मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही असामाजिक घटकांकडून दलित कुटुंबावर अत्याचार करण्यात आल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे. अकोला शहराच्या खदान पोलीस ठाणेअंतर्गत येणार्या कैलास टेकडी परिसरातील दलित कुटुंबावर त्याच परिसरातील एका कुटुंबातील १५ ते २० व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असून घरातील तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींनादेखील पायदळी तुडविण्यात आल्याचा धक्कादायक आणि भीषण प्रकार घडला आहे.
शुक्रवार, दि. १३ मे रोजी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून हल्लेखोर कुटुंबातील नऊ व्यक्तींपैकी सहा जणांवर ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ‘विवेक विचार मंच’च्या काही सक्रिय सदस्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित कुटुंबाची भेट घेऊन आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
साधारणपणे सुमारे तीन वर्षांपूर्वी अकोला शहराच्या कैलास टेकडी भागातील रहिवासी इंगळे कुटुंबातील विशालचे हल्लेखोर कुटुंबातील मुलीशी प्रेमसंबंध होते आणि ते न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करून लग्नदेखील करण्याच्या तयारीत होते. मात्र, कौटुंबिक विरोधाचा दबाव निर्माण झाल्याने विशालचे आणि त्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर विशालदेखील अकोला सोडून नोकरीनिमित्त मुंबई आणि पुण्यात स्थायिक झाला होता.
तीन वर्षांनंतर काही कौटुंबिक कारणांसाठी अकोल्यात आलेल्या विशालवर जुन्या प्रकरणाचा राग मनात धरून हल्लेखोर कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या घरासमोर येऊन विशाल व परिवाराला शिवीगाळ केली. त्यांच्या या शिवीगाळीला विरोध करणार्या विशालच्या कुटुंबातील सदस्यांना हल्लेखोर कुटुंबातील पुरुष आणि काही महिलांनी थेट घरात घुसून मारहाण केली. इतकेच नव्हे, तर घरातील तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचीदेखील विटंबना केल्याचा आरोप पीडित इंगळे कुटुंबाने केला आहे.
‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल; ५ अटकेत
दरम्यान, मारहाण झाल्यानंतर नजीकच्या खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेल्या इंगळे कुटुंबाची पोलिसांनी सुमारे १४ तास कुठलीही तक्रार न घेतल्याचा आरोप तक्रारदार विशाल इंगळेने केला आहे. “शुक्रवारी घडलेल्या प्रकाराची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणार्या पोलिसांनी अखेर शनिवार, दि. १४ मे रोजी रात्री ९.३०वाजता तक्रार दाखल करून घेतली. हल्लेखोर कुटुंबातील सदस्यांपैकी केवळ सहा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील पाच जण अटकेत आहेत. या प्रकरणात थेट सहभाग असलेला सहावा आरोपी बाहेर निर्धास्तपणे फिरत असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही,” अशी तक्रार विशाल इंगळेने दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे केली आहे. “त्यासोबतच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केल्यानंतर दुसर्याच दिवशी माझ्यावर छेडछाडीची खोटी तक्रार माझ्या कुटुंबावर संबंधितांचा दबाव असून काहीजण माझ्या घराभोवती संशयास्पदरित्या फिरत आहेत,” असेही विशालने म्हटले आहे.
दरम्यान, अकोल्यातील दलित कुटुंबाला मारहाण प्रकरणाबाबत ‘विवेक विचार मंचा’चे सदस्य सागर शिंदे म्हणाले की, “पुरोगामी महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना सर्रास घडणे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटनांकडे सरकारने संवेदनशीलपणे पाहून घटनेच्या गांभीर्य ओळखून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे सरकारचे या घटनांकडे दुर्लक्ष होत आहे, तरी सरकारने या घटनांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.” दरम्यान, सदर प्रकरणाबाबत अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सानप म्हणाले की, “सदरील प्रकरणाची सुरुवात इंगळे कुटुंबातर्फे झाली होती.
तक्रारदाराने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेमिकेची छेड काढली आणि त्यातून या प्रकाराला सुरुवात झाली आहे. इंगळे कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर एकूण सहा व्यक्तींवर ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यातील पाच जण अटकेत आहेत. तसेच ‘अॅट्रॉसिटी’ दाखल झालेल्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून विशाल इंगळेवरदेखील छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासह एकूण तीन जणांना जामीन देण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला असून या प्रकरणी पुढील कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत.”
योग्य आणि कठोर कारवाईची मागणी
ज्या व्यक्तींनी माझ्या घरात घुसून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या घरातील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींची विटंबना केली, त्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची त्यांना शिक्षा मिळेल. यापेक्षा अधिक माझी काहीही मागणी नाही. इथून पुढे मी किंवा माझ्या कुटुंबीयांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.
- विशाल इंगळे, पीडित तक्रारदार