‘समरसता’ हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून ’समरसता’ हे ’जीवनमूल्य’ आहे, हे ज्यांच्या संपर्कात आल्याबरोबर जाणवते; ते व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा इदाते. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा राहिला नसेल की, ज्यातील कार्यकर्त्यांना दादांनी ‘समरसता’ विषय समजावून सांगितलेला नाही. पण, त्यांच्या आयुष्याकडे पाहूनच कार्यकर्त्यांना समरसतेची प्रत्यक्ष ओळख पटते. त्यांना नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या समरस जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
आपल्या अखंड, अविरत प्रवासांतून महाराष्ट्र व संपूर्ण पश्चिम क्षेत्र पिंजून काढून समरसतेचा विषय सामाजिक विषयसूचीवर प्राधान्याने आणण्याचे कठीण काम गेली अनेक वर्षे दादा करीत आहेत. त्यांनी बालपणापासून अनेकदा प्रतिकूलतेशी सामना केला आहेच. समरसता हा तर थेट माणसांच्या हृदयपरिवर्तनाचाच विषय! हे परिवर्तन सर्वांत कठीण! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसस्पर्शाने दादांचे जीवन उजळून निघाले आणि समरसतेचा जीवन-विचार देत देत अनेक कार्यकर्त्यांचे जीवन दादांनी उजळले आहे.
समाजसुधारकांनी मांडलेली मते आपल्याला पाहिजे तशी ’वाकवून’ मांडणारे अनेक ’वाकबगार’ महाराष्ट्रात ’विचारमाफीयां’च्या स्वरूपात वावरताना आपण पाहतो. स्वतःच्या जात, पंथ, विचारप्रवाहाच्या संकुचित स्वार्थासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करून, पुन्हा धर्मनिरपेक्षतेचा टाहो फोडणार्या या तथाकथित पुरोगामी बुद्धिवंतांच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर दादांचे चिंतन व लिखाण अधिक उठून दिसते. कारण, त्यांनी महापुरुषांचा विचार ’समाज तोडण्यासाठी नव्हे, तर समाज जोडण्यासाठी असतो’ या भूमिकेतून त्यांचे अध्ययन केले आहे. ’सर्वच महापुरुषांनी आईच्या मायेने समाजाचा विचार केलेला आहे. त्यातून प्रेरणा घेऊन, समाज जोडण्याचे काम आम्ही करू!’ हा आश्वासक, सकारात्मक विचार दादांमुळे महाराष्ट्रातील समाज परिवर्तनात सक्रिय होऊ इच्छिणार्या अनेक कार्यकर्त्यांना कामाची दिशा देऊन गेला आहे.
एखादा विषय ठरवताना समग्र विचार करणे, सुयोग्य कार्यकर्ता त्याला जोडणे, शांतपणे परंतु निग्रहपूर्वक ठरविलेले ध्येय मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, हे गुणविशेष आपल्या अवतीभवतीच्या सामान्य कार्यकर्त्यांतही उतरावेत, यासाठी दादांचे प्रयत्न असतात. आपल्या आत्मियतापूर्ण व अकृत्रिम व्यवहाराने हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी कार्यप्रवण केले आहे.
सामाजिक चळवळींचा आढावा घेताना, त्यावर भाष्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उच्चारही निषिद्ध समजणार्या पुरोगामी टोळ्यांचे महाराष्ट्राच्या वैचारिक पटलावर राज्य असण्याच्या काळात; अनेक अवमान, उपेक्षा सहन करून, दादा ’हिंदुत्त्वाचा सामाजिक आशय’ मांडत राहिले. साहित्यक्षेत्र, सेवाकार्ये, सामाजिक न्याय या क्षेत्रात आज संघाचे व समरसता मंचाचे योगदान या तथाकथित पुरागामी मंडळींनाही दुर्लक्षिता येत नाही, ते दादांसारखे दीपस्तंभ या क्षेत्रात उभे राहिले म्हणूनच!
दलितांचे, भटके-विमुक्तांचे प्रश्न हे केवळ त्या-त्या समाजाचे प्रश्न नसून, समग्र हिंदू समाजाचेच प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न गतीने सोडवित असताना दलित, भटके-विमुक्तांनी उर्वरित हिंदू समाजाशी विनाकारण संघर्षाचीच भूमिका घेण्याऐवजी, त्यांनाही परिवर्तनवादी कक्षेत आणून, त्यांचे सहकार्य घेऊन शिक्षण, आरोग्य, आर्थिक उन्नयन या गोष्टी मिळविण्याचे प्रयत्न करावेत. या विचारांतून अनेक सेवा प्रकल्प सर्व समाजाचे सहकार्य मिळवित यशस्वीपणे चालविण्याचे काम दादांनी केले. मात्र, सामाजिक अन्यायाच्या विरोधात रस्त्यावरचा संघर्षही दादांनी कधी टाळला नाही, अशा अनेक संघर्षांत जिद्दीने लढणार्या कार्यकर्त्याला दादांनी सर्व अर्थांनी ताकद दिलेली आहे.
