’सलाम वर्दी’ हे भारतीय सैन्य दलातील कर्तबगार अधिकार्यांची आत्मकथने असलेलं, गोपाळ अवटी संपादित पुस्तक नुकतंच ‘दिलीपराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालं आहे. उत्तम आणि वैविध्यपूर्ण वाचनाच्या शोधात असणार्या वाचकांसाठी तसेच आपल्या देशाच्या विविध पैलूंविषयी विशेषतः सशस्त्र सैन्यदलांविषयी विविधांगांनी जाणून घेण्याची उत्सुकता असणार्या मुले आणि तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे विशेष उपलब्धी आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, १९७१च्या विजयी युद्धाला ५० वर्ष पूर्ण होत असताना म्हणजेच स्वर्णीम विजय वर्षात आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींच्या पहिल्या तुकडीचा प्रवेश अशा सैन्यदलांसंदर्भातल्या तीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या वर्षात हे पुस्तक वाचकांच्या हाती येणं, हा विशेष योग आहे.
सैन्यदलाच्या सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा जपणारे, मराठी मातीतले अनेक वीर आणि आता वीरांगनाही सेनेच्या भू, वायू आणि नौदलात भरीव कामगिरी करत आले आहेत. अशा 31 मराठी सैन्य अधिकार्यांच्या, पुणे आकाशवाणी केंद्रावरून झालेल्या मुलाखतींमधून उलगडलेला जीवनपट त्यांच्याच शब्दांत या पुस्तकात मांडला आहे. यापैकी बहुतेक अधिकारी सैन्यातल्या कामगिरीबद्दल सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले आहेत.
१९६५च्या तसेच १९७१च्या भारत- पाक युद्धात ‘मुक्ती वाहिनी’चं कार्य, श्रीलंकेतलं भारतीय लष्करानं केलेलं शांतीसेनेचं काम, ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ची स्थापना, कारगिल युद्ध, ‘आयएनएस विराट’ भारतात आणून त्यावर चार वर्ष केलेलं काम, भारताच्या ईशान्य सीमेवर होणारी घुसखोरी आणि अशांततेत सैन्यानं केलेलं काम, ‘सर्जिकल स्टाईक’, पाकव्याप्त काश्मीरमधील कामाचे अनुभव, सियाचीनच्या आत्यंतिक अवघड वातावरणात सीमा रक्षणासाठी होत असलेलं काम, देशांतर्गत होत असलेलं लष्कराचं दहशतवाद विरोधी काम, आर्मी युनिटमध्ये प्रवेश करणार्या पहिल्या महिला अधिकारीचे अनुभव, संरक्षण दलातील सामानाचे लॉजिस्टिक्स व पुरवठा करणारी अधिकारी, ३५व्या वर्षी देशसेवेसाठी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात दाखल झालेली वीरपत्नी असे अनेक थरारक अनुभव व प्रत्यक्ष त्या त्या अधिकार्यांच्या शब्दांत संयत, परंतु स्पष्ट आणि वस्तुस्थितीची, वास्तवाची पूर्ण कल्पना देणार्या शब्दात वाचणं केवळ रोमांचकारी नाही, तर देशवासीयांच्या सुरक्षेचं मोल कुठे आणि कसं मोजलं जात असतं, याची जबाबदार जाणीव करू देणारं आहे. ‘’बांगलादेश मुक्तिसंग्रामाविषयी माहिती देणार्या साहित्यामधील हे अद्वितीय योगदान आहे.
मराठीमध्ये भारतीय लष्कराच्या अंतर्गत कामकाजाची आणि लष्कराच्या मनोभूमिकेची माहिती देणार्या मोजक्याच पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा समावेश आहे,” या शब्दांत भारताचे माजी सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांनी या पुस्तकाचे महत्त्व वर्णन केले आहे. एअर मार्शल भूषण गोखले यांनी अतिशय समर्पक अशी प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहिली आहे.
खरोखरच पुस्तकात कथन केलेले युद्धाचे प्रसंग वाचताना वाचकाला त्या त्या व्यक्तीशी जोडले गेल्याचा अनुभव येतो. तसेच मानवी चेहरा असलेले एकमेव सैन्यदल या भारतीय लष्कराच्या असलेल्या कीर्तीबद्दल मनात अभिमान दाटून येतो.
या सर्वच अधिकार्यांच्या कथनातून देशप्रेम, कार्यनिष्ठा आणि शिस्त हे घटक त्यांच्या आयुष्याचा कणा आहे, हे जाणवतं. सैन्यातले जीवन ही नोकरी नाही, तर एक जीवनशैली आहे, जी तुमचं व्यक्तिमत्व फुलवते. तिथल्या कामात असणार्या धोक्यांपेक्षा ही जीवनशैली खूप सुंदर व समृद्ध असल्याची जाणीव हे पुस्तक वाचताना सतत होते. आपल्या दोन मुलांपैकी एक तरुण वयात हुतात्मा झालेला असतानाही दुसर्या मुलाच्या सैन्य दलात भरती होण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना दिसतात.
