अहमदनगर : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाळू तस्करांच्या भल्यासाठी लोकांच्या जीवावर उठण्यापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मजल गेली होती आणि या सगळ्याला माजी महसूलमंत्र्यांचे आशीर्वाद होते'असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. या सर्वांची आता गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही विखे पाटील यांनी दिला आहे. आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघे या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत असेही विखे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यातील वाळू माफियांनी त्यावेळच्या महसूल मंत्र्याच्या आशीर्वादाने हैदोस घातला होता. महसूल मंत्र्याचे नातेवाईक, कार्यकर्ते, यांची लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावण्यापर्यंत मजल गेली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीनेही या सर्व गोष्टींना छुपा पाठिंबाच दिला होता. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणीच नव्हते, त्यांना वाचवायला कोणीच पुढे येत नव्हते. आत लवकरच ही परिस्थिती बदलली जाणार आहे, हे सर्व धंदे करणारे लोक आणि त्यांचे पाठीराखे या सर्वांना मुळापासून उपटून काढण्यासाठीच आता काम करणार असा इशाराच विखे पाटीलांनी दिला.
आमच्या पक्षात असे काळे धंदे करणाऱ्यांनी येऊच नये, त्यांच्याशी संगनमत असलेल्या अधिकाऱ्यांनीही आमच्याकडे येऊ नये, अशा कोणालाच आमच्या पक्षात स्थान मिळणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांनीही या असल्या लोकांपासून दूरच राहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.