आज भारत जगभरात ‘आयटी हब’ म्हणून ओळखला जातोच. तसेच डिजिटल व्यवहारांतही भारताने गेल्या काही काळात मोठी झेप घेतली. तेव्हा, स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि भविष्याचावेध घेणारा हा लेख...
आगामी काळात मानव सर्वच क्षेत्रांत अफाट प्रगती करेल, यात तीळमात्र शंकाच नाही. २०४० पर्यंत बँका, पोस्ट ऑफिसेस, महाविद्यालये, टेलिफोन एक्सचेंज, मल्टिप्लेक्स कदाचित अस्तित्वातच नसतील. अशा या बदललेल्या डिजिटल क्रांतीत माणसाचे राहणीमान, जीवनशैली ही पूर्णत: बदललेली असेल, हे वेगळे सांगायला नको.
दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ‘इंडियाज ट्रायस्ट विथ डेस्टिनी‘ नावाचं भाषण नेहरूंनी केलं. भारताच्या प्रगतीचा वेगही हळूहळू वाढत गेला आणि आज भारत एक अत्यंत गतिमान अर्थव्यवस्था म्हणून जगभरात ओळखली जाते. जागतिकीकरणानंतर चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्था बर्याच प्रमाणात सुधारल्या. अॅन्ड्—यू हेवूडसारखा राजकीय तज्ज्ञ तर एकविसावं शतकं हे आशियाई राष्ट्रांचं शतक असेल, असं म्हणतो. त्यातही मुख्य म्हणजे, भारत आणि चीन. त्यातच भारताची साक्षरता ही गेल्या ७५ वर्षांत सत्तरीच्या पार गेली आहे.
आज या देशातले जवळपास ७५टक्के लोक साक्षर आहेत. हरितक्रांतीनंतर अन्नधान्याच्याबाबतीतही देश स्वयंपूर्ण झाला. एक अत्यंत स्थिर लोकशाही म्हणून भारताची वेगवान वाटचाल सुरु आहे. आणीबाणीचा काळ वगळता कुठलीही राजकीय अस्थिरता या देशाला पूर्णपणे हेलावून सोडू शकलेली नाही. त्यामुळे अशा अनेक संकटांचा सामना केल्यानंतरही १४० कोटींहून जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आज ताठ मानेने जगात उभा आहे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचालही करतोय. स्वातंत्र्यानंतरची सध्याची तरुण पिढी ही भारतातली तिसरी युवा पिढी म्हणता येईल. त्यामुळे २०२५ साली ‘जगातला सगळ्यात तरुण देश’ हा भारत असेल, असं म्हटले जाते.
संगणकाचा अवतार ज्या गतीने बदलत गेला, त्यापेक्षाही वेगाने, गेल्या पाच वर्षांत मोबाईलचे रूप आणि अंतरंग बदललेले आहेत, हे निश्चितच. किंबहुना, मोबाईलच्या हँडसेटचे अधिकाधिक संगणकीकरण झाल्यामुळे असे झाले आहे, असेही म्हणता येईल. ट्रांझिस्टर्स, मायक्रोचिप्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा कमी होणारा आकार आणि त्यांच्या जुळणीमध्ये यांत्रिक हातांच्या वापरामुळे आलेली विलक्षण सफाई उर्फ ‘रिफाइनमेंट’ यामुळे कमी जागेतून जास्तीत जास्त सुविधा पुरवणे शक्य होत आहे. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ५२ वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे मोबाईल फोन होय. याबाबतीत मोबाईलने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना, हँडसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे.
आजघडीला कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जात आहे. ‘कोविड-१९’च्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे. तंत्रबद्ध ‘डिजिटल’ व्यवहार (व्हर्च्युलायझेशन) व निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) हे कोरोनाच्या संकटानंतरही ‘न्यू नॉर्मल’मध्ये आपल्या अंगवळणी 2022 नंतर पडतील आणि आपले जीवन कळत नकळत तंत्रावलंबी (स्मार्ट) बनेल.
