‘जयकारा हे वीर शिवाजी!’

    26-Jul-2022
Total Views | 89
KARGIL
 
 
 
एखाद्या सराईत कथाकाराने कथा लिहावी आणि तसतसे कथानक घडत जावे; रौद्र, वीर, करूण रसाने ती कथा ओतप्रोत भरली जाते. परंतु, जेव्हा समजते ही कथा काल्पनिक नसून सत्य घटना आहे, तेव्हा मन सुन्न होत जाते. परंतु, दुसरे मन अभिमानाने भरून येते. ही सत्यकथा आहे, भारतमातेच्या सुरक्षेचा विडा उचललेल्या दोन जवानांची! कमांडो मधुसूदन सुर्वे आणि कमांडो पांडुरंग आंब्रे यांची! कारगिल विजय दिनानिमित्ताने (दि. २६ जुलै) त्यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधत हीच सत्यकथा पुन्हा जीवंत केली...
 
 
 
 
बालपणापासून फक्त घरातच नाही, तर संपूर्ण गावाची परंपरा होती, सैन्यात भरती होण्याची. ज्या गावात जन्म झाला त्या रत्नागिरी जिल्ह्यात आजही प्रत्येक घरात सैनिक जन्माला येतो, त्याच गावातील मधुसूदन सुर्वे आणि पांडुरंग आंब्रे हे दोघे घनिष्ट मित्र. या दोघांचाही प्रवास जवळपास सारखा होता. एवढेच नाही, तर सैन्यात भरती झाल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेवर जायची वेळ आली, तेव्हाही हे दोघे प्रत्येक मोहिमेत एकत्रच होते. त्यातीलच सर्वांत महत्त्वाची मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन विजय’ म्हणजेच ऑपरेशन ‘कारगिल.’
 
 
 
 
१९९९ साली देशात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यातीलच भारत-पाकिस्तान मध्ये झालेले ‘ऑपरेशन विजय.’ भारतात झालेल्या अणु चाचणीनंतर विविध विषयांना तोंड फुटले होते. त्यातलीच एक ठिणगी म्हणजे १९९९ साली झालेले युद्ध. जम्मू-काश्मीरमध्येज्या काळात बर्फ पडतो तेव्हा प्रत्येकाने आपली पोस्ट म्हणजेच जागा सोडून खाली बेसकॅम्पमध्ये जायचे असते. कारण, या काळात तेथे होणारे दळणवळण, रेशन आदी सर्व गोष्टींचा पुरवठा थांबवला जातो. असे असताना पाकिस्तानी सैन्याने आपला तळ हलवलाच नाही. भारतीय सैन्य ठरल्याप्रमाणे आपल्या बेसला आले. परंतु, त्यांच्या जागेवर पाकिस्तानचे सैन्य येऊन बसले. ही गोष्ट ध्यानी आली ती तेथे राहणार्‍या मेंढपाळांना. आपल्या मेंढ्या-गुरं चरायला नेली असताना त्या पोस्टवर कोणी तळ ठोकून बसलेले या मेंढपाळांना आढळले. ही बाब त्यांनी लगेचच भारतीय जवानांच्या कानावर घातली. मेंढपाळांच्या बघण्यात काही गफलत झाली असेल, भास झाला असेल म्हणून एकदा बघून येऊया म्हणून १७ सैनिक पेट्रोलिंगसाठी गेले. पहिली बॅच साधारण एप्रिलच्या शेवटी गेली होती. हे जे तपासणी करण्यासाठी गेलेले जवान होते ते या दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले आणि त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या जवानांना वाईट प्रकारे मारले, काहींचे धड शरीरापासून वेगळे केले आणि असे त्यांचे मृतदेह खाली बेसवर पाठवून दिले.
 
 
 
KARGIL
 
 
 
 
ही घटना जेव्हा घडली तेव्हा अन्य पोस्टदेखील तपासण्यात आल्या तेव्हा बटालिक, कारगिल, माश्कोव्हॅली अशा सर्व पोस्ट-जवळपास २०० ते २५० किलोमीटर असलेला कारगिलचा भाग त्यांनी काबीज केला होता आणि नंतर भारताच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी हे युद्ध लढण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आणि दि.३मे, १९९९रोजी रणशिंग फुंकले. या युद्धासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य गोळा करण्यात आले. भारतातली पहिली स्पेशल फोर्स म्हणजेच ‘21पॅरा स्पेशल फोर्स’ त्यावेळी बोलावण्यात आली. या युनिटचे वैशिष्ट्य म्हणजे ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात तयार झालेले युनिट होते. कर्नल एस. एस. शेखावत यांनी या स्पेशल फोर्सचे नेतृत्त्व केले होते. त्यांनी आपल्या ‘वाघनखं’ युनिटला प्रोत्साहन देण्यासाठी,
‘हे प्रभू ऐसा वर दे मुझे। विजय मिले या वीरगती।
जयकारा हे वीर शिवाजी। हरहर महादेव’  असे जयघोष दिले. हे युद्धघोष आपोआपच सर्व सैनिकांमध्ये संचारत होते.
 
