नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादित केले व भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि२३ कांस्यपदकांची कमाई केली. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला हा विस्तृत आढावा...
भारताने प्रत्येक क्षेत्रांत एक योद्धा आणि बाजी मारणारा देश म्हणून स्वतःची ओळख एव्हाना निर्माण केली आहे. दररोज यशाच्या नवीन आयामांना स्पर्श करणार्या देशांमध्ये आज भारताची गणना होते. दररोज यशाची नवनवीन शिखरं सर करणार्या देशांपैकी भारत एक आहे. क्रिकेट हा एकमेव खेळ नाही, ज्यात भारताने चमकदार कामगिरी केली आहे, तर भारताने इतर अनेक क्रीडा प्रकारांतही आपले स्थान बळकट आणि प्रस्थापित केले आहे. गेल्या वर्षी जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या. त्यात भारताने एकूण सात पदकं जिंकली आणि आतापर्यंतची ऑलिम्पिकमधली ती सर्वोत्तम कामगिरी ठरली.
क्रिकेटमध्ये तीन विश्वचषकांवर भारताची मोहोर
भारतात क्रिकेटकडे ‘धर्म’ म्हणून पाहिले जाते, नव्हे क्रिकेटला धर्माप्रमाणे पुजले जाते. सध्या भारताकडे क्रिकेटमधील एक जागतिक आर्थिक महासत्ता म्हणूनही पाहिले जाते. भारताने १९६७-६८ मध्ये देशाबाहेर न्यूझीलंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली. पण, भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा खर्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली ती १९८३ साली. क्रिकेट जगतात दबदबा असलेल्या वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताने १९८३ मध्ये इंग्लिश भूमीवर पहिला एकदिवसीय विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला, तोही अनपेक्षितपणे! या विजयानंतर भारताच्या क्रिकेटचा वेग वाढला. अर्थात, भारताला पुढचा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल २८वर्षे लागली. पण, या दरम्यान भारत क्रिकेटमधलं एक मोठं नाव ठरला. २००३ मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकही मारली होती. पण, या संघाला विजयानेहुलकावणीच दिली. ‘टी-२०’ स्वरूपातील पहिला विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तो जिंकला. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने पुन्हा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तेव्हापासून भारत प्रत्येक वेळी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला आहे.
कुस्तीत मोठं नाव
स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये जेव्हा हेलसिंकी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, भारताला हॉकीखेरीज कोणत्याही खेळात स्पर्धक मानलं जात नव्हतं. परंतु, एका खेळाडूनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा खेळाडू होता खाशाबा जाधव. त्यांनी कुस्तीत भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर भारतानं कुस्तीत यश मिळवायला सुरुवात केली. १९६१ मध्ये उदय चंद यांनी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं आणि या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारे ते पहिले कुस्तीपटू ठरले. १९६७ मध्ये बिश्मबर सिंग यांनी ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. यानंतर भारताने १९७० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आणि कुस्तीत पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय कुस्तीपटू १९५४ पासून आशियाई खेळांमध्ये आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत होते. परंतु, ऑलिम्पिकमध्ये त्यांची कामगिरी निराशाजनकच होती. ही निराशा सुशील कुमारने दूर केली. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलने कांस्यपदकावर नाव कोरलं. यानंतरच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीमध्ये पदक पटकवलचं. आज परिस्थिती अशी आहे की, भारतीय खेळाडू कोणत्याही कुस्ती स्पर्धेत उतरतात, ते पदकाचे दावेदारही असतात आणि पदकांसह परततातही.
बॉक्सिंगमध्ये अभिमानास्पद कामगिरी
बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) देखील असा एक खेळ आहे, ज्यात भारत सध्या मजबूत मानला जातो. मात्र, ही उंची गाठण्यासाठी स्वातंत्र्यानंतर बराच कालावधी जावा लागला. २००८ मध्ये बीजिंगमध्ये भारताने या खेळात पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं. विजेंदर सिंगने भारताला हे कांस्यपदक मिळवून दिलं. भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी २०१२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश केला आणि मेरी कोमनं कांस्यपदक जिंकलं. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर पदक जिंकण्यात अपयशी ठरले असले तरी, लोव्हलिना बोर्गोहेननं टोकियो ऑलिम्पिक-२०२० मध्ये कांस्यपदक जिंकलं. वर्ल्ड चॅम्पियनशिपबद्दल बोलायचं झालं, तर मेरी कोमनं भारताला खूप यश मिळवून दिलं आहे. या चॅम्पियनशिपची महिला आवृत्ती २००६ मध्ये सुरू झाली आणि मेरी कोमने या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं. तसेच, या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू होती. निखत जरीननं नुकतंच या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलं.
