मुंबई : अभिजात नाट्य महोत्सव ९ ऑगस्टला मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत रंगणार आहे; तर १३ ऑगस्टला रात्री ११.५० ते १५ ऑगस्ट पहाटे ००.१० पर्यंत पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात नाट्यजागर होणार आहे.
या महोत्सवात 'टिळक आणि आगरकर', 'वासूची सासू' आणि 'होय मी सावरकर बोलतोय' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. त्याची तिकीट विक्री दोन्ही नाट्यगृहांमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येक नाटकाची स्वतंत्र तिकिटे आणि पूर्णोत्सव तिकिटेही उपलब्ध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या या अद्भुत सोहळ्याचे आणि आकाश भडसावळे च्या विश्वविक्रमाचे पूर्ण साक्षीदार होण्यासाठी पूर्णोत्सव प्रवेशिका नेहमीपेक्षा अल्प दरात उपलब्ध आहेत.
'अभिजात नाट्य महोत्सवा'त सादर होणाऱ्या नाटकाविषयी...
टिळक आणि आगरकर
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारं 'टिळक आणि आगरकर' हे नाटक आहे. या नाटकात नयना आपटे, सुनिल जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, प्राची सहस्त्रबुद्धे मुख्य भूमिकेत आहेत. अभिजात नाट्य महोत्सवात सादर होणारे या नाटकाचे हे शेवटचे प्रयोग म्हणून घोषित केले आहेत. या सर्वांगसुंदर कलाकृतीचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा.
वासूची सासू
'वासूची सासू' हे प्रदीप दळवी लिखित विनोदी नाटक आहे. दुर्गेश मोहन यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या महाराष्टाच्या लाडक्या मालिकेतील लाडकी "अम्मा" म्हणजेच आशा ज्ञाते या नाटकातून बऱ्याच वर्षांनी नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहेत. नयना आपटे, अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, आकाश भडसावळे, संजना पाटील, अथर्व गोखले, तपस्या नेवे, सुयश पुरोहित, वल्लभ शिंदे या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
होय मी सावरकर बोलतोय!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित 'होय मी सावरकर बोलतोय' हे नाटक आहे. या नाटकात आकाश भडसावळे, बहार भिडे, दुर्गेश आकेरकर, कविता विभावरी, शैलेश चव्हाण, दीपक जोईल, सुमित चौधरी, माधव जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाटकाचे लेखन कादंबरीकार अनंत शंकर ओगले यांनी केले असून सुनिल जोशी यांचे दिग्दर्शन आहे.
सामाजिक जाणिवेतून आणि अभिमानास्पद अशा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण नाट्य क्षेत्रातून 'अभिजात' संस्थेने उचललेलं हे पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे. रसिकांना या दुर्मिळ नाटकांचा आस्वाद त्यानिमित्ताने मिळेल. रसिक चोखंदळ प्रेक्षक या महोत्सवाचे भरभरून स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
पितांबरी उत्पादने, व्यास क्रिएशन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि फॅमिली कट्टा प्रकल्प हे या महोत्सवात प्रायोजक आहेत. मुंबईत उदघाटन सत्राला ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री निवेदिता सराफ, जयवंत वाडकर यांची उपस्थिती असेल तर पुण्यात अभिनेते योगेश सोमण, गायक आनंदगंधर्व आनंद भाटे, वर्षा जोगळेकर आदी अनेकांची उपस्थिती आहे.