विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच भारताने अंतराळ क्षेत्रातही आपल्या अभूतपूर्व कामगिरीने विशेष ठसा उमटविला. त्यामुळे कोणेएकेकाळी अंतराळ प्रगतीच्या बाबतीत विकसित देशांकडून हेटाळणी सहन करावा लागणारा भारत, आज त्याच देशांच्या उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण करतो. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या अंतराळ भरारीचा मागोवा घेणारा हा लेख...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारताच्या अंतराळ विज्ञानाच्या विकासाचा आढावा घेताना प्रथम डोळ्यांसमोर येते ती ‘इस्रो’ संस्था! भारत आज अंतराळ विज्ञानातील एक अग्रणी देश मानला जातो. मूळचे भारतीय असलेले अनेक वैज्ञानिक जगात अनेक संस्थांसोबत काम करीत आहेत. भारतात याची सुरुवात साधारण १९२०च्या सुमारास झाली. कलकत्त्याला एस. के. मित्रा यांनी रेडिओच्या मदतीने ‘आयनोस्फियर’मधील आवाज टिपण्याचे अनेक प्रयोग केले. यानंतर १९४५ मध्ये विक्रम साराभाई आणि होमी भाभा या वैज्ञानिकांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेची स्थापना केली. १९५० मध्ये अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. १९५४ मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी ‘आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस’ आणि १९५७ मध्ये उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथे रंगपूर वेधशाळा स्थापन करण्यात आली. १९५७ सालामध्ये रशियाने ‘स्पुटनिक-१’ यान अंतराळामध्ये पाठवून जगाला भव्य स्वप्ने दिली आणि भारतही अंतराळामध्ये झेप घेण्याची स्वप्न पाहू लागला. विक्रम साराभाई यांच्या आग्रहावरून १९६२ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अंतराळ संशोधन समिती स्थापन केली.
विक्रम साराभाई यांना थुंबा हे केरळमधील गाव पसंत पडले. येथून रॉकेट प्रक्षेपण होऊ शकते, हा विचार त्यांच्या मनात आला आणि गावातील लोकांनी मान्यता दिल्यावर दि. २१ नोव्हेंबर, १९६३रोजी ‘थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन’ स्थापन झाले. ‘रोहिणी’ नावाच्या रॉकेट्सची मालिका येथून प्रक्षेपित झाली. १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समिती रद्द करून त्याचे नामकरण ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ असे करण्यात आले.‘इस्रो’चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अंतराळात प्रवेश करण्यासाठी प्रक्षेपण वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करणे. तसेच, पृथ्वीचे निरीक्षण, दळणवळण, नेव्हिगेशन, हवामानशास्त्र आणि अवकाश विज्ञान यासाठी उपग्रह आणि संबंधित तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करणे होय. अंतराळ रॉकेट्स, उपग्रह यांची रचना आणि विकास करणे, पृथ्वीबाहेरील वातावरण आणि खोलवरच्या अंतराळाचे अन्वेषण व संशोधन करणे, हीदेखील ‘इस्रो’ची उद्दिष्टे आहेत. ‘इस्रो’ने भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातदेखील आपले तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सुरुवातीला महत्त्वाकांक्षी मोहिमा आखणे तितके सोपे नव्हते. १९६३ मध्ये पहिले रॉकेट प्रक्षेपित केले व त्यानंतर 1967 मध्ये ‘रोहिणी’ रॉकेट्स मालिकेची सुरुवात झाली. १९७५ पासून उपग्रह अंतराळात सोडण्यास सुरुवात झाली. सामान्य माणसाला मात्र ओळख झाली ती ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने. रशियाच्या मदतीने हे प्रक्षेपण दि. १९ जानेवारी, १९७५रोजी करण्यात आले होते. भारताला खगोल अभ्यासाची प्राचीन परंपरा आहे आणि त्यातील एका महान अभ्यासकाचे नाव ‘आर्यभट्ट’या उपग्रहाला देण्यात आले.
दि. १ऑगस्ट, १९७५ ते दि. ३१ जुलै, १९७६ अशी दोन वर्षे ‘साईट’ नावाचा कार्यक्रम ‘नासा’च्या मदतीने राबविण्यात आला. यात संप्रेषण उपग्रह अंतराळात सोडण्यात आला आणि याने भारतातील ग्रामीण जनतेला दूरदर्शन दिसू लागले. हा प्रयोग आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थानमधील २० जिल्ह्यांतील २४०० गावांमध्ये करण्यात आला. या प्रयोगाच्या यशामुळे आपण स्वतःचा उपग्रह कार्यक्रम, ‘इन्सॅट’ तयार करू शकलो. ‘इन्सॅट’ ही बहुउद्देशीय भूस्थिर उपग्रहांची मालिका असून दूरसंचार, प्रसारण, हवामानशास्त्र आणि शोध आणि बचाव कार्ये पूर्ण करण्यासाठी प्रक्षेपित झाली. यातील पहिला उपग्रह १९८२ मध्ये प्रक्षेपित झाला. तत्पूर्वी १९७९ मध्ये भारतात बांधलेला पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह ‘भास्कर-1’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आला.
यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारताचे पहिले प्रायोगिक उपग्रह वाहन (SLV -३) प्रक्षेपित केले गेले. यापूर्वी अशी वाहने प्रक्षेपित करणारे केवळ पाच देश होते. यामुळे भारत जागतिक अंतराळ कार्यक्रमात मानाने उभा राहिला. याच्या मदतीने ‘रोहिणी’ उपग्रह प्रक्षेपित झाला आणि ही मोहीम यशस्वी झाली. यामुळे आपले इतर देशांवरचे अवलंबित्व कमी झाले. पुढे ही मालिका सुरू राहिली. १९८४ साल उजाडले आणि राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात गेला आणि याचे दूरदर्शनने त्याचे सर्वत्र प्रसारण केले.
यानंतर युग आले ते ‘पीएसएलव्ही’चे! याने अंतराळ मोहिमांची गणिते संपूर्ण बदलली. या प्रक्षेपण वाहनांमध्ये कमी खर्चिक आणि प्रभावी कार्य याची अनोखी जोड दिसली. १९९३ मध्ये, ‘पीएसएलव्ही’ने आपली पहिली मोहीम पार पाडली आणि पुढचा प्रवास बहुदा सर्वांना परिचित आहे! ‘चांद्रयान’ आणि ‘मंगळयान’सारख्या ऐतिहासिक मोहिमांसाठी याने कार्य केले आणि पुढे यामधून अनेक उपग्रह प्रक्षेपित केले जातील, यात शंका नाही. 90चे दशक ‘पीएसएलव्ही’ला वाहिलेले होते.
२००० चे दशक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. जगामध्ये इतरत्र चंद्र आणि इतर जवळील ग्रह, धूमकेतू, लघुग्रह मोहिमा आखल्या जात होत्या. भारत विकसनशील देश असूनही त्याकाळी या स्पर्धेत उतरला. ‘कल्पना-१’ हा १२ सप्टेंबर रोजी ‘पीएसएलव्ही’चा वापर करून प्रक्षेपित केलेला पहिला हवामानविषयक समर्पित उपग्रह होता. मूळच्या भारतीय पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन झाल्यावर २००३ मध्ये याला ‘कल्पना’ हे नाव देण्यात आले. दि. २० सप्टेंबर, २००४ रोजी ‘एज्युसॅट’ उपग्रह प्रक्षेपित केला. केवळ शिक्षणाला वाहिलेला हा पहिला भारतीय उपग्रह होता. यामुळे पूर्वी सकाळी आणि दुपारी दूरदर्शनवर खास ‘क्लासरूम’ आयोजित केल्या जात असत. २००५ मध्ये ‘कार्टोसॅट-१’ उपग्रह प्रक्षेपित झाला. ही बाहेरून पृथ्वीचे निरीक्षण करणारी मोहीम होती. तसेच, याच सोबत ‘हॅमसॅट’ हा अवघा 42 किलोंचा उपग्रह प्रक्षेपित झाला. हा उपग्रह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय हौशी रेडिओ ऑपरेटर्ससाठी सेवा देणारा होता.
२००८ साल उजाडले ते एक नवी झेप घेण्यासाठी. दिवस दि. २२ ऑक्टोबर, २००८! ‘चांद्रयान-१’ हा चंद्राकडे प्रस्थान करणारा उपग्रह प्रक्षेपित केला. चंद्रावर उतरणारी भारतातील पहिली आणि यशस्वी मोहीम! पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याने भारताला या मोहिमेने अंतराळ विश्वात जगातील पहिल्या सहा देशांच्या पंक्तीला नेऊन बसवले. यापुढे अनेक लहान-मोठे उपग्रह पाठवण्यात आले. परंतु, महत्त्वाचे ठरले ते २०१४ मध्ये प्रक्षेपित केलेले ‘मंगळयान-१.’ ही मोहीम ‘मार्स ऑर्बिटर मिएू’ किंवा ‘मंगळयान’ या नावाने ओळखली जाते. ही मंगळ ग्रहावर जाणारी भारताची पहिली आंतरग्रह मोहीम आहे. दि. २४सप्टेंबर, २०१४ रोजी, ‘मंगळयाना’ने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत अंतराळयान पाठविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. शिवाय अत्यंत कमी खर्चामध्ये आणि संपूर्णपणे स्वदेशी मोहीम यशस्वी झाल्याने भारताच्या पुढील अंतराळ प्रवासाचा स्वतंत्र मार्ग खुला झाला. एवढेच नाही, तर इतर अनेक देश त्यांच्या प्रक्षेपणासाठी भारताकडे येऊ लागलेले होते, त्यांच्या संख्येतही वाढ झाली.
