नाशिक : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित नाशिकच्या भंगार व्यवसायिकांची ईडी चौकशी सुरू आहे. मलिकांनी केलेल्या व्यवहाराशी संदर्भात व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशकात धडक दिली आहे. नाशिकमध्ये काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. त्यामुळे मलिकांशी संबंधित भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
या संदर्भात ईडीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सकाळी छापे मारले. त्यानंतर सतीश उके आणि यांचे भाऊ प्रदीप उके यांना ताब्यात घेतले. यावरून नाना पटोलेंसह महाविकास आघाडीतील इतर नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या कारवाया थांबवाव्यात, असे साकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. त्यानंतर नाशिकमध्येही ईडी पोहचल्याचे समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे समजते.
अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केली आहे. नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीकडून सुरू होती. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी झाली आहे.
या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत. याप्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आली आहे.. मलिक यांचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे. नाशिकमध्ये त्या व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांची ईडीने चौकशी केल्याचे समजते.
नाशिकमध्ये नेमकी कुठे सुरू आहे चौकशी?
नाशिकमधील अंबड परिसरात भंगार व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने अचानक धडक देत अनेक व्यापाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या व्यापाऱ्यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे समजते. याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे माहिती नाही. या विषयावर प्रशासनामधील कोणीही माहिती द्यायला तयार नाही. शिवाय पोलिसांनाही याची खबर नाही. त्यामुळे या चौकशीचे गूढ वाढले आहे.