शिर्डी : शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होण्यापूर्वी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला पोहचले. यावेळी दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत केसरकर म्हणाले की, सत्ता जाताच उद्धव ठाकरेंच्या तोंडावरचा मास्क उतरलाय. तसेच ठाकरे आता रस्त्यावर उतरले हे चांगले आहे. मात्र ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं.त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर उद्धवजी तुम्ही ऍक्टिव्ह झालात का? असा सवाल दीपक केसरकरांनी केला.
जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता मात्र, सत्ता जाताच दुसऱ्या क्षणी मास्क तो उतरला अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांची आमच्यासारख्या आमदारालासुद्धा भेटत नसल्याने महाराष्ट्र ठप्प झाला होता. विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर महाराष्ट्र ऍक्टिव्ह झाला का..? असा सवाल करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे, ते म्हणाले संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलटं महाराष्ट्रात घडतं. त्यांनी वाईट बोललं की चांगलंच होत असतं. ज्यांच्याबद्दल संजय राऊत वाईट बोलले ती लोक मोठीचं झाली. संजय राऊतांनी दररोज वाईट बोलत राहावं, आम्ही आमचं काम चालूच ठेऊ असा टोला केसरकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.त्यामुळे राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही. असा ही टोला केसरकरांनी ठाकरेंवर लगावलाय.