आज जगभरात असे कुठलेच क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला नाही. कृषी क्षेत्रापासून ते विज्ञान-संशोधनापर्यंत आज भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि उत्तरोत्तर या क्षेत्रातील भारताची प्रगती सुखावणारीच म्हणावी लागेल. तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गेल्या ७५ वर्षांतील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख...
फार दिवस लोटले नाहीत या गोष्टीला- जानेवारी २०२० ची गोष्ट. भारतात ‘कोविड-१९’चा रुग्ण आढळून आला. त्याच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी केरळहून महाराष्ट्रात - पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’मध्ये नमुना पाठवला गेला होता. त्या सुमारास अशी तपासणी करणार्या भारतात केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था होत्या. ‘कोविड-१९’चा धोका लक्षात घेता भारतात तत्काळ तपासणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. ती केवळ एक महिन्यात ३० झाली आणि पुढील महिन्यात १५० झाली. जुलै २०२०मध्ये भारतात एक हजारांच्या वर तपासणी केंद्रे होती, तर नोव्हेंबर २०२० मध्ये ही संख्या दोन हजारांच्या पुढे जाऊन पोहोेचली. ‘कोविड-१९’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला असताना रुग्णसंख्या किती आहे, कुठे आणि किती प्रमाणात साथ पसरते आहे, साथीला आळा कसा घालता येईल, आदी नियोजनासाठी तपासणी केंद्रे जवळजवळ २४ तास चालू ठेवणे आवश्यक झाले होते. साथरोगाला आटोक्यात आणणयासाठी, रोगाचे लवकर निदान करून देण्यासाठी या सर्व केंद्रांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली. पुढील वर्षार्ंत ‘कोविड-१९’ची लस शोधली गेली आणि लसीकरण वेगाने सुरू झाले. पाहता पाहता त्याचेही मोठे आकडे गाठले गेले. कुठून आली ही सर्व तपासणी केंद्रे आणि लसीकरण केंद्रे? ती चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ कुठून आले? त्यांना लागणारी सामग्री, टेस्टिंग किट्स आदी कुठून आले?
कोट्यवधी लोकांची तपासणी करणारे आणि लसीकरण करणारे लोक भारतीयच होते आणि बहुतांश सामग्रीही भारतातच तयार होत होती. ‘आरटीपीसीआर’ सारखी किचकट तपासणी करू शकणारी प्रशिक्षित माणसे इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे. तसेच, ‘टेस्टिंग किट्स’चे, लसींचे प्रचंड उत्पादन करणे या काही सोप्या गोष्टी नाहीत. हे टप्पे आपण गाठू शकलो. कारण, या जीव विज्ञान, आरोग्य विज्ञान तसेच औषध निर्मिती आदी क्षेत्रात काम करणारे मोठे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याकडे आहे. मात्र, काही योगायोग नाही. गेल्या अनेक वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये भारतीय विज्ञान जगताने घेतलेल्या आघाडीचे हे फलित आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर गेल्या ७५ वर्षार्ंत भारताने ज्या अनेक क्षेत्रात प्रगती केली, त्यातील एक म्हणजे विज्ञान. ही प्रगती जरी हळूहळू होत असली तरी ती निश्चितपणे होते आहे आणि तिचा वेग गेल्या काही दशकांत वाढला आहे. अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्रच पावले टाकत पुढे जात आहेत, हेही आपण पाहतो आहोत. भारतातील विज्ञान क्षेत्र फार जुने असले तरी या लेखात ७५ वर्षांचा टप्पा गाठताना विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक मागोवा आपण घेऊ.
अन्नधान्य उत्पादन आणि हरितक्रांती
१९५०च्या सुमारास भारतात अन्नधान्य उत्पादन वाढत्या लोकसंख्येला पुरेसे ठरत नव्हते. भारताला अनेक वेळेस धान्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिको येथे विकसित केलेले गव्हाचे नवीन वाण भारतात आणले गेले. हे वाण भारतात गव्हाचे उत्पादन वाढवणारे ठरले. लवकरच पुढे केवळ गहूच नव्हे, तर तांदूळ, मका, डाळी, सोयाबीन आदी उत्पादनातही नवीन वाणे विकसित झाली आणि भारतात अन्नधान्य उत्पादन लक्षणीय वाढले. १९६४ साली केवळ सहा दशलक्ष टन असणारे आपले गव्हाचे उत्पादन २०२१ साली सुमारे १०९ दशलक्ष टन झाले! तसेच एकूण धान्य उत्पादन आज ३०० दशलक्ष टनांच्या वर जाऊन पोहोचले आहे. आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण तर आहेच, शिवाय अनेक देशांना निर्यातही करतो आहे. भरपूर उत्पादन देणारे आधुनिक बियाणे, वाढलेले सिंचन क्षेत्र आणि एकूणच आधुनिक होत जाणारी कृषी उत्पादन व्यवस्था याचे हे फलित आहे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन हे या क्षेत्राचे भारतातील जनक समजले जातात. कृषी विद्यापीठांनी आणि या क्षेत्रात काम करणार्या इतरही सर्व संस्थांनी कृषीविज्ञान क्षेत्रात गाठलेली ही प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे.
