वाशीम : "कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी यायचे असेल तर हिजाब उतरवून या आणि मगच कॉलेज मध्ये या" असे कॉलेज प्रशासनाने सांगत कॉलेज मध्ये नीट (NEET) ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीस प्रवेश नाकारला. १७ जुलै रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान वाशीम मधील मातोश्री शांताबाई गोटे कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. बुरखा काढा नाहीतर कापावा लागेल अशी धमकी कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली असे त्या तरुणीने सांगितले आहे.
नक्की घडलेला प्रकार काय ?
१७ जुलै रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी वाशीम शहरातील मातोश्री शांताबाई गोटे कॉलेज हेही सेंटर होते. परीक्षा देण्यासाठी ती हिजाबदारी तरुणी गेली असताना कॉलेज प्रशासनाकडून पहिले हिजाब उतरवून या मगच प्रवेश मिळेल असे सांगण्यात आले. परीक्षेसाठी हिजाब घालून येण्यास कुठलीही बंदी नाही हे वारंवार सांगूनही कॉलेज प्रशासनाने त्या तरुणीस प्रवेश दिलाच नाही. शेवटी भर रस्त्यातच त्या तरुणीला आपला हिजाब उतरावा लागला, त्यानंतरही त्या तरुणीला चकोलेज कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाली नाही.
सगळे काही नियमानुसारच घडले, कॉलेज प्राचार्यांचे स्पष्टीकरण
ज्या शांताबाई गोटे महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला त्या कॉलेजचे प्राचार्य प्रा. कुबडे यांनी मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, जे झाले ते नियमानुसारच झाले, असे स्पष्टीकरण दिले आहे. झाल्या सर्व प्रकाराबद्दल वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आत पोलिसांकडून पुढील चौकशी केली जाईल असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.