ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर परिसर दुसरे ठाणे म्हणून उदयास येत असले, तरी या भागातील वनक्षेत्रालगत अनेक वनवासी पाडे आहेत. येथील वनवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच राज्यभरातून मुंबई-ठाण्यात शिक्षणासाठी येणार्या वनवासी मुलींना शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध होणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून भाईंदरपाडा येथील लोढा कॉम्प्लेक्स येथे वनवासी मुलींसाठी ठाणे महापालिकेकडील सुविधा भूखंडावर शासकीय वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी १४ कोटी, ६५ लाखांचा निधी नुकताच उपलब्ध करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील वनवासी मुलींच्या वसतिगृहासाठी २०२१-२२ या अर्थसंकल्पात १५० मुलींच्या निवासाची सोय असलेल्या वसतिगृहाला मान्यता देण्यात आली होती. परंतु, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली नसल्याने हे काम रखडले होते. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने भाईंदरपाडा येथील लोढा उद्योग समूहाचा सुमारे २२०० चौ.मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड ठाणे महानगरपालिकेने ‘रेडी रेकनर’च्या दराने घेऊन आदिवासी विभागाकडे सुपूर्द केला. त्यामुळे या वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. त्यानुसार वनवासी मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाला पुढील महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सहा मजली अद्ययावत इमारत...
घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथील लोढा कॉम्प्लेक्समध्ये आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहाची इमारत तळ अधिक सहा मजल्यांची असून इमारतीचे क्षेत्रफळ ४४८२.७५ चौ. मी. इतके आहे. इमारतीच्या तळमजल्याला स्वयंपाकगृह, भोजन कक्ष व भांडारगृह बांधण्यात येणार असून पहिला मजला ते सहाव्या मजल्यापर्यंत मुलींना राहण्याकरिता खोल्या, प्रसाधन गृह, सभागृह व अधीक्षिका निवासस्थान असणार आहे.