व्यासपीठावर बोलताना भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, समवेत खासदार सुनील तटकरे, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, हनुमंत जगताप, अनंत पार्टे आणि सविता दरेकर आदी मान्यवर दिसत आहेत.
पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कोतवाल नगरी या गावातील देवी कालकाई, जननी कुंभलजय मातेच्या मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पोलादपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार प्रविण दरेकर यांनी केले. या सोहळ्याला खासदार सुनिल तटकरे, आ. भरत गोगावले, हनुमंत जगताप, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कोतवाल गावचे सुपुत्र, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्धल एसटी महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अनंत हिराजी पार्टे आणि अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्त नेत्या सविता दरेकर, नवनिर्वाचित सरपंच रेखा दळवी, उपसरपंच राजेश कदम यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही खा. तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, १२ हजार कोटींच्या मुंबई जिल्हा सहकारी बँकेवर अध्यक्ष निवडून येताना १८ संचालक निवडून येतात. हा विश्वास बँकेच्या आणि लोकहिताचे निर्णय घेताना निर्माण केला. राज्यातील सरकारमध्ये शब्दाला किमंत असल्याने आपल्याकडून यापुढे पोलादपूरच्या प्रलंबित धरणाबाबत, मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच महिला सक्षमीकरण, बारा बलुतेदार आदी व्यवसाय प्रशिक्षणाची सोय करून विकासासाठी प्रयत्न करणार आहे. यापुढे यापेक्षाही भरीव कामे होऊ शकतील. पण दुर्दैवाने स्व. प्रभाकर मोरे यांच्यानंतर महाड व पोलादपूर तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंतही दरेकर यांनी व्यक्त केली. तसेच कालकाई मंदिराच्या प्रांगणात मोठ्या सभागृहासाठी खासदार निधीतून तरतूद करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
तर यावेळी बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले की, ग्रामदैवत मंदिराच्या जीर्णोद्धाराला माझी कन्या अदिती तटकरे कोतवाल नगरीत आली होती. देवीच्या कृपेने आमदार दरेकर यांना मोठमोठ्या संधी मिळाल्या. मात्र त्यांनी जन्मगावाचे महत्व कधीच नाकारले नाही. २००९ मध्ये दरेकरांना संधी मिळाली असती तर महाड आणि पोलादपूरचे चित्र वेगळे असते. एप्रिलमध्ये कालकाई मंदिराच्या विस्तारासाठी खासदार निधीतून तरतूद करणार असून यामुळे कोतवालमधील वहीवाट सुरु होणार असल्याचेही खा. तटकरे यांनी सांगितले.
व्यासपीठावर बोलताना भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, समवेत खासदार सुनील तटकरे, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, हनुमंत जगताप, अनंत पार्टे आणि सविता दरेकर आदी मान्यवर दिसत आहेत.