दुग्ध उत्पादन आणि धवलक्रांती
जसे भारतात अन्नधान्य उत्पादनाचे आव्हान होते तसेच दूध उत्पादनाचेही होते. १९५०च्या दशकात भारत युरोपीय देशांकडून मोठ्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थांची आयात करत होता. खरंतर स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच त्रिभुवनदास पटेल यांनी कैरा इथे सहकारी दूध उत्पादन सुरू केले होते. मात्र, वर्गीस कुरियन यांनी १९४९ साली आणन्दच्या दूध उत्पादन केंद्राची जबाबदारी स्वीकारली आणि धवलक्रांतीचा पाया रचला. त्यांनी उत्पादन, साठवण आणि वितरण यात खूप सुधारणा तर केल्याचं, शिवाय केवळ गायीच्या दुधाची भुकटी बनवणे शक्य आहे असे नाही, तर म्हशीच्या दुधाचीही भुकटी बनवणे शक्य आहे, हे दाखवून दिले. त्यांचे सहकारी एच. एम. दालया यांनी युरोपीय देशांनाही न जमलेली ही किमया करून दाखवली. १९७० साली भारताने सुरू केलेला ’ऑपरेशन फ्लड’ हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादन आणि त्याचे आधुनिकीकरण करणारा कार्यक्रम होता. आज भारतही दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांत आघाडीवर आहे. १९५०साली भारतात केवळ १७ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होत होते, तर ते २०२१ साली ते सुमारे १९८ दधलक्ष टन झाले! दुधाचे उत्पादन, संकलन, साठवणूक आणि त्यावर प्रक्रिया या सर्वच बाबतीत विज्ञानावर आधारित सुधारणा मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्यामुळे हा टप्पा आज भारताने गाठला आहे.
हरित आणि धवलक्रांतीबरोबरच भारताने नीलक्रांतीही घडवली. भारताला मोठा सागरी किनारा आहे आणि बहुतांश राज्यांमध्ये गोड्या पाण्यातील मासेनिर्मितीसुद्धा होते. मासे आणि इतर उपयुक्त जलजीवांचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी विज्ञानावर आधारित असे अनेक उपक्रम केले गेले. त्यांचा उपयोग फक्त उत्पादन वाढवण्यासाठी नाही, तर ते टिकवण्याच्या आधुनिक पद्धती आणि दर्जा वाढवण्यासाठीदेखील होतो आहे. खार्या पाण्यातील मत्स्यपालन करताना साथीच्या रोगाने अनेक जलजीव मृत्युमुखी पडू शकतात. यापासून त्यांना वाचवण्यासाठी योग्य औषधे विकसित करणे, वैज्ञानिक पद्धती शोधणे आणि ते ज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांना प्रशिक्षण देणे असे प्रचंड मोठे काम या क्षेत्रातील संशोधकांनी केले आहे.
औषधे आणि लसींची निर्मिती
आज भारत जगाचे औषधनिर्मिती केंद्र समजले जाते आणि जगातील दर सहामधील एक बालक भारतात उत्पादित झालेली लस घेते. भारत केवळ विकसनशील आणि अविकसित देशांनाच नव्हे, तर विकसित देशांनाही औषधे निर्माण करून देतो. १९५०च्या दशकात भारत आधुनिक औषधांसाठी परदेशी कंपन्यांच्या महागड्या औषधांवरच अवलंबून होता. ही गरज लक्षात घेऊन भारताने या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधन संस्था उभ्या केल्या. त्यांनी लक्षणीय कार्य, तर केलेच शिवाय खासगी क्षेत्राबरोबर सहकार्य करत सर्वसामान्य भारतीयाला परवडणार्या दरात औषधे उपलब्ध होतील, अशा उत्पादनांचा पाया घातला. शिवाय या अवघड समजल्या जाणार्या क्षेत्रात काम करू शकतील, असे लाखो लोक प्रशिक्षित केले. लेखात वर दिलेले ‘कोविड टेस्टिंग’ आणि लसनिर्मितीचे उदाहरण हे जैवविज्ञान, औषधे आणि लसींची निर्मिती या क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगतीचे द्योतक आहे.
