मुंबई : “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल एक हजार कोटींचे करा,” अशी मागणी महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी केली. यासाठी ‘कॅबिनेट’मध्ये त्वरित ठराव पारित करण्याची मागणीही त्यांनी केली असून, याबाबत त्यांनी शासनाकडे चौथ्यांदा पत्रव्यवहार केला आहे. गोरखे यांनी केलेल्या प्रचंड पाठपुराव्यामुळे आगामी ‘कॅबिनेट’मध्ये तरी हा विषय पारित होईल, अशी समाजाला आशा आहे.
आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपुंजे असून अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास १२०० कोटी भागभांडवल त्वरित द्यावे आणि महामंडळ ताबडतोब चालू करावे. राज्य सरकारकडून मिळणार्या भागभांडवलामधून एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना तत्काळ सुरू करावी. बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा सात लाखांवरून दहालाखांपर्यंत करण्यात यावी. त्यामध्ये महामंडळाचा हिस्सा २० टक्क्यांऐवजी ४५ टक्के इतका व बँक कर्ज ५० टक्के तसेच, लाभार्थी हिस्सा पाच टक्के असा करून तत्काळ शासननिर्णय काढून योजना पूर्ववत सुरू करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर रुपये दहा लाखपर्यंतची व्याज परतावा योजना या महामंडळास तत्काळ सुरू करावी, अन्यथा राज्यभर समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पहिल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेले १०० कोटी रुपये अजूनही मंडळाला प्राप्त झाले नाहीत, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.