आजचं युग पूर्णपणे ‘डिजिटल’ झालं आहे, हे सर्वश्रूतच. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणं आज ‘चैन’ समजली जात नसून ती ‘गरज’ होत चालली आहे. आपले जीवन कळत-नकळत तंत्रावलंबी (स्मार्ट) बनेल, या तंत्रस्नेही व्यवहार आणि जीवन पद्धतीचा पाया व गृहितक शक्तिशाली इंटरनेट हेच आहे. ते नसेल तर ‘डिजिटल इंडिया’ कसा होणार? रस्ते नसतील, तर वाहने घेऊन काय उपयोग? तसेच उच्च इंटरनेट बॅण्डविड्थ ही एक्सप्रेस-वे इतकीच अत्यावश्यक आहे. २०व्या शतकात ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या आवश्यक गरजा होत्या. २१व्या शतकात वीज), मोबाईल आणि इंटरनेट यांची त्यात भर पडली आहे.
इंटरनेटने भूगोल इतिहासजमा केला व ‘लॉकडाऊन’मुळे जवळपास सर्वच वयोगटातील लोक तंत्रस्नेही झालेले दिसतात. इंटरनेट हे एकमेकांना ‘कनेक्ट’ केलेल्या सर्व संगणकांचे एक जागतिक नेटवर्क आहे. नॉर्वेसारख्या विकसित देशात तर इंटरनेट हा मानवी हक्क म्हणून गणला आहे. हेच लोण २०२५ नंतर भारतातही येईल. म्हणजेच जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच वीज व इंटरनेटची सोय करणे, हे सरकारवर बंधनकारक असेल. इंटरनेट हे हवेसारखे असेल. माहिती-तंत्रज्ञानातील क्रांती, तिचा सर्वदूर प्रसार आणि परवडणार्या किमतीत मिळणारी विविध स्मार्ट उपकरणे यांमुळे गेल्या दहाएक वर्षांत आपणा सर्वांना इंटरनेट, वेब, ब्रॉडबॅॅण्ड, वायफाय इ. शब्दप्रयोग चांगलेच माहीत झाले आहेत. जेथे ‘रेंज’, वीज आणि स्मार्टफोन आहे, अशा सर्वच शहरी आणि बहुतेक निमशहरी भागांत इंटरनेटवर आधारित विविध व्यवहारांची संख्याही लक्षणीय आहे.
सॉफ्टवेअर क्षेत्रात आघाडी
जगाला विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्स संबंधीच्या इतर सेवा पुरवण्यामध्ये भारत कायमच आघाडीवर राहिला आहे. परंतु, आता या साधनांचा वापर आपल्या देशासाठी आणि देशामध्येच होण्याचे प्रमाण वाढते आहे. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे-विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे-एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. बोललेल्या शब्दांचे मजकुरात, तर मजकुराचे आवाजात रूपांतर करणे अगदी सहज शक्य झाल्याने आणि यंत्रांची भाषांतरक्षमता वाढल्याने या क्षेत्रात असंख्य नवीन संधी उपलब्ध होतील. परंतु, अधिक महत्त्वाचे म्हणजे, लाखो निरक्षर व्यक्तींना या तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल. आज निदान शहरी भागातल्या बहुसंख्य नागरिकांना, संगणकाशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही.
फक्त दहा वर्षांपूर्वीदेखील संगणकाचा आपल्या दैनंदिन जीवनाच्या सर्व उपांगांमध्ये इतक्या विविध प्रकारे शिरकाव झालेला नव्हता - तो कार्यालयाच्या किंवा फार क्वचित घरातील टेबलावर बसून त्याला दिलेले काम करताना दिसे. परंतु, आता मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सूक्ष्मरूपामुळे (नॅनो टेक्नोलॉजी), संगणकाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये मिसळलेल्या सर्वसमावेशक आणि एकात्मिक रूपात तो दिसू लागला आहे (म्हणजे पूर्वी आपल्याकडे रेडिओ, डीव्हीडी प्लेअर, टेपरेकॉर्डर अशी वेगवेगळी साधने असायची. नंतर त्यांची जागा ‘ऑल-इन-वन’ने घेतली. कारण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तूंचा आकार आटोपशीर बनला आणि त्यांची कार्यक्षमता वाढली. तसेच, इथेही होत आहे - नेहमीच्या वापरातल्या मोबाईल फोनचेच उदाहरण घ्या. हँडसेटमधून मिळणार्या सुविधांची संख्या किती वेगाने वाढत चालली आहे आणि त्यांची किंमत किती वेगाने घसरते आहे, हे लक्षात घेता माझा मुद्दा सहजपणे स्पष्ट होतो.
आता अशी बरीचशी कामे ‘ऑनलाईन’ होऊ घातल्याने येत्या फक्त दहा ते २० वर्षांमध्ये आपणांस कल्पनाही करता येणार नाही, इतक्या बाबी संगणकाद्वारे हाताळता येणार आहेत. सर्वप्रथम कीबोर्ड आणि माऊसचा वापर खूपच कमी होऊन स्पर्शाने (टच-स्क्रीन), आवाजाद्वारे किंवा हातांच्या हालचालीने आज्ञा स्वीकारणारे संगणकही वापरले जातील. संगणक आपणांस विविध कामांची (म्हणजे त्याने करून उरलेल्या कामांची!) आठवण करून देईल. आपणांस हवी ती माहिती फटाफट काढून देईल (आत्ताही देतच आहे), आपल्या आरोग्याची काळजी घेईल, आपल्या तसेच आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देईल, विविध ठिकाणी आपली ओळख पटवेल (‘आधार’ या ‘युआयडी’ कार्डचे उदाहरण घ्या), आपली सर्वप्रकारे करमणूक करेल. एवढेच नाही तर चक्क आपली स्वप्नेदेखील रेकॉर्ड करून सवडीने ती आपणांस दाखवेल.
आरोेग्य क्षेत्रालाही डिजिटल बूस्टर
अपंग तसेच आजारी व्यक्तींना संगणकाच्या या सूक्ष्मरूपांचा फार मोठा फायदा मिळेल. कारण, संगणक आणि शरीरशास्त्र यांचा संयोग असलेल्या ‘बायोइन्फर्मेटिक्स’ या शाखेचा विस्तार होईल आणि शरीरांतर्गत नॅनोबॉट्स उर्फ नॅनो-रोबोट्सचा वापर सुरू होईल. यामुळे (पुराणकाळातील सुरस आणि चमत्कारिक कथांप्रमाणे) अक्षरशः पाहण्याची किंवा ऐकण्याची क्षमता कमी असलेल्यांना दिसू शकेल, ऐकू येईल आणि मूक व्यक्तींना वाचा फुटेल! प्रगत युरोपीय देशात हे (मर्यादित प्रमाणात का होईना) याआधीच घडले आहे - जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे बहुविकलांग असूनही तंत्रज्ञानाच्या करामतीने आपल्याशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्याकडील ज्ञानाचा फायदा लोकांना मिळतो.
सायबर विद्यापीठांकडे...
ज्ञानावरून आठवले, शिक्षण आणि ते देण्या-घेण्याच्या संकल्पनांमध्ये संगणकीय क्रांतीमुळे फार मोठा फरक पडेल. विद्यापीठांची विचार आणि व्यवस्थापन पद्धती बदलेल आणि कदाचित सायबर विद्यापीठेही निर्माण होतील. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत न जाता शिक्षण घेणे सोपे होईल आणि मुख्य म्हणजे ते साचेबंद, कंटाळवाणे न वाटता हसतखेळत घेता येईल. (याला ‘एज्युटेनमेंट’ (एज्युकेशन अधिक एंटरटेनमेंट म्हणतात). ‘मल्टिमीडिया’ तसेच ‘इंटरअॅक्टिव्ह थ्री-डी’ (परस्परसंवादी त्रिमिती) मुळे शिक्षणक्रमात ‘एक्सबॉक्स’ किंवा ‘प्लेस्टेशन’सारख्या ‘गेमिंग सॉफ्टवेअर्स’वर आधारित तंत्राचाही समावेश राहील. त्याचप्रमाणे छापील पुस्तके, वृत्तपत्रे यांची संख्या कमी होऊ लागेल व त्याजागी ‘ई-बुक्स’ वा ‘ई-न्यूजपेपर्स’चा वापर वाढेल. यामुळे इंटरनेटवरील साहित्याचे तसेच शैक्षणिक पुस्तकांचे स्वरूप अधिक मनोरंजक आणि देखणे बनेल व त्यामध्ये चटकन बदल घडवणेही शक्य होईल. सौर वा इतर ऊर्जास्रोतांवर आधारित संगणक तसेच स्मार्टफोन उपलब्ध झाल्याने हे शिक्षण तसेच वाचनाचे वेड अगदी दुर्गम भागांपर्यंत पोहोचू शकेल.
