उद्योजकतेची परिभाषा सोपी करणारे 'हर्षवर्धन गुणे'

    25-Feb-2022
Total Views |
                      
harshavardhan gune
 
 
 
 
स्टार्टअप्सचे दिवसागणिक भरारी घेणारे उद्योगविश्व आणि स्टार्टअप्सच्या यशोगाथा समोर आणणारे आजपासून दर शुक्रवारी नवे सदर ‘स्टार्टअप फर्स्ट.’ आजचा पहिला लेख देशभरातील स्टार्टअप्सना ‘किकस्टार्ट’ करणार्‍या अनुभवसंपन्न हर्षवर्धन गुणे यांनी नवउद्योजकांना केलेल्या मार्गदर्शनाविषयी...
उद्योगक्षेत्रात नवनवीन कल्पनांना आकार देणार्‍या, काहीतरी वेगळे करू पाहणार्‍या तरुणांना मार्गदर्शन करणे, त्यांना भांडवल निर्मितीपासून ते उद्योग सुरु करण्यासाठी लागणार्‍या विविध घटकांची पूर्तता करण्यासाठी मदत करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, हेच हर्षवर्धन गुणे यांचे कार्यक्षेत्र. सध्या ते ‘विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब’ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठातून ‘उत्पादन’ विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या गुणे यांनी केवळ ‘उत्पादन’संबंधीच नाही, तर इतर अनेक उद्योगांमध्येही मोलाची कामगिरी बजावली. संरक्षण, ऑटोमोबाईल, तेल आणि वायू क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. फक्त खासगी क्षेत्रच नव्हे, तर भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’सारख्या अनेक प्रकल्पांमधील गुणे यांचे योगदान कौतुकास्पद म्हणावे लागेल. सध्या ते नवीन स्टार्टअप्सना, व्यवसाय नियोजनासाठी, व्यवसायवृद्धीसाठी मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.
उद्योगाच्या यशस्वितेचे सूत्र सांगताना गुणे म्हणतात की, “कुठल्याही व्यवसायासाठी सर्वप्रथम ध्येय निश्चित असले पाहिजे. कारण, आपला उद्योग तेव्हाच यशस्वी होऊ शकतो, जेव्हा आपल्याकडे महत्त्वाकांक्षा असते. या महत्त्वाकांक्षेसोबत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणा, समर्पण वृत्ती, शिस्त या गुणांची जोड असेल तर कुठलाही उद्योग यशस्वी होऊ शकतो.” ते पुढे म्हणतात की, “जर तुमच्याकडे या गोष्टी असतील, तर बाकीच्या भांडवल, व्यवसायाची जागा, त्यासाठी लागणार्‍या परवानग्या, पाठबळ मिळवणे या सर्व गोष्टींवर मार्ग निघू शकतो आणि लोकं मार्ग काढून पुढे जातही आहेत. तुमच्या ध्येयाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात, तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून ठामपणे सांगू शकतो.”
मराठी माणूस आणि उद्योजकता याविषयी मतप्रदर्शन करताना गुणे म्हणतात की, “मराठी लोकांमध्येही उद्योजकतेचे प्रमाण वाढत आहे. मराठी तरुण मुलं-मुली आतापर्यंतच्या ‘नोकरी म्हणजेच आयुष्यात स्थिरता आणि मग बाकीच्या गोष्टी’ या मानसिकतेतून बाहेर पडून वेगळे काहीतरी करू बघत आहेत,” असे गुणे अभिमानाने सांगतात. म्हणजेच उद्योगजगतात मराठी माणूस हा पारंपरिक चौकटी मोडतोय आणि यशस्वीदेखील होतोय. आज आपण बघितलं, तर जवळपास सर्वच क्षेत्रांत मराठी माणूस पुढे आहे आणि उच्च पदांवर कार्यरत दिसतो. स्वानुभवावरुन ते सांगतात की, “पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. घरच्या जबाबदार्‍या, व्यवसायातील अनिश्चितता यांमुळे आम्हाला असा निर्णय घेताना दहावेळा विचार करायला लागायचा. पण, आता तरुण-तरुणी पुढाकार घेत आहेत, फक्त मोठ्या शहरांतीलच नव्हे, तर छोट्या- छोट्या शहरांतसुद्धा अनेक नवीन व्यवसाय उभे राहत आहेत आणि ही खरोखरच खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल.”
 
