साधू हत्याकांडाची चौकशी होऊ न देणारे हिंदुहृदयसम्राटांचे पुत्रच होते!

जे पी नड्डा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    02-Jan-2023
Total Views | 73

jp nadda
 
 
 
मुंबई : ''स्व. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्यांच्याशी लढाई केली, त्यांच्याशीच तुम्ही सत्तेसाठी भागीदारी केली. हिंदू आणि संस्कृतीच्या विरोधात काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात साधू हत्याकांडाची चौकशी होऊ न देणारे हिंदुहृदयसम्राटांचे पुत्रच होते," या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
 
भाजपच्या 'मिशन १४५' आणि लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर 'मिशन महाराष्ट्र'ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथून करण्यात आली आहे. चंद्रपूर येथे पार पडलेल्या सभेत नड्डा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कामांवर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने राज्यात करण्यात येत असलेल्या विकास कामाचीही माहिती यावेळी नड्डा यांनी उपस्थितांना दिली.
 
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नड्डा म्हणाले की, 'महाराष्ट्रात जेव्हा केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या घोषणा होत होत्या तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी चिडीचूप होते. नव्हे तर त्यावर सहमती दर्शवत होते. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी युती केली. सत्ता मिळताच या लोकांनी संस्कृतीशी एकरूप झालेल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांवर निर्बंध लादले होते. आपल्या विचारधारेच्या विसंगत लोकांशी झालेली शिवसेनेची हि युती तात्पुरती टिकणार हे निश्चित होते आणि त्याचप्रमाणे राज्यातील सरकार अवघे अडीच वर्षांत कोसळले हा इतिहास राज्याने पाहिला आहे. हिंदू संस्कृतीशी नाळ जोडलेल्या महाराष्ट्रातच्या भावना दुखावणाऱ्या या महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना तुम्ही माफ करणार का ?' असा सवालही नड्डा यांनी यावेळी विचारला आहे.
 
भाजप आणि मविआच्या सूत्रात हा मूलभूत फरक
 
यावेळी बोलताना नड्डा यांनी दोन इंग्रजी शब्दांचा आधार घेत त्याचे भाजप आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगाने दोन वेगवेगळे अर्थ उलगडून सांगितले. नड्डा म्हणाले की, 'भाजप आणि महाविकास आघाडी हे दोन्ही घटक डीबीटीवर काम करत आहेत. यात भाजपचा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असा होता तर महाविकास आघाडीचा डीबीटी म्हणजे डिलरशिप ब्रोकेज आणि ट्रान्स्फर' असा आहे. दुसरा शब्द म्हणजे जेएएम, भाजपच्या दृष्टीने जेएएमचा अर्थ जनधन आधार आणि मोबाईल असा आहे. या तीन घटकांच्या माध्यमातून आम्ही विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने जेएएमचा अर्थ जॉईन्टली अक्वायरींग मनी म्हणजे तीन पक्षांनी मिळून केवळ पैसा जमा करायचा आणि आपापसात वाटून घ्यायचा,' या शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजप आणि महाविकास आघाडीच्या सूत्रांमधील मूलभूत फरक समजावून सांगितलं आहे. त्यामुळे राजकारणात कोण हितचिंतक आहे आणि मगरीचे अश्रू ढाळून कोण तुमच्या हक्काचे शोषण करत आहे, हे जनतेने समजून घेतले पाहिजे." असा सल्लाही त्यांनी जनतेला दिला आहे.
 
राज्यात ३ लाख ७५ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक
 
भाजपने लोकसभा २०२४ च्या अनुषंगाने सुरु केलेल्या 'लोकसभा प्रवास योजना' अंतर्गत चंद्रपूर येथे सभेचे आयोजन केले होते. या अभियानाची महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा होती. 'महाविकास आघाडीचे मंत्री कारागृहात होते तरी मविआचे नेते आमच्या सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्या काळात दूषित झालेले वातावरण मागील सहा महिन्यात सुधारले असून राज्यात विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. फडणवीस शिंदेंच्या नेतृत्वात आलेले सरकार महाराष्ट्रासाठी कठीण परिश्रम करत असून तब्बल ३ लाख ७५ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले आहे. नुकतीच पंतप्रधान मोदींकडून राज्यासाठी ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लक्षावधी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे कामही सुरु आहे. व्हायब्रण्ट गुजरातच्या धर्तीवर मॅग्नेटिक महाराष्ट्राची निर्मिती करण्याचे काम फडणवीस शिंदेंकडून सुरु झाले आहे,' असे गौरवोद्गारही नड्डा यांनी राज्य सरकारच्या बाबतीत काढले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा