मुंबई : पालिकेने आत्तापर्यंत मिठी नदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु आता पालिकेने मिठी नदीच्या पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण आणि पूरस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून ३५ कोटी ८७ लाख ९९ हजार ९९२ रुपये खर्च करून सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी नदीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 'मिठी नदी विकास व सरंक्षण प्राधिकरण'ची स्थापना करण्यात आली. मिठी नदीची लांबी १७.८४ कि. मी. आहे. त्यापैकी ११.८४ कि. मी. भाग हा पालिकेच्या तर उर्वरित ६ कि. मी. भाग हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाखाली येतो.
मिठी नदीच्या प्रवाहमार्गावर अनेक झोपड्या असून येथून सांडपाणी, जलप्रवाह मिठी नदीत येते. आणि यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीची कमी हाती घेण्यात आली आहेत. साल २०१९ मध्ये पालिकेकडून 'मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प' हाती घेण्यात आला. या अंतर्गत नदीची वाहन व धारण क्षमता वाढवण्यासाठी खोलीकरण करणे, जपानी तंत्रज्ञानावर बोगदा बांधणे, मिठी नदी नजीक कृत्रिम तलाव आणि पाणथळ तयार करणे, नदीला बारमाही वाहत ठेवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.
परंतु मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आत्तापर्यंत तब्बल ११५० कोटी खर्च करण्यात आला असल्याचे नुकतेच माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. मात्र एवढा खर्च करूनही मिठी नदी स्वच्छ काही झाली नाही. पालिकेने आत्तापर्यंत मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे ९५ टक्के काम तर संरक्षक भिंत बांधण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र तरीही मिठी नदीच्या विकासासाठी आता पालिका आणखीन ३५ कोटी खर्चून सल्लागार नेमणार आहे.