 
 
कुठल्याही व्यवसायाचे मुख्य ध्येय हे व्यवसायवृद्धीच असते आणि नवीनच सुरू झालेल्या उद्योगांपुढे हे सर्वात मोठे आव्हान असते. कुठलाही उद्योजक तेव्हाच आपल्या उद्योगात वृद्धी करू शकतो, जेव्हा त्याच्याकडे आपल्या व्यवसायाबद्दल, आपल्या व्यवसायातील नवीन घडणार्‍या बदलांबद्दल, नवीन तंत्रज्ञानाबद्दल पूर्ण माहिती असते आणि यालाच ‘बिझनेस इकोसिस्टीम’ असे म्हणतात. व्यवसाय करणार्‍याला बर्‍याच गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या उत्पादनाला किंवा सेवेला बाजारपेठ कुठे आहे, किंमत, स्पर्धक उत्पादनांची माहिती अशा अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. भांडवल निर्मितीसाठी कर्जाची उपलब्धता, सरकारच्या विविध योजना, जागांची उपलब्धता यांची माहिती असणे किंवा करून घेणे, हे या ‘इकोसिस्टीम’चाच भाग आहे. व्यवसायवृद्धीसाठी जसे नवीन तंत्रज्ञान माहिती असणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते तंत्रज्ञान शिकून घेणे, प्रशिक्षण घेणे, आपल्या सहकार्‍यांना त्याचे प्रशिक्षण देणे, हेही खूप महत्त्वाचे आहे आणि या सर्वच गोष्टी ‘इकोसिस्टीम’चा भाग आहेत.
कोरोना काळातील एकंदरीतच अनिश्चिततेच्या कालावधीचे गुणे तीन टप्प्यांत वर्गीकरण करतात. कोरोना पूर्वी, कोरोना काळात आणि कोरोना नंतर. हे खूप मोठे स्थित्यंतर होते आणि एवढ्या मोठ्या स्थित्यंतराचे परिणाम उद्योगांवरही साहजिकच दिसून आले. उद्योग बंद पडले, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांना खूप अडचणींमधून सामोरे जावे लागलेच. आता कुठे आपण थोडे थोडे यातून सावरत आहोत. पण, प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी मार्ग शोधावाच लागतो. तसेच आता आपणही नव्या संधी, नव्या गोष्टी आता शोधल्या पाहिजेत. आधी ज्या उद्योगसंधी आपल्याकडे होत्या, त्या आता राहिल्या नाहीत किंवा त्यांचे स्वरूप बदलले आहे. असे असले तरी अनेक नवीन क्षेत्रे उदयास आली. कोरोनामुळे बर्‍याच क्षेत्रांमध्ये नवीन संधी तयार झाल्या. उद्योगांमध्ये पूर्वी खूप स्पर्धा होती, जोखीम जास्त होती, आता त्या गोष्टी राहिल्या नाहीत. अनेक उद्योग आता स्वतःहून पुढे येत आहेत आणि उद्योजकांना संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे आता नवीन उद्योग सुरु करण्यासाठी आणि नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम संधी असल्याचे गुणे अधोरेखित करतात.
 
उद्योजकतेमध्ये ’Are you running a business or the business is running you?’ ही इंग्रजीतली एक महत्त्वाची म्हण. म्हणजेच, काम आणि स्वतःचे वैयक्तिक आयुष्य यांतील मेळ खूप महत्त्वाचा आहे. याविषयी गुणे म्हणतात की, “आपल्या उद्योगामध्ये आपण स्वतःला झोकून देत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या घरासाठी, घरच्यांसाठी, स्वतःसाठी वेळच काढता येत नाही. तर हे आपण जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. आपल्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे आणि तो स्वतःच्या शारीरिक, तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी स्वतःच सगळीकडे लक्ष द्यायला लागत असल्याने इतर गोष्टींसाठी वेळच मिळत नसे. पण आता हे चित्र बदलते आहे.” तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की, आपण आपल्या घरी बसूनसुद्धा आपल्या कंपनीत काय चाललेे आहे, यावर लक्ष ठेवू शकतो. यामुळे हे काही अवघड नाही, असे गुणे अधोरेखित करतात. कोरोना काळामध्ये वैयक्तिक गोष्टींचे महत्त्व समजले आहे आणि लोक त्याकडे गांभीर्याने बघत आहेत. हळूहळू काही काळानंतर या गोष्टी सुधारतील आणि स्वतःचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा ताळमेळ घातला जाईल, याबद्दल गुणे आशावादी आहेत.