 
 

war 
 
तत्पूर्वी युद्धाची पूर्वतयारी म्हणून अचानक जेव्हा अनेक सैनिकांचे ‘पोस्टिंग’ कारगिलला झाले, तेव्हा परिस्थिती अतिशय दयनीय होती. हजारो सैनिक एकत्र येत परंतु जेवायचीही सोय नव्हती, झोपायचीदेखील नाही. शिवाय हाडं सुन्न करणारी थंडी. संपूर्ण जम्मू-काश्मीर त्यावेळी या सैनिकांना काबीज करायचे होते परंतु, सर्वांचा बेस श्रीनगर होते, त्यामुळे दिवसाला एक-दोन युनिट्स पुढे पाठवली जात होती. त्यात श्रीनगर आणि कारगिलमधील हवामानात प्रचंड तफावत. जसजसे वर जाऊ तसतसा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. त्यासाठीदेखील तिथे या जवानांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, तोपर्यंत युद्ध सुरू झाले होते.
 
 
 
 
पाकिस्तानी सैन्याने हल्ला करण्यास सुरुवात केली होती. बोफोर्समधून ते एकामागून एक हल्ले करत होते, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्या सैन्याचे नुकसान झाले. अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली. जे जखमी झाले त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे कारगिल युद्धापासून मेडिकल सेवेत सुधारणा करण्यात आली होती. त्यामुळे या युद्धापासून पहिल्यांदाच हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याची सोय करण्यात आली होती. यंत्रणांत सुधारणा करण्यात आल्या होत्या.
 
 
 
 
प्रत्येक युनिटला वेगवेगळ्या पोस्ट देण्यात आल्या होत्या. त्यात तोलोलिंगमधील ‘नीलम पोस्ट’, ‘21 पॅरा फोर्स’च्या अंतर्गत होती. तोलोलिंगमध्ये २४ जूनपासून लढाई सुरू होती. एनएच एक अल्फावरून श्रीनगरच्या रस्त्यावरून लेहला कोणती गाडी जाते, त्या गाडीत किती सैनिक आहेत हे दिसेल, अशी पाकिस्तान्यांकडे दुर्बीण होती. त्यामुळे तोलोलिंगची रक्षा करणे गरजेचे होते. यासाठी मोठ्या शर्थीने १३ जुलैला आपल्याकडे तोलोलिंग घेण्यात आले.
 
 
 
 
 
 
 
कारगिलचे युद्ध हे आधुनिक काळातील सर्वात उंचावर घडलेले युद्ध होते. शिवाय फक्त सामान्य शस्त्रेच नाही तर या काळात अण्वस्त्रेदेखील या देशांकडे नुकतीच आली होती. त्यामुळे, सर्व देशांचेच लक्ष या युद्धाकडे लागून होते. परंतु, या युद्धाचे पडसाद भारताने इतर राज्यांवर उमटू दिले नाहीत व ते कारगिल पुरतेच मर्यादित ठेवलेत, याचे सर्वच देशांनी अंतिमतः कौतुक केले. शिवाय भारताला अंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबादेखील मिळाला होता. त्यामुळे अमेरिकेसह अन्य राष्ट्रांनी सैन्य मागे घेण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला होता. तब्बल दोन महिने तीन आठवडे दोन दिवस सुरु असलेल्या या युद्धात भारताने ‘विजय’ मिळवला.
 
 
 
 
आज चित्रपटांमधून आपण अनेक नायक बघतो. परंतु, दंतकथा वाटाव्या अशा सत्यकथा ऐकल्या की, या जवानांशिवाय आणखी कोणी महानायक असूच शकत नाही हेच खरे ठरते. प्रत्यक्ष सैन्यात जाणे, सीमेवर जाऊन लढणे यासाठी प्रचंड धाडस आणि धैर्याची आवश्यकता आहे. एक साधा माणूस या सैनिकाला काय देऊ शकतो हे सांगताना, थोर कवयित्री इंदिरा संत म्हणतात,
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान।
शूर जवान जे काही देशासाठी करतात त्यासमोर आपण सामान्य नागरिक त्याची काय परतफेड करणार? त्यामुळे आपण फक्त त्यांच्या ऋणातच कायम राहणे, रास्त ठरते!
 
 
 
                                                                                                                               - वेदश्री दवणे 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121