भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या वाढीसाठी घेतलेले कष्ट, कार्यकर्त्यांचे निर्माण केलेले जाळे आणि इतर आठवणींचा आढावा घेणारा लेख...
१२ डिसेंबर. आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची जयंती. साहेब आपल्यामध्ये नाहीत, ही कल्पना आजसुद्धा करवत नाही. आजही साहेब लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. महाराष्ट्रामध्ये आजही गावोगावी देव्हार्यामध्ये साहेबांचे फोटो दिसतात. लोक साहेबांची देवाप्रमाणे पूजा करतात. आजही साहेबांच्या आठवणीने लोकांना हुंदके फुटतात, लोकांचे डोळे अजूनही ओले होतात. साहेबांनी समाजाला लढण्याची प्रेरणा दिली, अन्यायासमोर न झुकण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची चेतना जागृत केली. त्यामुळे सर्वसामान्य जनता, उपेक्षित, दलित मागासवर्गीय, बहुजन समाजातील सर्वच लोकांच्या मनामध्ये साहेबांविषयी ममत्व आणि प्रेम अजूनही कायम आहे.
बहुजन समाजासाठी साहेबांनी उभे आयुष्य खर्ची घातले. साहेबांमुळे समाजाला एक दिशा मिळाली. फक्त वंजारी समाजाचे नव्हे, तर बहुजन समाजातील १८ पगड जातीतील लोक साहेबांमुळे ताठ मानेने जगायला शिकले. महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आणि कानाकोपर्यामध्ये साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. साहेबांबद्दल एक प्रकारची आपुलकी आणि प्रेम कार्यकर्त्याच्या मनामध्ये असायचं. संघर्ष करत राहायचं, अन्यायाविरोधात लढा देत राहायचं. कोणासमोर झुकायचं नाही, हा साहेबांचा स्वभाव होता. कधीकधी स्वकियांशी, स्वपक्षीय यांच्याशीसुद्धा साहेबांनी संघर्ष केला व आयुष्य संघर्षांमध्ये खर्ची केलं. लहानपणापासून, शिकण्यापासून मोठा होण्यापर्यंत साहेबांनी प्रत्येक स्तरावर संघर्ष केला. साहेबांना कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी साहेबांना पूर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन संघर्ष करावा लागायचा. पण साहेबांनी हार कधीच पत्करली नाही. नेहमी अन्यायाविरुद्ध दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करत राहिले. रस्त्यावर उतरले.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात दांडगा जनसंपर्क जर कोणाचा असेल, तर तो गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा होता. साहेबांसाठी सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचे असायचे. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी साहेबांनी काळवेळ कधीच बघितला नाही. रात्री २-३ वाजेपर्यंत साहेबांना भेटायचे. साहेबांच्या घराला उंबराच नाही, असंच वाटायचं. कार्यकर्ते आणि साहेब यांच्यामध्ये प्रेमाचा धागा होता. साहेब म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते. साहेबांचं कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम असायचं. साहेबांनी खूप कार्यकर्ते घडवले.
गोपीनाथ मुंडे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब हे दूरदृष्टी असणारे नेते. त्यांनी खूप कार्यकर्ते घडवले. मोठे केले. झिरोचे हिरो केले. अनेक दगडांना शेंदूर फासला व त्यांना देवपण दिले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. माणसं जोडण्याची विलक्षण कला साहेबांकडे होती. आयुष्यभर माणसे कमावली. आपल्या मतदारसंघातून येणार्या लोकांबद्दल साहेबांना एक विशेष ममत्व असायचे. हजारो, लाखो लोक असे आहेत की, जे साहेबांना कधी भेटलेही नाहीत. तरी साहेबांनी समाजामध्ये जो आत्मविश्वास जागृत केला, लोकांमध्ये लढण्याची आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जी भावना जागृत केली, त्यामुळे साहेबांचे जनसामान्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण झाले.
पक्षांपलीकडे जाऊन मैत्री कशी टिकवून ठेवायची हे साहेबांकडून शिकण्यासारखं होतं. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून येऊन आणि सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा आणि जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारा असा हा मोठा नेता आज आपल्यामध्ये नाहीये, याचं सर्वांनाच खूप दुःख आहे. मराठवाड्याच्या राजकारणामध्ये जे मोठे तीन नेते होऊन गेले, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोदजी महाजन. या तिघांची जीवाभावाची मैत्री. तिघांचे अकाली निधन झाले. दुर्दैवाने हे तिन्ही मोठे नेते आज आपल्यामध्ये नाहीत. मराठवाड्याला अजूनही आपण पोरके झाल्यासारखं वाटतं.
एक विरोधी पक्ष नेता सक्षम कसा असावा, आक्रमक कसा असावा याचा वस्तुपाठच साहेबांनी घालून दिला. १९९२ ते १९९५ या काळामध्ये साहेब विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेमध्ये होते. साहेब विविध विषयावर विधानसभा डोक्यावर घ्यायचे.
आक्रमकपणे राज्याच्या विविध विषयांना न्याय मिळवून दिला. सरकारला सळो की पळो करून सोडले आणि १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणले. या सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असे गृहखाते साहेबांनी सांभाळले. साहेबांनी एक कठोर गृहमंत्री कसा असतो, आपण पोलिसांना कसं बळ दिलं पाहिजे, हे कृतिनिशी दाखवून दिले. ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊन मुंबईतील गँगस्टार राज संपुष्टात आणले. एक कठोर आणि कार्यक्षम गृहमंत्री काय असतो, हे सर्व महाराष्ट्राने पाहिले.
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून महाराष्ट्रामध्ये विस्तार करण्यामध्ये मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता. शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ओळखले जायचे. परंतु, बहुजनांमध्ये, वाडी-वस्तीमध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि बहुजन समाजामध्ये भारतीय जनता पक्षाला पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा साहेबांचा होता. आज भारतीय जनता पक्ष वाढलेला आहे, यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कोणी मेहनत घेतली असेल, तर ती गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी घेतली होती. साहेबांनी एकच मनाशी ठरवलं होतं. विरोधी पक्षात असतानासुद्धा नोकरशहांमध्ये साहेबांचा दरारा होता. साहेबांचा एक फोन गेला, तर सर्वच प्रशासन काम करायचे. साहेब विरोधी पक्षात असतानासुद्धा सत्ताधारी पक्षातील लोकांपेक्षा जास्त वचक त्यांचा प्रशासनावर होता. लोकांची कामं व्हायची. साहेब आणि गर्दी हे समीकरणच झाले होते. बीडमधून लोकसभेच्या निवडणुकीत साहेब पहिल्यांदाच निवडून आले आणि लोकसभेमध्ये थेट उपनेते झाले आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्या पहिल्या पंक्तीमध्ये बसू लागले. ही खरोखरच महाराष्ट्रातील लोकांसाठी गौरवाची बाब होती.
देशाच्या राजकारणामध्ये साहेबांनी खूप कमी कालावधीमध्ये सर्वच पक्षातील लोकांमध्ये एक व्यापक जनाधार असणारा बहुजनांचा अत्यंत आक्रमक नेता म्हणून ओळख निर्माण केली. मोदी सरकारच्या सरकारमध्ये मोजक्याच पहिल्या पाच नेत्यांमध्ये साहेबांनी शपथ घेतली. परंतु, अवघ्या आठवड्यात काळाने घाला घातला आणि हाती तोंडी आलेला घास हिरावून घेतला. साहेबांचे उभे आयुष्य संघर्षात गेलं होतं आणि असं वाटलं होतं, आता साहेब सत्तेत आलेले आहेत. सर्वांची कामे होतील. साहेबांसाठी थोडेसे सुखाचे दिवस येतील. परंतु, ते नियतीला मान्य नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा मोठा जनसंपर्क असणारा नेता, खर्या अर्थाने लोकनेता, हजारो लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात जास्त पात्र असणारा नेता. परंतु, मुख्यमंत्रिपदावर नजीकच्या काळात विराजमान होण्याची वेळ आली असताना काळाने घात केल्याने सर्वांच्या मनामध्ये खंत राहून गेली.
आपणा सर्वांना माहीतच आहे, साहेब असते तर गेल्यावेळी ज्यावेळेस भाजप सत्तेमध्ये आला, त्यावेळेस साहेबच मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून विरोधी पक्षांची मजबूत मोट बांधण्याचे काम मुंडे साहेबांनी केले. महादेव जानकर, राजू शेट्टी, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत अशा विविध पक्षांच्या जनाधार असलेल्या नेत्यांना एकत्र आणण्याचं काम साहेबांनी केलं. सर्वच नेत्यांना साहेबांबद्दल विशेष आदर असायचा. साहेब आपल्या घरातीलच व्यक्ती आहेत, असंच वाटायचं. साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जायचं नाही. साहेब आपल्याला न्याय देतील, याचा संपूर्ण विश्वास असायचा. त्यामुळे एक भावनिक नाते निर्माण झाले आणि मजबूत युती झाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवून दिले आणि त्या लोकसभेमध्ये मिळालेल्या यशाचे खरे श्रेय साहेबांनाच.
प्रमोदजी महाजन भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जायचे. प्रमोदजी यांच्या अकाली निधनानंतर गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ती भूमिका निभावली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीयांशी मुंडे साहेबांचे खूप घनिष्ठ संबंध होते. साहेबांनी युती टिकवण्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली होती. आज हे सरकार आलेले आहे. मुंडे साहेब असते, तर चित्र वेगळे दिसले असते. जो काही सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, तो मुंडे साहेबांनी होऊ दिला नसता. पदापेक्षाही मैत्री टिकवण्यासाठी मुंडे साहेब अग्रेसर असायचे. त्यामुळे आजही जे युतीचे हितचिंतक आहेत, त्यांना मुंडे साहेबांची उणीव कटाक्षाने जाणवते.असा नेता पुन्हा होणे नाही. या उंचीचा नेता पूर्ण पिढीमध्ये एकदाच होतो आणि अशा उंचीचा नेता आपल्यामधून अचानक निघून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधीच भरून येणार नाही. अर्धा डाव सोडून साहेब लोकांच्या मनाला चटका लावून गेले. अशा लोकप्रिय नेत्याला मनापासून आदरांजली.आज योगायोगाने महाराष्ट्रातील आणखी एक मोठे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ही वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावे, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना....
-डॉ. अमोल गित्ते
(लेखक हे ठाण्यामधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक आहेत.)