अतिउष्ण तापमान आणि सतत भासणारे पाण्याचे दुर्भीक्ष्य यामुळे पश्चिम भारतातील जनतेला अतोनात हाल सहन करावे लागत असे. रोजच्या वापरासाठी मैलोन्मैल चालत जाऊन हंडाभर पाणी आणावे लागत असे. अशावेळी तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी लोकहितार्थ अनेक ‘पुष्करणी’ निर्मित केल्या. या पुष्करणींचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न...
‘पुष्करणी’, ‘कल्याणी’, ‘वापिका’, ‘वापी’ अशा अनेक नावांचा आपल्या ऐतिहासिक स्थापत्य कलेशी जवळचा संबंध आहे. पार सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत याचे संदर्भ आढळून येतात. मोहंजोदडो आणि ढोलाविया संस्कृतीत पायर्या-पायर्यांच्या विहिरी बांधण्याची कला उगम पावली. ‘हायड्रॉलिक इंजिनिअरिंग’ आणि प्रमाणबद्ध बिनचूक नियोजन यांच्या साहाय्याने पायर्यांच्या विहिरी बांधण्याची प्रथा त्याकाळी प्रगत होत गेली. भारतात उगम पावलेल्या या कलेचा आविष्कार बर्याच आशियायी देशातून तसेच काही युरोपीय देशातून केलेला आढळतो. सातव्या शतकात पश्चिम भारतात प्रामुख्याने अशा विहिरी बांधण्याची प्रथा आणि कला फारच प्रचलित आणि विकसित झाली. येथील बांधलेल्या विहिरी अतिशय कलात्मक आणि स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून आजही आपली ओळख टिकवून आहेत. सातव्या शतकापासून जवळ जवळ एकोणिसाव्या शतकापर्यंत अशा सौंदर्यपूर्ण पायर्या असलेल्या विहिरी बांधण्याची कला प्रगतिपथावर होती.
अतिउष्ण तापमान आणि सतत असणारे पाण्याचे दुर्भीक्ष्य यामुळे पश्चिम भारतातील जनतेला अतोनात हाल सहन करावे लागत. मैलोन्मैल चालत हंडाभर पाणी रोजच्या वापरासाठी आणावे लागत असे. तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी लोकहितार्थ अशा अनेक ‘पुष्करणी’ निर्माण केल्या. वर्षानुवर्षे अविरत काम चालू करून अशा अनेक प्रचंड जलसंचय करणार्या ‘पुष्करणी’ बांधल्या गेल्या. पाण्याला अतिशय पवित्र मानले जात असे. निसर्गाला देव मानण्याच्या संकल्पनेत सूर्य आणि जल हे सातव्या शतकात मानवाचे आद्यदैवत होते. अनेक प्राचीन मंदिर समूहांच्या मध्ये एक सुंदरशी पुष्करणी आपल्या आजही पाहण्यास मिळतात. सात ते आठ फूट खोल असणार्या या वापिकेतली पाण्याची पातळी उन्हाळ्यात खूप खोलवर जाण्याच्या कारणाने खोल निमुळत्या होत जाणार्या पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतील, अशा पद्धतीच्या पुष्करणी ज्याला ‘कल्याणी’ असेदेखील संबोधत, त्या निर्माण केल्या गेल्या.
या सगळ्या निर्मिती मागे लोकहित आणि जनकल्याण हा एकच हेतू होता. पूर्वी केवळ देवदर्शन हाच उद्देश ठेवून लोक पर्यटन करत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्री अशा विहिरी बांधल्या गेल्या, जेणेकरून पांथस्थांना काही काळ तिथे विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होता येत असे. सात ते आठ फूट खोल असलेल्या या वापिकेत अनेक व्हरांडे, झरोके, खोल्या, मोठी मोठी शयनगृहे, विश्रांतीसाठी खास व्यवस्था असे, ज्यामध्ये एका वेळेस कितीतरी मोठा जनसमुदाय आरामात वस्ती करू शकत असे. या भव्य ‘पुष्करणी’ बांधण्याचे प्रयोजन केवळ जलसंचय नसून, या ‘वापिका’ जनसामान्यांना एकत्र येण्याचे एक सांस्कृतिक स्थळ होते. एकत्र येऊन उत्सव आणि सण साजरे करण्याची ती ठिकाणे होती. अतिशय उष्ण तापमानातदेखील वापिकेतल्या आतील भागात अतिशय थंडावा आणि गारवा असून तापमानातील फरक निदान दोन ते तीन डिग्रीने कमी असे. राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून अशी निर्मिती केली की, जेणेकरून अतितीव्र तापमानात जरूर भासल्यास एक आसरा लोकांना उपलब्ध होईल.
महत्त्वाची बाब म्हणजे, एकही बाव ही केवळ राजघराण्याच्या लोकांसाठी मर्यादित न ठेवता लोकांसाठी खुली होती. सातव्या शतकापासून अनेक आक्रमण झाली, जेत्या राज्यसत्तेने आधी प्रस्थापित असलेल्या राज्यवस्तूंचे खंडन करणे, ही नेमाची गोष्ट होती. पण इतिहासात हे महत्त्वाचे ठरते की, एकाही जेत्या राज्यसत्तेने चुकूनही कुठल्याच पुष्करणीला हानी पोहोचवली नाही. पण अजून नवा साजच चढवलाय. त्याकाळी पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व होते आणि त्याचे पावित्र्य जपून पाण्याचा योग्य सन्मान राखला जात असे. आजकाल पाणी ही एक वापरण्याची वस्तू बनले आहे. पाणी सहज विकत मिळते, पण आज आपण त्याचे मूल्य हरवून बसलोय.