टीव्ही क्षेत्रातील क्रांती
त्रिमिती आणि विविध अॅप्समुळे टीव्हीमध्येही फार मोठी क्रांती होईल. सध्या टीव्हीकडून प्रेक्षकाकडे असा ‘वन वे ट्रॅफिक’ असतो आणि कित्येकदा, आपणांस कंटाळा येत असताना, पाचपाचशे वाहिन्या असूनही त्यांवर बघण्याजोगे काहीच नसते! ही स्थिती बदलून टीव्हीदेखील परस्परसंवादी बनेल आणि मुख्य म्हणजे त्यावरील कार्यक्रम, अॅप्सच्या साहाय्याने, प्रेक्षकाच्या पसंतीनुसार तयार करता येतील (कस्टमायझेशन). टीव्हीसाठी ही मोठी उडी असणार आहे. तसेच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची पातळी वाढून त्याचा वापर व्यावसायिक संबंधांची व्याप्ती वाढवण्यासाठी केला जाईल.
गतिमान प्रशासन
व्यक्तिगत तर सोडाच, परंतु औद्योगिक, सामाजिक आणि सार्वजनिक पातळीवर संगणकाच्या या विविध अवतारांचे अत्यंत क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम होतील. अनेक पारंपरिक संकल्पना मोडीत निघून नव्या पद्धती चटकन रुळतील. सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर हा बदल प्रामुख्याने जाणवेल. कारण, अशा तर्हेचे काळाबरोबर चालणारे बदल तेथे अनुभवण्याची आपल्याला आत्तापर्यंत कधीच सवय नव्हती! ‘इन लाईन’चे रूपांतर ‘ऑनलाईन’ व्हायला थोडा वेळ लागेल, पण ते होणार हे नक्की! इंटरनेटचे जाळे आजच्या कित्येक पटींनी पसरेल आणि त्याचा फायदा ग्रामीण, गरीब व दुर्गम भागांत राहणार्या कोट्यवधी नागरिकांना होईल. शहरी वा साधारण सुस्थापित भागात राहून बर्यापैकी आर्थिक पातळीवरचे जीवन जगणार्यांना खेड्यापाड्यांत आणि वाड्यावस्त्यांमध्ये होऊ घातलेल्या या क्रांतीची सुस्पष्ट कल्पना येणे, हे खरोखरीच कठीण आहे. हाताशी सर्व तांत्रिक उपकरणे असलेल्या शहरवासीयांच्याही आयुष्यात ‘ई-शासना’सारख्या सुविधेमुळे फरक पडतो आहे. तिथे सर्वथा अभावग्रस्त जीवन जगणार्यांची काय कथा! आता तर सौरऊर्जेवर चालणारे संगणक येऊ घातले आहेत. त्यामुळे वीजटंचाईदेखील या तंत्रक्रांतीला थोपवू शकणार नाही!
आपल्या आसपासच्या ‘डिजिटल’ विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार आहे. त्यामुळेच या तंत्राचे व्यावहारिक उपयोगदेखील वाढताना दिसणार आहेत. बघा ना, गाड्या आपोआप चालत आहेत, वायरीशिवाय उपकरणे काम करत आहेत, उडणारे ड्रोन कॅमेरे... अशा अनेक गोष्टी आपल्याला नकळत चकीत करतील. आपले जीवन कळत-नकळत ‘स्मार्ट’ होत आहे आणि २०२५ नंतर त्याची व्याप्ती खूपच वाढेल. संगणकीय प्रणालींच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रवेशामुळे येत्या फक्त दहा वर्षांत जगाचे व्यवहार फार मोठ्या प्रमणात बदलण्याची शक्यता आहे, नव्हे तर ते बदलणारच आहेत. काळ कोणासाठी थांबत नाही. त्याची पावले ओळखून त्यानुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणार्या व्यक्ती आणि उद्योगच भविष्यातील टिकतील, हे निश्चित!
- डॉ. दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)