अंतराळ विज्ञानआणि खगोल विज्ञान
अंतराळ विज्ञान आणि उपग्रह निर्मिती हा जरी बहुतांश तंत्रज्ञानाचा विषय असला तरी तो विज्ञानावर आधारित आहे. उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी शेतजमिनीचे मापन, भूमापन, आरेखन, वनजमीन आणि जलसाठे, नद्यांचे प्रवाह आणि आजूबाजूची गावे-शहरे यात होणारे बदल, हवामान बदल, तापमान-पाऊस यातील बदल आणि त्यांची भाकिते, अशा अनेकविध क्षेत्रात उन्नती केली आहे.
‘चांद्रयान’ आणि ‘मंगळयान’ यांसारख्या मोहिमांमधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करून संशोधकांनी चंद्र आणि मंगळ या दोन्हीबद्दल जगाला असलेल्या माहितीत मोलाची भर घातली आहे. ’LIGO’ सारखी वेधशाळा भारतात उभी करण्यासाठी ‘LIGO - India' ची उभारणी महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांपासून वेगाने सुरू आहे. ’LIGO - India’ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर त्याद्वारे अनेक मोठे संशोधन कार्यक्रम सुरू करण्याची भारताची योजना आहे. शिवाय खगोल विज्ञानात अनेक भारतीय संशोधन संस्थांमधील वैज्ञानिकांनी आजवर मोलाचे योगदान दिले आहे.
इतर काही क्षेत्रे
१९७० पर्यंत रक्त साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरल्या जात. मात्र, हे जिकिरीचे आणि इन्फेक्शनला आमंत्रण देणारे ठरत असे. रक्ताची देशातील मागणी पाहता रक्त साठवणे, योग्य ठिकाणी, योग्य वेळेत उपलब्ध करून देणे हे नेहमी आव्हानात्मक ठरत असे. यावर उपाय म्हणून आता आपण पाहतो त्या विशिष्ट पिशव्या भारतात मुद्दाम विकसित केल्या गेल्या आहेत.
निवडणुकीत मतदान केले की, बोटावरची शाई दाखवणारे फोटो आपण कौतुकाने सोशल मीडियावर पाठवतो. या पुसल्या न जाणार्या शाईचा प्रयत्नपूर्वक लावलेला शोध, तिचे उत्पादन आणि पुरवठा यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आज भारत या मतदानाच्या शाईचे उत्पादन स्वतःसाठी तर करतोच, शिवाय १५ पेक्षा जास्त देशांना शाईचा पुरवठा करतो. भारतातील विविधतेचा, पुरातन मान्यतांचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणे; शिवाय आधुनिक भारतातील सामाजिक, आर्थिक, सामरिक आव्हानांचा अभ्यास करणे यातही अनेक संशोधकांचे योगदान आहे.
भारत ज्ञानाधिष्ठित समाज म्हणून प्रगत होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभिनव, रंजक आणि प्रेरक पद्धतीने विज्ञानाची गोडी निर्माण करणे, अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था उभारणे, शास्त्रीय संशोधनाला पुरेसा निधी पुरवणे, त्यासाठी आवश्यक तिथे खासगी क्षेत्रे व परदेशातील संस्थांची मदत घेणे, आदी प्रयत्न भारतात सुरु आहेत. मात्र, सारेच काही आलबेल नाही. आजही वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांना निधी मिळवताना विविध पातळीवर अडचणींचा सामना करावा लागतो. लालफितीला आणि नोकरशाहीला तोंड देताना मोलाचे संशोधनाचे दिवस आणि श्रम वाया जातात. पुरेशी साधने न मिळू शकल्याने अनेक प्रकल्प अडकून पडतात. मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्यासाठी विशेष आधुनिक संशोधन संस्था, सामग्री; प्रशिक्षण देण्याच्या पुरेशा सुविधा व निधी; संशोधकांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण अहवालांना स्वीकारण्याचे सरकारी पातळीवरील आवश्यक धाडस, अशा अनेक गरजा अजून आहेत.
समाजाचे आयुष्य सुखी करणात शास्त्रीय शोधांचे व प्रगतीचे शिल्पकार असणार्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञाचे योगदान निश्चितपणे मोठे आहे. भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहेत. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न होत आहेत. यातूनच पुढचे वैज्ञानिक आणि विवेकी नागरिक घडतील. शास्त्रीय संशोधन समाजाभिमुख असावे, देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, अशी भूमिका भारतीय विज्ञान जगताने निभावली आहे. ७५ वर्षांमध्ये आपण देश म्हणून विज्ञान क्षेत्रात जी प्रगती केली, त्यापेक्षा जास्त प्रगती पुढील ७५ वर्षांत करू शकू, अशी आशा आहे.
- अपर्णा जोशी
(लेखिका ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुणे येथे ‘सिनियर टेक्निकल ऑफिसर’ म्हणून कार्यरत आहेत.)