ठाणे : पनवेल कळंबोली येथे शनिवारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी रविवारी सकाळी दिवा स्थानकात रुळावर उतरून रेल रोको केला. त्यामुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक कोलमडली. सकाळी ९ वाजता हा रेल रोको सुरू झाला होता. त्यांनतर पोलिसांनी सकाळी १० वाजता आंदोलकांना बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरु झाली. दरम्यान, रेल रोकोमुळे एकामागे एक लोकलच्या रांगा लागल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे शनिवारी दुपारी रुळावरून घसरले होते. या मालगाडीवर लोखंडी कॉईल होते. डबे रुळावर आणताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे दिवसभर या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून कोकणात निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. शनिवारी रात्री निघालेली मुंबई - मेंगलोर गाडी दिव्यातच थांबवण्यात आली. तर, दिवा - सावंतवाडी गाडीतही प्रवासी रात्रीपासून दिवा रेल्वे स्थानकांत अडकुन पडल्याने रविवारी सकाळी चाकरमान्यांचा उद्रेक झाला. दरम्यान, मालगाडी दुर्घटनेमुळे कोकणात जाणाऱ्या तसेच कोकण, गोवा व दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या विविध स्थानकात अडकुन पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.