मुंबई (ओंकार मुळ्ये) : “अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला. त्याचप्रमाणे येथील मतांतरण व धर्मांतरण रोखण्याचे महत्त्वाचे कार्य हे अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष तेची गुबिन करत आहेत. अशा असामान्य व्यक्तीचा सन्मान ‘माय होम इंडिया’ संस्थेद्वारे होत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांनी केले. गुरुवार, दि. 15 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प) येथे आयोजित करण्यात आलेल्या ’वन इंडिया अवॉर्ड’ पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी ते बोलत होते. ईशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ विचारवंत व प्रज्ञाशील लेखक रमेश पतंगे यांच्या हस्ते हा पुरस्कार यावेळी तेची गुबिन यांना देण्यात आला.
तेची गुबिन यांच्याविषयी सांगताना सुनील देवधर म्हणाले की, “तेची गुबिन यांचे अरुणाचल प्रदेशमध्ये प्रचंड मोठे कार्य आहे. समाजाच्या आणि सर्वसाधारणपणे जनजाती समुदायांच्या स्वदेशी श्रद्धेचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. दि. 26 जानेवारी, 2010 रोजी त्यांनी चीनच्या सीमेलगत असलेल्या भारतातील 91 दुर्गम गावांना भेट देऊन त्या गावांमध्ये तिरंगा फडकवला होता. अरुणाचल प्रदेशातील मतांतरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अद्भुत आणि कष्टप्रद आहेत. ज्याप्रमाणे चिनी घुसखोर्यांना रोखण्यासाठी अरुणाचल प्रदेशचे सरकार सक्षम आहे, त्याप्रमाणे इथले मतांतरण आणि धर्मांतरण रोखण्यासाठी तेची गुबिन सक्षम आहेत. त्यामुळे पूर्वांचलसाठी सक्रियपणे काम करणार्या अशा असामान्य व्यक्तीला ‘माय होम इंडिया’तर्फे ‘वन इंडिया अवॉर्ड’चा बारावा पुरस्कार देण्यात आला आहे.
“अरुणाचल प्रदेशचं नाव घेतलं की, दि. 20 ऑक्टोबर, 1962ची घटना आठवते. चिनी सैनिकांनी भारताच्या सीमेत घुसखोरी करून त्यांचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. आसामच्या तेजपीरमधील रहिवाश्यांना जेव्हा चिनी सैनिक दिसले तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंकडे मदत मागितली. मात्र, पंतप्रधानांनी रेडिओवरून केवळ एक संदेश पाठवत हात वर केले. भारतीय सेना तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून देशातील कम्युनिष्टांकडून बरेच प्रयत्न झाले, आंदोलने झाली. मग यांसारखे खरे गद्दार कोण असू शकतं?, असे म्हणत सुनील देवधर यांनी माजी पंतप्रधान नेहरूंवर चांगलाच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर सीमेलगतची परिस्थिती बदलली. भारत चिनी सैनिकांना तोडीसतोड उत्तर देऊ लागला. घुसखोरी करणार्या चिनी सैन्याला पिटाळून लावले. डोकलाम आणि तवांग हे याचे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधानांनी पूर्वांचलला कधी समस्या म्हणून न संबोधता, विकासाची एक संधी म्हणूत त्याचा उल्लेख केला,” असेही ते पुढे म्हणाले.
वाढते धर्मांतरण व मतांतरण रोखणे गरजेचे!
अरूणाचल प्रदेशमध्ये ख्रिश्चन मिशनरीज आणि ख्रिश्चन चर्चचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे इथल्या वनवासी भागांमध्ये मतांतरण आणि धर्मांतरण वेगाने होत आहे. या गोष्टींवर आळा घालण्यात यावा म्हणून अरुणाचल विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यासोबतच ठिकठिकाणी श्रद्धा जागरण केंद्रही उभारण्यात आली आहेत. आज त्यांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे. एकंदरीत अरुणाचल प्रदेशातील वनवासींच्या पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, तर येथील वाढलेले मतांतरण आणि धर्मांतरण रोखणे हे आमचे ध्येय आहे.
- तेची गुबिन, अध्यक्ष, अरुणाचल विकास परिषद
‘नॅशनल स्टॉक मार्केट’ पूर्वांचलसाठी तत्पर!
सध्या ‘स्टॉक मार्केट’मध्ये बरेच जण गुंतवणूक करत असतात. मात्र आमची इच्छा आहे की, ‘स्टॉक मार्केट’चा अभ्यास मुलांना त्यांच्या शालेय जीवनापासून करता यावा. भारताच्या ‘स्टॉक मार्केट’मध्ये गुंतवणूक करणार्यांची संख्या सध्या प्रचंड वाढली आहे. यात अरुणाचल प्रदेश मधलेही काही लोकं आहेत. त्यामुळे विशेषतः पूर्वांचलच्या विकासासाठी ‘नॅशनल स्टॉक मार्केट’ कायम तत्पर असेल.
- आशिष कुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज
मतांतरण रोखण्याचे काम संविधानिक!
तेची गुबिन हे अरुणाचल प्रदेशमध्ये वाढते मतांतरण आणि धर्मांतरण रोखण्याचे उत्तम कार्य करत आहेत. ‘माय होम इंडिया’सुद्धा पूर्वांचलमध्ये अग्रेसर आहे. त्यांचे हे कार्य संविधानिक आहे. भारतीय संविधानातील प्रत्येक ओळीशी जुळणारे ते देशकार्य आहे.
- रमेश पतंगे, ज्येष्ठ विचारवंत व प्रज्ञाशील लेखक
तेची गुबिन यांचे कार्य प्रेरणादायी...
तेची गुबिन यांचे अरुणाचल प्रदेशमधील वनवासींसाठी सुरू असलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ‘माय होम इंडिया’सारख्या संस्थेकडून अशा हिर्यांची पारख होतेय ही खूप मोठी गोष्ट आहे.
- अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ गायिका
अरुणाचल प्रदेशचे सरकार तेची गुबिनच्या पाठीशी कायम!
तेची गुबिन हे अरुणाचल प्रदेशमध्ये मोलाचे कार्य करत आहेत. ते आपली संस्कृती संवर्धनाचे आणि ती वाढवण्यात प्राधान्य देत आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये मतांतरण आणि धर्मांतरणाचे प्रमाण प्रचंड वाढले असून ते रोखण्याचा निर्धार तेची गुबिन यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशचे सरकार अशा व्यक्तींच्या पाठीशी कायम उभे आहे.
- पेमा खांडू, मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हा नेहरुंचा नाही तर मोदींचा भारत आहे!
पूर्वांचल भागात असलेल्या तवांग येथे चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना भारतीय सैनिकांनी अक्षरशः पिटाळून लावले. असाच प्रयत्न 1962 मध्ये झाला होता. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी त्यावेळेत ’हिंदी चिनी भाई भाई’ म्हणून हात वर केले. सध्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आल्यापासून चित्र बदलले आहे. चीनला तोडीसतोड उत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे. हा नेहरूंचा नाही तर मोदींचा भारत आहे!, असे म्हणत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पं. नेहरुंवर निशाणा साधला.