बॅडमिंटनमध्ये इतिहास घडवला
बॅडमिंटनमध्येही भारतानं आपली ताकद मोठ्या प्रमाणात दाखवली आहे. प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांनी ‘ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप’मध्ये यश मिळवून बॅडमिंटनमधल्या दिमाखदार कामगिरीची सुरुवात केली होती. पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि इतर अनेकांनी ती सुरू ठेवली आहे. आज या खेळात आपल्याकडे एकूण तीन ऑलिम्पिक पदकं आहेत. सायनानं ‘लंडन ऑलिम्पिक-२०१६’ मध्ये कांस्य, तर सिंधूनं ‘रिओ ऑलिम्पिक-२०१६’ मध्ये रौप्य आणि ‘टोकियो ऑलिम्पिक-२०२२’ मध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने यावेळी ‘थॉमस चषक’ जिंकून इतिहास रचला आणि सिंधू, लक्ष्य सेनने ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळातही आज भारत जागतिक महासत्ता म्हणून उभा आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू जिथे उतरतात तिथे पदकाचे दावेदार असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नेमबाजीत अचूक लक्ष्य
२००४ च्या ऑलिम्पिकमध्ये राजवर्धन राठोडच्या रौप्यपदकामुळे जागतिक स्तरावर भारताची नेमबाजीतली ओळख निर्माण झाली. राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत जगातील अनेक स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. त्यासोबतच भारताला ही पदक जिंकण्यातही यश आले. भारताचा वैयक्तिक प्रकारात तोपर्यंत असलेला सुवर्णपदकाचा दुष्काळ 2008च्या ऑलिम्पिकमध्ये या नेमबाजीनेच संपवला. अभिनव बिंद्राने भारतासाठी नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं. यानंतर गगन नारंग आणि विजय कुमार यांनीही ‘लंडन ऑलिम्पिक’मध्ये भारताला नेमबाजीत यश मिळवून दिले.
अॅथलेटिक्समध्येही आश्चर्यकारक यश
भारत अॅथलेटिक्समध्ये कधी आश्चर्यकारक कामगिरी करेल, असे कोणालाही आत्ता आत्तापर्यंत वाटले नव्हते. परंतु, नीरज चोप्राने ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये भारताला भालाफेकीतलं सुवर्णपदक मिळवून दिलं. नीरजने नुकत्याच झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी रौप्य पदक पटकावलं.
भारोत्तालनात नेत्रदीपक कामगिरी
भारताच्या आयर्न लेडी कर्णम मल्लेश्वरीनं २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. भारतीय महिला खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं ते पहिलं पदक, तर होतंच, शिवाय या घटनेने भारतीय वेटलिफ्टिंगला नवी उमेद मिळाली. त्याही आधी कुंजूराणी देवीनं सात वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदकं आणि दोन एशियन गेम्समध्ये कांस्यपदकं पटकावत लोकप्रियता मिळवली होती. ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये भारतासाठी मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं.
हॉकीमध्ये गमावलेली विश्वासार्हता कधी सापडणार?
भारताच्या पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९५६ या कालावधीत ऑलिम्पिकमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक पटकावली. त्यानंतर १९६४ आणि १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी दोन सुवर्ण पदकं मिळवत भारतीय पुरूष हॉकी संघाची सुवर्णपदकांची संख्या आठ इतकी झाली. यापैकी तीन ऑलिम्पिक्समध्ये मेजर ध्यान चंद या दिग्गज हॉकीपटूच्या जादुई खेळाचा सिंहाचा वाटा होता. त्याकाळी हॉकी हा पहिला खेळ होता, ज्यामध्ये भारताचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं निश्चित मानलं जात होतं. परंतु, नंतर हळूहळू या खेळाची चमक कमी होत गेली आणि भारत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. १९८० नंतर भारताने ऑलिम्पिक पदक जिंकले नाही किंवा पूर्वीसारखा दर्जाही मिळवला नाही. त्यानंतर आणखी एका हॉकीपटूचं नाव - भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला, तर महिला संघाने कांस्यपदकाचा सामना खेळला.
