रायगड : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाच्या आमदारांची चौकशी करण्यात येत आहे. आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबीने दि.२० जानेवारी रोजी सलग सहा तास चौकशी केली.याआधीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, अधिक चौकशीसाठी पुन्हा एकदा १० फेब्रुवारीला चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीनंतर साळवी यांनी एसीबीवर आरोप केले आहेत. एसीबीला आवश्यक असणारी सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे.
दि.२० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. सहा तासानंतर आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांना आता १० फेब्रुवारीला पुन्हा एसीबी अलिबाग कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. आपल्याला कितीही वेळा बोलावले तरी चौकशीसाठी हजर राहणार आहोत. संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली तरीही तयार आहोत. माझ्याजवळ संबध नसलेल्या मालमत्तेची देखील एसीबी चौकशी करत आहे. तसेच एसीबीने मागवलेली आणखी माहिती १० फेब्रुवारी पर्यंत सादर करणार आहोत, असे सांगत साळवी म्हणाले,पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे.