नभ: स्पृशं दीप्तम्...

    02-Feb-2022   
Total Views | 125

Vinayak Devdhar
 
 
कारगिल युद्धापासून ते दहशतवाद्यांवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’पर्यंत भारतीय वायूदलात देशसेवा बजावलेल्या ग्रुप कॅप्टन (निवृत्त) विनायक देवधर यांच्याविषयी...
 
 
नभः स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
 
 
वरील भगवद्गीतेतील श्लोक म्हणजे भारतीय वायूसेनेचे ‘नभ: स्पृशं दीप्तम्’ हे ब्रीदवाक्य. गर्व आणि अभिमानाने आकाशाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य भारतीय वायूदलात आहे. कारण, भारतीय वायूदलात लढवय्ये भारतीय आहेत. त्यापैकीच एक नाशिक निवासी विनायक देवधर. इंदूरला जन्मलेल्या देवधर यांचे शिक्षण हे अकोला येथे झाले. त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाची ‘विद्युत अभियांत्रिकी’ ही पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांना शासकीय विद्युत विभागात नोकरी चालून आलेली असताना देखील त्यांनी भारतीय वायूदलात दाखल होण्यासाठी तयारी सुरु केली. अखेरीस सर्व परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन १९७९ मध्ये ते भारतीय वायूसेने (भावासे) मध्ये ‘पायलट ऑफिसर’ या हुद्द्यावर देशसेवेत रुजू झाले. आपले शेजारी हे भावासेमध्ये आहेत, तेव्हा त्यांचे अनुभव ऐकून देवधर यांना देखील भावासेमध्ये कमिशन घेण्याची इच्छा जागृत झाली व तेच ध्येय त्यांनी ठेवले.
 
 
 
भारतीय वायूसेनेमध्ये संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या विमानांवर, क्षेपणास्त्रांवर व दूरसंचार प्रणालीवर कार्य करण्याची संधी देवधर यांना प्राप्त झाली. त्याचप्रमाणे शिलाँग येथे असलेल्या पूर्व वायू कमांड त्याचबरोबर दिल्ली येथे वायू सेनेच्या मुख्यालयात देखील देवधर यांनी सेवा बजावली. अखेरीस एअर फोर्सस्टेशन नैनिताल येथून ‘स्टेशन कमांडर’ म्हणून ‘ग्रुप कॅप्टन’ या हुद्द्यावर २००७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांना या प्रवासात बर्‍याच वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. मात्र, जीवनातील दोन लक्षणीय प्रसंग त्यांच्या चिरकाल स्मरणात राहणारे आहेत. ते म्हणजे भारतीय वायूसेनेला हवेतून जमिनीवरच्या रडारवर मारा करण्यासाठी क्षेपणास्त्रे हवी होती. त्यासाठी तयार केलेल्या समितीमध्ये देवधर यांची निवड करण्यात आली होती. या विषयात बरेच काम केल्यानंतर आपण इस्रायलकडूनही क्षेपणास्त्रे विकत घेतली. त्याकरिता देवधर यांना इस्रायलचे बरेचदा दौरे करावे लागले आणि दुसरा प्रसंग म्हणजे कारगिल युद्धात आपल्याला विमानांत व अत्यंत भेदक अशा विमानातून मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा वापर करावा लागणार याची वायूसेनेला खात्री होती. त्यामुळे वायूसेनेच्या मुख्यालयात एक विशेष गट तयार करण्यात आला. त्यात देवधर यांचा सक्रिय सहभाग होता. यामुळे कारगिल युद्धात सहभाग असल्याचा अभिमान असल्याचे देवधर यांना सांगतात. तसेच बालाकोट येथे झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये वापरण्यात आलेल्या ‘मिराज-मिसाईल गाइडेड’ विमान बेसकॅम्पचे देवधर हे इंचार्ज देखील होते.
 
 
 
भारतीय वायूदल हे इतर देशांपेक्षा फारच वेगळे आहे. येथे जे काही उपलब्ध आहे, त्याचा वापर करून आपण जिंकू शकतो, यावर इथे विश्वास ठेवला जातो व तशीच शिकवणसुद्धा मिळते. त्यामुळेच १९६५ व १९७१ मध्ये आपण पाकिस्तानवर, जुनी शस्त्रास्त्रे असूनदेखील विजय मिळवू शकलो असल्याचे देवधर सांगतात. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेचा वायूसेनेलाफारच उपयोग होताना दिसतो. ‘तेजस’ हे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आता रशियन बनावटीच्या ‘मिग’ विमानांच्याऐवजी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर्ससुद्धा वायूसेनेत दाखल झाले आहेत. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेली क्षेपणास्त्रे आता आपली वायूसेना वापरत आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे, अशा सर्व ठिकाणी भारतीय बनावटीचे सामान आता भारतीय वायू दल वापरताना दिसते. याचा मुख्य व खूप मोठा फायदा म्हणजेच कुठल्याही कारणासाठी आपल्याला इतर देशांवर विसंबून राहावे लागत नाही व पैशांचीही बचत होत असल्याचे देवधर आवर्जून नमूद करतात.
 
 
 
भारतीय वायूसेना इतर देशांच्या तुलनेत खूपच वेगळे आहे. अमेरिका व युरोपियन देशात त्यांचे वायू दल फक्त ‘फर्स्ट लाईन मेंट’ करतात. कारण, विमान तयार करणार्‍या कंपन्या बाकी सर्व तर्‍हेचे ‘मेंट’ करतात. पण,आपल्याकडे विमानाचा संपूर्ण ‘मेंट’ वायू दलालाच करावा लागतो. भारतीय वायू दलात सर्व तर्‍हेचे प्रशिक्षण अत्यंत उत्तम प्रकारे दिले जाते. कुठल्याही प्रसंगाला सामोरे जायला आपल्या देशाचे वायू दल सदैव तत्पर असल्याचा विश्वास देवधर व्यक्त करतात. भारतीय सैन्य दलात व विशेष करून भारतीय वायू दलात सामील होण्यासाठी युवकांनी नक्कीच प्रयत्न करावेत. आपल्या मातृभूमीची सेवा करता येणे यासारखे दुसरे कोणतेही चांगले भाग्य होऊच शकत नसल्याची भावना ते बोलून दाखवितात. राष्ट्रसुरक्षा सेवेत असणारे सर्वच सुरक्षा दल हे उत्तम कामगिरी करत आहेत. म्हणूनच भारतात शांतता आहे. मात्र, वायू सेनेच्या ब्रीद वाक्याला साजेसे असे गर्व आणि अभिमान बाळगत आकाशाला ही गवसणी घालण्याचे कार्य देवधर यांनी केले आहे. त्यांच्या आगामी कार्यास व आयुष्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
  
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121