सामान्य माणसाकडून सैनिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्या सैनिकांच्या मनातल्या एका प्रश्नातून इथे व्यक्त होतात. तो प्रश्न म्हणजे ‘आर यू बिहाइंड अस? ऑर आर यू आफ्टर’ अस?’ समाज सदैव सैनिकांबरोबर आहे याचं खात्रीशीर उदाहरण सैनिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, नुसती कोरडी सहानुभूती नको. ही अपेक्षा आपणा सर्वांना परिस्थितीचं भान देते,तर दुसर्या एका कथनात एका रेल्वे स्टेशनवर झालेल्या सैनिकांच्या सत्काराच्या वेळी तिथल्या भिक्षेकर्यांनी ३५०० रुपये जमवून सैनिक वेल्फेअर बोर्डासाठी दिल्याचं उदाहरण वाचताना हा मानवतेचा पाझर आणि कर्तव्याची जाणीव पाहून मन थक्क होतं.
या सर्व अधिकार्यांच्या शौर्यगाथा त्यांची धडाडी, समर्पण या कथनांतून आपल्याला कळतातच त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग सर्व कथनांतून आणि एका स्वतंत्र मुलाखतीतून समोर येतो तो म्हणजे; सैन्य दलातील अधिकार्याला त्याच्या पत्नीच्या मिळालेल्या साथीचा.
पत्नीची भूमिका सैन्य अधिकार्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची असते. पतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याच्या जीविताची सतत धास्ती असणे, कुटुंबापासून दूर असणार्या पतीच्या अनुपस्थितीत मुलांचे संगोपन, घरातील ज्येष्ठांची काळजी इतर कर्तव्ये, युनिटमधील सैनिकांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांचं मनोधैर्य राखणे, अशा अनेक जबाबदार्या अधिकार्याची पत्नी निभावत असते. ते अधिकार्यांना फार मोठा दिलासा देणारे असते. त्यामुळे खरं तर ’आर्मी वाईफ इज या सायलेंट रँक’ हे या सर्व अधिकार्यांनी मनोमन मान्य केल्याचे दिसते, त्याबद्दल त्यांना सर्व स्त्रियांबद्दल अतिशय आदर असल्याचं जाणवतं.
सैन्यात कुणाचंही कुटुंब एकेकटं नसतं, हे केवळ सांगण्यापुरतं नसतं. सारेच जण अख्ख युनिट हेच एक कुटुंब असल्याचं मानत असल्याचा प्रत्यय कायमच येतो. वेगवेगळे सण एकत्र साजरे करण्याच्या आठवणी, ‘बडा खाना’या विशेष प्रसंगाच्या आठवणी काढताना किंवा कुठल्याही मोहीम, कामगिरीचं वर्णन करताना अधिकारी नेहमीच सहजपणे ‘माझे जवान’ असाच उल्लेख करत असल्याचं आवर्जून लक्षात येतं. हेच लोक मोकळ्या वेळात वाचन, गाणी ऐकणे, म्हणणे असे छंद जोपासतात, हे वाचून विशेष वाटतं. अनेकांनी निवृत्तीनंतर हे छंद आवर्जून जोपासल्याचं कळतं. कुणी आपल्या अनुभवांचा फायदा सिव्हिलियन्सना मिळावा, त्यांना सैन्यदल तिथल्या संधी यांची ओळख व्हावी म्हणून लेख, पुस्तके लिहिली तर क्वचित कुणी कथा, चित्रपटांसाठी लेखन केल्याचंही उदाहरण वाचायला मिळतं.
तीन रंगातलं अतिशय समर्पक असं मुखपृष्ठ आतला मजकूर वाचायची उत्सुकता निर्माण करणारं आहे. अंतर्गत मांडणीही नेटकी झाली आहे. प्रत्येक अधिकार्याचं रंगीत छायाचित्र त्या अधिकार्याची विशेष उल्लेखनीय कामगिरीसह थोडक्यात करून दिलेली ओळख आणि त्यांच्या कथनातलं सार सांगणार्या ओळीचं शीर्षक असलेलं कथन, वाचकाला एक प्रकारे त्या अधिकार्याचा प्रत्यक्ष सहवास मिळवून देतं. याव्यतिरिक्त अधिकार्यांचे पदक, पुरस्कार स्वीकारतानाची, काम करतानाची आकाशवाणीच्या स्टुडिओत मुलाखत होत असतानाची अशीही छायाचित्रे आहेत. मुलाखती दरम्यान झालेले हे कथन असल्यामुळे कथनाची भाषा सोपी, प्रवाही अशीच आहे. मात्र, काही ठिकाणी वाक्यरचना अनैसर्गिक वाटते. बोलतानाच्या ओघात आलेल्या शब्दांची पुनर्रचना करून केलेली मांडणी जास्त चांगली वाटली असती.
भारतीय सैन्यदलांबद्दल आदर, प्रेम आणि विश्वास असणार्यांनी त्यांच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी आणि त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्माण केलेलं हे पुस्तक एक आदर्श नमुना आहे आणि म्हणूनच प्रत्येक घरासाठी ते संग्राह्य असे आहे असे नक्कीच म्हणता येईल.
- वैशाली कणसकर
पुस्तकाचे नाव : सलाम वर्दी
लेखक-संपादक : गोपाळ अवटी
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पृष्ठसंख्या : 330
मूल्य : 700 रुपये