जिमनॅस्टिक्स
ग्लासगो येथे २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘जिमनॅस्टिक्स’मध्ये दीपा कर्माकरनं कांस्यपदक जिंकलं, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आणि तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
केंद्र सरकारचे क्रीडा पुरस्कार
खेलरत्न पुरस्कार : भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘खेलरत्न पुरस्कार’ १९९१-९२ मध्ये ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ म्हणून सुरू करण्यात आला. पुढे २०२१ मध्ये या पुरस्काराचं नामकरण ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं करण्यात आलं. ‘खेलरत्न’ हा उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी.
अर्जुन पुरस्कार : १९६१ मध्ये ‘अर्जुन पुरस्कारा’ची सुरुवात झाली. चार वर्षांतील सलगरित्या उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना या पुरस्कारानं गौरवण्यात येते. नव्या नियमांनुसार ‘खेलरत्न’ पुरस्कार विजेत्या खेळाडूचे ‘अर्जुन पुरस्कारा’साठी नामांकन केलं जात नाही.
द्रोणाचार्य पुरस्कार : प्रशिक्षणासाठी दिला जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आहे. २००२ मध्ये अॅथलेटिक्स प्रशिक्षक रेणू कोहली या पहिल्या महिला पुरस्कार विजेत्या ठरल्या.
मेजर ध्यानचंद पुरस्कार : ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ हा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी भारताचा सर्वोच्च जीवनगौरव सन्मान आहे.
मौलाना अबुल कलाम आझाद चषक: एका वर्षांत आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो.
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार : तीन वर्षांच्या काळात क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट भूमिका बजावल्याबद्दल संस्था किंवा कॉर्पोरेट्स (खासगी आणि सार्वजनिक दोन्ही) आणि व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २००९’ पासून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या यादीत स्थान आहे.
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार : तेनझिंग नोर्गे यांच्या स्मरणार्थ १९९४ मध्ये स्थापित, ‘तेनझिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड’ हा साहसी उपक्रम किंवा जमीन, समुद्र आणि हवेतील क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. गिर्यारोहण, स्कायडायव्हिंग, ओपन वॉटर, स्विमिंग आणि सेलिंग यांसारख्या स्पर्धेतील कामगिरीचा यासाठी विचार केला जातो. २००४ पासून सहा राष्ट्रीय पुरस्कारांसमवेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
‘खेलो इंडिया’ आणि करिअरच्या नव्या वाटा
जागतिक स्तरावर, क्रीडा हा महसूल आणि रोजगाराच्या दृष्टीने सर्वात मोठा उद्योग मानला जातो. भारत हे एक विकसनशील राष्ट्र असून ते या महसूल व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. आता ‘इंडियन प्रीमियर लीग’, ‘इंडियन सुपर लीग’, ‘इंडियन बॅडमिंटन लीग’, ‘प्रो कबड्डी’ इत्यादी स्पर्धांमुळे क्रीडा उद्योग एकंदर वाढ अनुभवत आहे. खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, विपणन सल्लागार, आरोग्य आणि तंदुरुस्ती या क्षेत्रात क्रीडा उद्योग करिअरची संधी उपलब्ध करतो.
सरकार, खासगी क्षेत्र तसेच ‘ना-नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणार्या संस्थांनी सुरू केलेल्या सर्वांगीण विकासामुळे भारतीय क्रीडा क्षेत्र बदलांचा समुद्र अनुभवत आहे. क्रीडा उद्योगातील वाढीमुळे इतर उद्योगांनाही भरभराटीचा मार्ग मोकळा होत आहे. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण वाढत आहे. वस्तू आणि वस्त्रोद्योग, औषधी क्षेत्र, आरोग्य आणि फिटनेस प्रशिक्षक, व्यापारीकरण, पर्यटन ही क्रीडा उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेली क्षेत्रं आहेत.
- प्रज्ञा जांभेकर