षोल्हासाचा क्षण ठरला. व्यसनमुक्ती केंद्रातून यशस्वीरित्या उपचार घेऊन बाहेर पडलेल्या हर्षलला चांगली नोकरी अथवा व्यवसाय करण्याचे अनेकांनी सल्ले दिले. पण, हर्षलने नोकरी-व्यवसायापेक्षा व्यसनमुक्तीसाठी स्वतःला झोकून देण्याचा संकल्प केला आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यासाठी दिवसरात्र झटून काम केले. साधारण २००८ सालापासूनच व्यसनमुक्तीसंदर्भात मार्गदर्शनाचे काम हर्षलने हाती घेतले. तरूण वयातील आणि विशेषत्वाने ताणतणावाखाली जगणार्यांची पावले व्यसनमार्गापासून वेळीच रोखली, तर पुढील सर्व प्रकारचा त्रास कमी होईल, याची हर्षलला खात्री पटली. त्यासाठी व्यसनात गुरफुटलेल्या तरुणांशी त्याने चर्चा केली. प्रारंभी केवळ दोन ते तीन तरूण हर्षलशी याविषयी संवाद साधण्यात स्वारस्य दाखवायचे.
मात्र, हळूहळू समुपदेशनासाठी हर्षलकडे येणार्या व्यसनाधीनांची संख्या वाढत गेली. आजतागायत जवळपास २५ हजार तरुणांशी संवाद साधून त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्यात हर्षलला यश आले आहे. २०१४ साली हर्षलने ‘कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. त्यातून धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, सातारा यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतही व्यसनमुक्ती शिबिरे आयोजित केली. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये, कंपन्यांमधून व्यसनमुक्तीचे हर्षल धडे देऊ लागला. पुढे पुणे पोलीस व महानगरपालिकेच्यावतीने जनजागृती करण्याचे निमंत्रणही हर्षलला आले. या माध्यमातून अनेक तरुणांशी व रुग्णांशी हर्षलला संवाद साधता आला. हळूहळू त्याच्या कामाचे स्वरूप आणि व्याप्तीदेखील वाढत केली. या कामाला पुढे एक वेगळी ओळख, उंची प्राप्त व्हावी, म्हणून २०२१ साली ‘स्माईल व्यसनमुक्ती केंद्रा’ची हर्षलने मुहूर्तमेढ रोवली.
केंद्रासाठी मावळ येथे जागाही हर्षलने निश्चित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सुरू झालेल्या या व्यसनमुक्ती केंद्रात हजारो रुग्णांना व्यसनापासून वंचित करण्यास मदत झाली. मानसशास्त्राच्या आधारे आणि सुसंवादातून व्यसनमुक्तीची ही वाटचाल गतिवान झाली. या केंद्रात सध्या अनुभवी, तज्ज्ञ मार्गदर्शक, डॉक्टरांसह असंख्य कार्यकर्ते जोडले गेले आहेत. राज्यातील विविध ठिकाणांहून आजही हर्षलला अनेक फोन येतात व हर्षल मदतीसाठी धावूनही जातो. पुढे जाऊन सायकल रॅली, जनजागृती फेरी, पथनाट्य या माध्यमांतून व्यसनमुक्तीची मोहीम हर्षलने यशस्वीपणे राबविली.
दरवर्षी दि. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात सुरू केलेला ‘दारू नको, दूध प्या’ हा उपक्रम आता राज्यभरात राबविण्याचा मानस असल्याचे हर्षल सांगतो. तसेच तंबाखूविरोधी दिन, होळी व दिवाळी या सणात व्यसनमुक्तीचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासह पोलीस बांधवांना रेनकोट वाटप, शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, व्यसनातून बाहेर पडलेल्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. हर्षलला आजपर्यंत ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चा ‘मोरया गोसावी पुरस्कार’, ‘लायन्स व रोटरी क्लब’चा विशेष सन्मान, ‘शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’, ‘सरपंच सेवा पुरस्कार’ यांसह ‘आदर्श कार्यगौरव समाजरत्न’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. “सन्मान हे केवळ कामासाठी मिळणारे प्रोत्साहन आहे. मात्र, समाजातील या वर्गासाठी कायम काम करीत राहणार,” अशी भावना हर्षल व्यक्त करतो. हर्षल पंडित याच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
पंकज खोले