या सर्व प्रक्षेपणांमुळे आत्मविश्वास निर्माण झाला. उत्तम तंत्रज्ञान आणि प्रतिभा याचा अनोखा संगम यामध्ये पाहायला मिळत होता. खगोलशास्त्राला वाहिलेली ‘अॅस्ट्रोसॅट’ ही भारतातील पहिली समर्पित बहु-तरंगलांबी अंतराळ दुर्बीण आहे. दि. २८ सप्टेंबर, २०१५ रोजी हिचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाच्या यशामुळे, ‘इस्रो’ने ‘अॅस्ट्रोसॅट’चा उत्तराधिकारी म्हणून ‘अॅस्ट्रोसॅट-2’ची योजना देखील आखली आहे. या व्यतिरिक्त अनेक देशांच्या वेगवेगळ्या उपग्रहांचे प्रक्षेपण जोमाने वाढले. उपग्रहांची संख्या आणि वारंवारता दोन्हीमध्ये वाढ झाली. आपले तंत्रज्ञान श्रेष्ठ आणि तुलनेने स्वस्त असल्याने सर्वांना फायदा होऊ लागला. पुढे दि. ६ सप्टेंबर, २०१९ रोजी अजून एक महत्त्वाचे प्रक्षेपण झाले ते म्हणजे ‘चांद्रयान-२’ या उपग्रहाचे. ही एक गुंतागुंतीची मोहीम होती. याचे ‘विक्रम’ लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जरी हवे तसे उतरले नसले, जोरात आपटले असले तरी ही मोहीम अयशस्वी म्हणता येणार नाही. कारण, यामधून आजही अत्यंत उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढे २०२६ पर्यंत त्याचे कार्य चालू राहील, अशी अपेक्षा आहे.
२०१६ ते २०२० या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे उपग्रह सोडण्यात आले. यामध्ये भारतासाठी अनोखे ठरले ते वर्ष म्हणजे २०१७. दिवस १५ फेब्रुवारी! रशियाचा जागतिक विक्रम मोडीत भारताने एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यात अनेक देशांचे उपग्रह होते. रशियाने यापूर्वी जो विक्रम केला होता, त्यामध्ये २०१४ साली एकाच वेळी ३७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. यामुळे भारत ज्या रांगेत जाऊन बसला होता, तेथील त्याचे स्थान अढळ झाले.यानंतरचा काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरला. ‘कोविड’च्या विळख्यात सगळे जग सापडले आणि संशोधन क्षेत्र दुर्लक्षित झाले. अनेक मोहिमा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु, सर्व खगोलप्रेमींना वेध लागले आहेत ते पुढील तीन मोहिमांचे. एक म्हणजे ‘आदित्य-एल १’. ही मोहीम सूर्याच्या अभ्यासासाठी तयार केली आहे. दुसरी म्हणजे ‘चांद्रयान-३.’ आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ‘गगनयान-१’ मोहीम. ‘गगनयान’ ही भारताची पहिली मानवी मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी झाली की, भारत मानवी मोहिमांमध्ये देखील अग्रेसर देश असेल यात शंका नाही. या सर्व मोहिमा २०२३ ते २४ कालावधीमध्ये प्रक्षेपित होतील, असा अंदाज आहे.
आज जगामध्ये अंतराळ क्षेत्रात अग्रेसर असणार्या दहा देशांमध्ये भारत साधारण पाचव्या क्रमांकावर आहे. हे नक्कीच गौरवास्पद आणि अभिमानस्पद आहे. याचा संपूर्ण आढावा एका लेखात मांडणे शक्य नाही. आजच्या दिसणार्या या देदीप्यमान यशामध्ये अनेक वैज्ञानिक आणि अनेक संस्थांचे योगदान आहे. ही यादी खूप मोठी आहे. भारतामध्ये प्रतिभेचे भांडार आहे आणि युवकांमध्ये प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे. अंतराळविज्ञान क्षेत्रामध्ये आपण काही वर्षांमध्ये अजूनही अग्रणी असू, असा विश्वास वाटतो!
- सुजाता बाबर