हिंगोली : राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे समाधान असेल तरी मुसळधार पावसामुळे हिंगोलीत पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हातील वसमत तालुक्यात गावांमध्ये शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेक नागरिक अडकलेले आहेत. या पूरपरिस्थितीवर जिल्हाधिकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करत परिस्थितीची माहिती घेतली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ रेस्क्यू करा आणि योग्य त्या उपाययोजना करा, असा आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
आसना नदीला पूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली असून संपूर्ण कुरुंदा गाव देखील पाण्याखाली गेलं आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारांसोबत फोन वरून चर्चा केली. यावेळी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची व रहाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश यावेळी दिले. पुराच्या पाण्यात अडकलेला नागरिकांची लवकरात लवकर सुटकेसाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याच्या सूचना केली आहे. काही लागल्यास स्वतः कळवावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागातील घरात पाणी शिरले असून तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.