जळगाव : "संजय राऊत यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार? त्यांची अवस्था म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशी आहे" अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. "आम्हांला काय विचारता की आम्ही काय केलेय शिवसेनेसाठी? गेली ३५ वर्षे आम्ही लाठ्या, काठ्या खाल्या आहेत, तुरुंगात गेलोय, तुम्ही काय केलंय शिवसेनेसाठी?" असे सवाल गुलाबरावांनी केले आहेत. या संजय राऊतांची तेवढी ताकद तरी आहे का? आम्ही आमदारांनी मतदान केले तेव्हा हा खासदार म्हणून निवडून आला आणि आता आम्हांला शिकवतोय शिवसेना काय आहे ? अशा शब्दांत संजय राऊत यांच्यावर टीका केली गेली आहे.
आदित्य ठाकरेंवरही गुलाबरावांचा प्रहार
" ते ३२ वर्षांचे पोरगे आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करत आहे, पण अरे आदित्य तू गोधडीत पण नव्हतास तेव्हापासून आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत" अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात जलजीवन मोहिमेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी गुलाबराव बोलत होते. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाला सातत्याने गद्दार गद्दार म्हणून डिवचले जात आहे. या टीकेत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.
फक्त एवढेच बोलून गुलाबराव थांबले नाहीत तर त्यांनी आदित्य ठाकरेंचे पुरते वाभाडेच काढले. गेली ३५ वर्षे आम्ही शिवसेनेसाठी खस्ता खाल्या आहेत, रक्त आटवून काम केले आहे. मार खाल्ला आहे, तडीपारीसाठी जेलमध्ये गेलो आहे. तुम्ही काय आम्हांला विचाराता की आम्ही काय केलंय शिवसेनेसाठी ? तुमचे जितके वयही नाही तितकी वर्षे आम्ही शिवसेनेसाठी काम केले आहे. अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचे पुरते वाभाडे काढले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वविरोधात उठाव केलेल्या शिंदे गटावर ठाकरे पिता- पुत्रांसह ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांकडून सातत्याने गद्दार असे संबोधण्यात येत आहे. इतके दिवस शिंदे गटाने संयम पाळून ठाकरे घराण्यावर टीका न करण्याची सुज्ञता दाखवली होती पण नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून जशास तसे उत्तर द्या असे सांगण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.