दादांचे ओघवते वक्तृत्व श्रोत्यांसाठी वैचारिक मेजवानी तर असतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती त्यामागची सामाजिक परिवर्तनाची तळमळ! अनेक जाहीर सभांमधून दादांच्या भाषणानंतर अंतर्मुख झालेले श्रोते मी पाहिले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका व प्रबोधन सत्रांतून दादांच्या विषय मांडणीनंतर ’नवीन काहीतरी सापडल्याचे समाधान’ प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर दिसते. ‘समरसता’ चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याने विचाराच्या लढाईतही मागे राहता कामा नये, यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी आपल्या अफाट व्यासंगातून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नेमकेपणाने विषयाचे सर्व पैलू पुढे आणणे, ही दादांची खास हातोटी!त्याचबरोबर पुढच्या फळीतील कार्यकर्त्यांना विषय मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना आत्मियतेने सुधारणा सुचविणे व न विसरता त्यांचे कौतुक करणे, हीदेखील दादांची वैशिष्ट्ये! महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांत घडणार्या समरसतेला अनुकूल अथवा प्रतिकूल घटनांकडे दादांचे बारकाईने लक्ष असते. बर्याच वेळा, त्या भागातील कार्यकर्त्यांच्या आधी दादांनीच अशा घटनांची दखल घेतलेली असते. अशा घटनांवर आपल्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, याची चौकशी व त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शनही ते करीत असतात.
दादांनी महाराष्ट्रभर उभ्या केलेल्या सेवाकार्यांच्या मांदीयाळीतून आज शेकडो जीवने समर्थपणे उभी आहेत. संस्था उभारणे एक वेळ सोपे, पण त्या सांभाळणे कठीण! दादांनी कष्टपूर्वक उभारलेल्या सगळ्या संस्था आज निकोप व प्रभावशाली संस्थाजीवनाचा वस्तुपाठ समाजात घालून देत आहेत. या संस्थांचे विचार व व्यवहार यांवर दादांचे बारीक लक्ष असते. त्यात काम करणार्या प्रत्येकाच्या विकासाकडे त्यांचे लक्ष असते. म्हणून अगदी नवीन कार्यकर्त्यालाही त्याचा लहानात लहान प्रश्न घेऊन दादांकडे जायला संकोच वाटत नाही. त्यांच्या सर्वार्थाने ’मोठे’ असण्याचे दडपणही जाणवत नाही. वलयांकित असूनही इतरांना त्याची जाणीवही न होऊ देणे, यांत दादांचे मोठेपण आहे. सामाजिक कामात नैराश्याचे प्रसंगही येतात. संघटनात्मक वाटचालीतही कधी कधी काही ’खुपत राहते.’ अशावेळी दादांबरोबर एखादी बैठक, प्रवास; अगदी फोनवरील संभाषणही कार्यकर्त्याची मरगळ दूर करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाप्रमाणे पूर्णवेळ समाजासाठी समर्पण करूनही दादांनी प्रचारक नसलेल्या कार्यकर्त्यांसाठी घर व सामाजिक काम दोहोंची जबाबादारी उत्तमपणे सांभाळण्याचा आदर्श उभा केलेला आहे. म्हणूनच जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी ’कर्मवीर’ म्हणून दादांचा गौरव केला आहे.
संघाच्या कामासाठी अशक्य वाटणारे प्रवास करताना स्वतःच्या प्रकृतीच्या तक्रारींचा कधीही बाऊ न करणारे, पण त्याचबरोबर डॉक्टरांनी आरोग्यासाठी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळणारे दादा; शहरात, महानगरात एखाद्या मोठ्या कार्यक्रमांत गौरवमूर्ती म्हणून वावरताना भटक्या-विमुक्तांच्या छोट्या वस्तीवरील एखाद्या कार्यकर्त्याच्या व्यवस्थेसाठी स्वतः लक्ष घालणारे दादा, धारिष्ट्य करून एखादी ’लहान तोंडी मोठा घास’ अशी गोष्टही सूचविली, तर ती गांभीर्याने घेऊन, त्यावर योग्य त्या स्तरांवर विचारमंथन घडवून बदल घडवून आणणारे दादा, घरातील सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे दादा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील समरसतेचे प्रसंग आपल्या ओघवत्या वाणीने मांडणारे दादा, कार्यकर्त्याला ‘जपणारे’ दादा, चिंचवडच्या अधिवेशनात टेक्सास गायकवाडांच्या अनपेक्षित विचित्र भाषणानंतर अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या एकाच अविस्मरणीय भाषणाने पुन्हा सगळ्यांना सकारात्मक मानसिकतेत आणणारे दादा... अशा एक ना अनेक प्रसंगांतून दादांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मनावर कोरले गेलेले आहे.
सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या दादांना दीर्घायुष्य लाभावे आणि भारतमातेच्या या थोर सुपुत्राकडून ’समतायुक्त, शोषणमुक्त, एकात्म, एकरस’ समाजनिर्मितीसाठीची चळवळ आणखी मजबूत व्हावी, ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
-डॉ. प्रसन्न पाटील