मुंबई: वर्धा येथे दि. 3 ते 5 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत आयोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्धा येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत संभाजीनगर येथील माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत चपळगावकर यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली. मंगळवारी वर्धा येथे प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विविध घटक संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांवर सविस्तर चर्चाही करण्यात आली. त्यातून न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर अखेरीस महामंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.संमेलन अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ लेखक सुरेश द्वादशीवार यांचेही नाव चर्चेत होते.
मात्र, “ललित साहित्याचे बहुतांश लेखक उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधीविरोधी होते,” असे अतार्किक मत साहित्यिक, पत्रकार व प्राध्यापक असलेल्या सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले होते. तसेच द्वादशीवार यांनी त्यांच्या भाषणात खांडेकर ते प्र. के. अत्रे यांसह अनेकांची निंदा केली होती. त्याचबरोबर “न्यायालयेसुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, ती हिंदू मताची झाली आहेत,” असे विधान करत त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेलाही अपमानित केले होते. अशी बेजबाबदार विधाने करून समाजातील भेदांना उत्तेजन देणार्या विषारी प्रवृत्तीचा अखिल भारतीय साहित्य परिषदेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता. तसेच द्वादशीवारांच्या या वादग्रस्त विधानांवरुन साहित्यिक वर्तुळातूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने त्यांच्या या जातीयवादी विधानांचा कडक शब्दांत खरपूस समाचारही घेण्यात आला होता. अशी विखारी विधाने करणार्या व्यक्तीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कदापि निवड होऊ नये, असा एक सूर त्यानंतर प्रकर्षाने उमटला होता. परिणामी, अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या दबावापोटी सुरेश द्वादशीवार यांची त्यांच्या साहित्यबाह्य टिप्पण्यांमुळे संमेलनाध्यक्षपदाची संधी आता हुकली आहे.
96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 3, 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्वीकारली असून संरक्षकपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी सांभाळली आहे. तसेच या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आहेत.
मंगळवारी वर्धा येथे पार पडलेल्या या बैठकीला महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश द. वंसकर, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व कार्यकारिणी सदस्य तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे इत्यादी उपस्थित होते.
विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. 3 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होईल. तसेच ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दि. 2 फेब्रुवारी रोजी संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. भारत सासणे यांच्या हस्ते होणार असून यात साधारणत: 300 स्टॉल्स असतील, अशी माहिती आहे.
साहित्य संमेलनाच्या आजवरच्या प्रथेप्रमाणे संमेलनाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने 3 फेबु्रवारी रोजी सकाळी 8.30 वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा असे अनेकविध कार्यक्रम या संमेलनात आयोजित करण्यात आले आहेत.संमेलनाचा समारोप दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होईल, अशी माहितीही यावेळी प्रा. उषा तांबे यांनी दिली. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी हे संमेलन वेगळ्या पद्धतीने व संस्मरणीय राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.प्रा. उषा तांबे म्हणाल्या की, “आजवर साहित्य संमेलनाला लेखक, कवी अध्यक्ष म्हणून लाभले. पण, यावेळी नरेंद्र चपळगावकर यांच्या रूपाने विचारवंत, लेखक तसेच, तर्कनिष्ठ व तत्वनिष्ठ भूमिका असलेला साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाले आहेत.”
निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा अल्पपरिचय
नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. चपळगावकर यांची ओळख वैचारिक लेखन करणारे आणि एक संवेदनाशील व सत्त्वशील व्यक्ती अशी आहे. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन 1961-62 मध्ये लातूरच्या ‘दयानंद विज्ञान महाविद्यालया’च्या मराठी विभागाचे प्रमुख होते. ते सध्या ‘गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड’मध्ये कार्यरत असून ‘नरहर कुरुंदकर न्यासा’चे एक विश्वस्त आहेत. ते संभाजीनगर येथे वास्तव्यास असतात. नरेंद्र चपळगावकर यांचे अनेक वृत्तपत्रांतून माहितीपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले असून ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणे याचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. ‘राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन’, ’मसाप’च्या ’विभागीय मराठवाडा साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ’भैरुरतन दमाणी पुरस्कारा’सह त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
द्वादशीवारांच्या विखारी वक्तव्यांच्या विरोधातील नैतिक दबावाचा परिणाम म्हणजे न्या. चपळगावकर यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याचे समाजमाध्यमांतून कळले. गेल्या महिन्यात संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. जवळ जवळ त्यांचे नाव निश्चित होण्याच्या टप्प्यावर असताना, नागपूर येथे एका कार्यक्रमात द्वादशीवार यांनी ब्राह्मण-अब्राह्मण वाद, जातीयता आणि सावरकरविरोध याविषयी अत्यंत विखारी वक्तव्य केले होते आणि या वक्तव्याला अखिल भारतीय साहित्य परिषदेने कडाडून विरोध केला. त्या विरोधाचा आणि निर्माण झालेल्या नैतिक दबावाचा परिणाम म्हणजे न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड आहे, याचा साहित्य परिषदेला आनंद, समाधान आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद न्यायमूर्ती चपळगावकर यांचे जाहीर अभिनंदन करत आहे.
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष हे निवृत्त न्यायमूर्ती असल्याने निश्चितपणे समाज जोडण्याची, राष्ट्रहित जपण्याची वैचारिक मांडणी करतील, तसेच साहित्य क्षेत्रातील गटतट, जातीयता, कंपूशाही अशा संकुचित विचारांतून साहित्यसृष्टी बाहेर काढतील. एक सकारात्मक दिशादर्शन त्यांच्या भाषणातून करतील, अशी अपेक्षा आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे आणि महामंडळाचे आभार.
-प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष,
अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र
मराठी विभागाचे प्रमुख ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती! मराठीचे संवेदनशील आणि वैचारिक लेखन करणारे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची 96व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
- देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र