मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांच्या 'ब्रेवहार्ट ऑफ भारत - विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. १० डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. आजवर भारताच्या इतिहासतील अनेक गोष्टी अंधारात ठेवण्याचा प्रयत्न झाला. तोच इतिहास उजेडात आणण्याचे काम या पुस्तकातून लेखकाने केले आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अनूपम खेर आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. दरम्यान रिपब्लिक टिव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी यांनी लेखक विक्रम संपत आणि उपस्थित मान्यवरांची इतिहास या विषयाला धरून मुलाखत घेतली.
'इतिहास' हा एक असा आरसा आहे...
सध्या इतिहासाच्या पुस्तकांत मुघलांच्या कार्याचे धडे जास्त पहायला मिळतात. त्यामानाने छत्रपती शिवरायांसारख्या कर्तृत्ववान राजांचे धडे कमीच असतात. मात्र इतिहास आवडला नाही म्हणून कोणी तो बदलू शकत नाही. त्याचा उल्लेख आहे तसाच तंतोतंत घ्यावा लागतो. इतिहास हा एक असा आरसा आहे ज्यातून आपण स्वतःला एक राष्ट्र म्हणून ओळखू शकतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अनेक दशके इतिहासाच्या पुस्तकातून जो इतिहास शिकवला जातो त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आणि मला आशा आहे की यात लवकरच बदल होईल.
- विक्रम संपत, प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार
इतिहासातील काही गोष्टी मुलांपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत!
काहीवेळेस शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण जी लढाई हरलो, त्याबद्दल शिकवले जाते. याचा परिणाम इतिहास शिकणाऱ्या मुलांवर होतो. आपण हरलेल्या पूर्वजांचे वंशज आहोत की सातत्याने जिंकत आलेल्या पूर्वजांचे वंशज आहोत, असा प्रश्न त्यांना साहजिकच पडतो. इतिहासातील काही गोष्टी आजच्या मुलांपर्यंत अजूनही पोहोचवल्याच गेल्या नाहीत. यात त्या मुलांचा नाही तर आजच्या व्यवस्थेचा दोष आहे. मात्र विक्रम संपत यांच्यासारखे लेखकच या अंधारात राहिलेल्या इतिहासाबद्दल नक्की लिहितील आणि तो इतिहास आजच्या मुलांपर्यंत पोहोचवतील. 'ब्रेवहार्ट ऑफ भारत' या संपत यांच्या पुस्तकातील इतिहास कुठल्या एका जाती-धर्मापर्यंत सिमीत नाही. यात सर्वांगाने विचार करून सत्य इतिहास मांडला आहे.
- अनूपम खेर, ज्येष्ठ अभिनेते
'ब्रेवहार्ट ऑफ भारत' - काळाची गरज!
विक्रम संपत यांचे पहिले ऐतिहासिक कार्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेले पुस्तक, ज्याने अनेकांची झोप उडवली. आणि दुसरे ऐतिहासिक कार्य म्हणजे नव्याने लिहिलेले 'ब्रेवहार्ट ऑफ भारत' हे पुस्तक. असे पुस्तक ही काळाची गरज आहे. पंतप्रधानांच्या नव्या शिक्षण योजनेअंतर्गत आत्ताच्या पिढीला विक्रम संपतसारख्या लेखकांचा इतिहास नक्कीच शिकायला मिळेल. आपल्याला मुघलांचा इतिहास शिकवला जातो पण शीर धडावेगळे होऊनही मुघलांसोबत लढणाऱ्या मुरारबाजींबद्दल कधी शिकवले गेले नाही. ब्रेवहार्ट ऑफ भारत हे असे पुस्तक आहे, ज्यात असा बराच इतिहास दडला आहे. या पुस्तकाचे पुढे बरेच खंड प्रकाशित होतील. येणाऱ्या भारतवर्षात असे लेखक युगानुयुगे लक्षात राहतील.
- सुनिल देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजपा
काश्मीरचे सत्य आजही काहींना पचलेले नाही!
"काश्मीरमध्ये घडलेला नरसंहार लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तब्बल ३२ वर्षे प्रयत्न सुरु होते. अखेर ते विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' सारख्या यशस्वी चित्रपटातून समोर आले. परंतू हे सत्य आजही काहींना पचलेलं नाही. यावर टीका, टिप्पणी होतच आहेत. कोणी एक इस्रायली काश्मिरी पंडीतांच्या वेदनांना व्हल्गर प्रपोगंडा म्हणतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री चित्रपटाला युट्यूबवर लावण्याची भाषा करतायतं. त्यामुळे अजूनही असे वाटते की इतिहास बदलण्याचा प्रयत्न आजही होतोय!", असे अनूपम खेर यावेळी म्हणाले.