सांगली : आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरद रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या रुग्णाचे बेकायदेशीररित्या धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून या संदर्भात संपतराव धनवडे यांनी संजय गेळे आणि अश्विनी गेळे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून बेकादेशीररित्या धर्मांतरण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
आटपाडी गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालून जबरदस्ती धर्मांतरण करण्याचे प्रकार घडत आहेत. समाजविघातक घटकांमार्फत जाणीवपूर्वक हे प्रकार सुरू असल्याचे पोलीसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, वरद रुग्णालयातील या प्रकाराचे व्हीडिओ तक्रारदार धनवडे यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आले. त्यानंतर त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार, 'धर्मांतरणाचे संबंधित छायाचित्रण हे अतिदक्षता विभागातील असून रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून भोंदुगिरी सुरू असल्याचा प्रकार व्हायरल व्हीडिओत स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित प्रकाराला रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी रावण यांनी विरोध केला. मात्र, गेळे दांम्पत्याने त्यांनाही विरोध केला.
वरील सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशा घटना आटपाडी भागात वारंवार होत असल्याचेही तक्रारदाराने आपल्या म्हटले आहे. समाजाला असे प्रकार घातक असून बेकायदा धर्मांतराला खतपाणी घालणारे आहेत. दोन्ही आरोपींविरोधात कठोर कारवाई करून आटपाडीतील सुरू असलेल्या धर्मांतरणाच्या प्रकरणांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.