नागपूर : जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांबाबत लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते. त्यांनी सांगितले की, ११ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अमृत योजनेतील व मलनि:स्सारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे हाती घेण्यात येऊ नये, असे नमूद आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्यानुसार ४९ रस्त्यांच्या पुर्नबांधणी करिता ३८.२८ कोटी रुपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या कामांचे कार्यादेश महानगरपालिकेतर्फे निर्गमित करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी शासनाकडून १८.९३ कोटी व महानगरपालिकेच्या हिश्श्यातील ५.१० कोटी रुपये याप्रमाणे पहिला हप्ता सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अमृत योजना भुयारी गटार योजनेची कामे पूर्णत्वास येत आहेत. त्या भागातील रस्त्यांच्या पुर्नबांधणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या इतर योजनेतून तसेच महानगरपालिकेच्या निधीतून देखील काही भागातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. काही भागातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितलेजळगाव शहरांतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार!