मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या क्षेत्रावर निसर्ग वादळाचा झालेला परिणामांचा अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. मंगळवारी दि. २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आला.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दि. ३ जून २०२० रोजी महा प्रचंड 'निसर्ग' वादळाने धडक दिली, आणि त्यामुळे या भागातील बांधकामे, शेतीचे भयंकर नुकसान झाले. तसेच किनाऱ्यावरील अधिवासांवर अतोनात परिणाम झाला. हा परिणाम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. या काळातील मिळालेल्या वृत्तानुसार वादळ-वारे हे जवळपास १२० किमी / तास वेगाने वाहत होते आणि या वादळाचा मध्यबिंदू रायगड जिल्ह्यातील कालींजे गावाजवळ होता. त्यामुळे या भागातील हरणाई, दापोली (दक्षिण), दिवेआगर आणि श्रीवर्धन (उत्तर) भागातील समुद्रकिनाऱ्यावर याचा प्रचंड विपरीत परिणाम झालेला दिसून आला. याच प्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील या प्रकारचे नुकसान झाल्याचे नोंद झाली आहे. 'निसर्ग' वादळाच्या पाठोपाठ त्याही पेक्षा अधिक विध्वंसक असे तौक्ते वादळ १२ ते १९ मे २०२१ च्या दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीच्या समांतर १८० किमी अंतरावरून उत्तरेकडे गेले.
या वादळांच्या परिणामांचा अभ्यास करण्याकरिता राज्याच्या कांदळवन कक्षाने 'सृष्टी काँझरव्हेशन फाउंडेशन'ला आर्थिक सहाय्य पुरविले होते. कांदळवन असलेले आणि कांदळवन नसलेल्या क्षेत्रांवर वादळाचा झालेला परिणाम हा वेगवेगळ्या प्रमाणात झालेला असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यानंतर ते पूर्ववत होत असतानाची पद्धत देखील वेगवेगळी असल्याचे लक्षात येत आहे. हा अभ्यास हा सात समूह क्षेत्रांमध्ये करण्यात आला. यात दिघी - दिवेआगर, आरावी, श्रीवर्धन – कालींजे, वेळास – बाणकोट, केळशी – साखरी, आडे-उतांबर आणि आंजर्ले – पाज या समूह क्षेत्रांचा समावेश होतो.
निसर्ग वादळामुळे सर्वाधिक नुकसान हे सुरु ची वृक्षराजी आणि त्याच्या संबंधातील असलेल्या प्रजातींवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. वाऱ्याचा परिणाम हा जमिनीपासून सुमारे ५-६ मी उंचीवर झाला आहे. सर्वच ठिकाणी सुरुची झाडे हि ५-६ मी च्या वरती पूर्णपणे मोडून पडलेली दिसून आली आहेत तसेच वादळानंतरच्या पुढील दोन वर्षात हि सर्व झाडे मृत झाली. काही ठिकाणी या मृत झालेल्या वृक्षांच्या जागी नवीन झाडे उगवल्याचे दिसून आलेले आहे.
वादळाचा कांदळवन च्या वनस्पतींवरील परिणाम हा प्रत्येक क्षेत्र समूहात वेगळा आहे. वादळाचा कांदळवन च्या वृक्षराजीवरील सर्वाधिक परिणाम, विशेषत: उच्च आणि मध्य परिणाम गटातील कांदळवन त हा केवळ वेळास - बाणकोट (५७ हे) आणि दिघी – दिवेआगर (३० हे) क्षेत्रापुरता सीमित आहे. एकंदरीत कांदळवन वर झालेला हा सर्वाधिकपणे वेळास - बाणकोट आणि त्यानंतर अनुक्रमे दिघी – दिवेआगर, श्रीवर्धन – कालळींजे, आंजर्ले – पाज, आडे-उतांबर, केळशी – साखरी, आणि आरावी या क्षेत्रात आढळून आला.
कांदळवन नसलेल्या क्षेत्रात वादळाचा सर्वाधिक परिणाम, विशेषत: मध्यम ते दाट कांदळवन गटात दिघी – दिवेआगार (११६ हे) आणि त्यानंतर केळशी – साखरी (४८.९९ हे) क्षेत्रात पहावयास मिळाला. परंतु एकंदरीत क्षेत्रातून गोळा केलेल्या माहितीनुसार कांदळवन नसलेल्या भागात वादळाचा सर्वाधिक परिणाम हा अनुक्रमे दिघी – दिवेआगर, वेळास – बाणकोट, केळशी साखरी, आंजर्ले – पाज, श्रीवर्धन - कालींजे, आडे-उतांबर आणि आरावी क्षेत्रात दिसून आला आहे. कांदळवन नसलेल्या भागात झालेले मोठे नुकसान हे मुख्यत्वे समुद्रकिनाऱ्या जवळील सुरु आणि नारळाच्या बागा ह्या उन्मळून पडल्यामुळे किंवा मृत झाल्यामुळे झाल्याचे दिसून आले आहे.
कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या भागात वादळामुळे परिणाम झालेल्या भागाची सापेक्ष व्याप्ती लक्षात घेता हे दोन्ही भाग वेगवेगळ्या प्रकारचे अनुमान दर्शवित आहे. हे अनुमान हे कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या भागांचे झालेले नुकसान पूर्ववत करण्यासाठी जी योजना आखावी लागणार आहे त्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. याच आधारावर आडे-उतांबर क्षेत्रात सर्वाधिक नुकसान हे कांदळवन जंगलांना झाले आहे.
या वादळामुळे ७२% कांदळवन क्षेत्राला नुकसान झाले आहे. यानंतर अनुक्रमे वेळास – बाणकोट (५३%), आंजर्ले – पाज आणि आरावी (प्रत्येकी ४८%), केळशी – साखरी (२८%), , श्रीवर्धन – कालींजे (२३ %) आणि दिघी – दिवेआगार (२१%) या क्षेत्रांना नुकसान झाले आहे. याच प्रमाणे आडे – उटंबर`भागात कांदळवन नसलेल्या क्षेत्रातील सर्वाधिक परिणाम (४७%) पहावयास मिळतो. या नंतर अनुक्रमे केळशी – साखरी (४१%), वेळास – बाणकोट (३९%), आंजर्ले – पाज (२७%), श्रीवर्धन – कालींजे (2४%), दिघी – दिवेआगार (२०%) आणि आरावी (१४%), या क्षेत्रांचा क्रमांक लागतो.