मुंबई:भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अखेर चित्रा वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बदलत्या राजकीय स्थितीत भाजपने वाघ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देऊन आक्रमक राजकरणाला धार लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पारडतानाच महिलांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणार असल्याचे वाघ यांनी जाहीर केले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर मावळत्या प्रदेशाध्यक्ष आमदार उमा खापरे यांच्याकडून वाघ यांनी कार्यभारही स्वीकारला. याआधीच्या अध्यक्ष खापरे या विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आल्याने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या महिला नेत्यांची निवड अपेक्षित होते. मात्र, गेल्या साडेतीन-चार महिन्यांत ही निवड होऊ शकली नव्हती. त्यातच या पदासाठी पक्षातील महिला नेत्यांनी आपली वर्णी लागावी म्हणून पक्षनेतृत्वाकडे प्रयत्न केले होते. सध्या आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आल्यानंतर वाघ यांनी राज्यभरात चमकदार कामगिरी बजावली होती.
वाघ म्हणाल्या, “पक्षाने दिलेली जबाबदार पूर्ण क्षमतेने पार पाडेन. त्याचाच भाग म्हणून राज्यभर दौरा करून लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी राज्यातील सचेचा मोठा फायदा होईल सिंदखेडराजा येथून दौरा सुरू करणार आहे. यापुढच्या काळात सगळ्यांनी एकत्रित काम करायचे आहे."
कपाळावर टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे भाजपच्या महिला आघाडीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. अशा विधनांचे समर्थन करीत नसून, कोणी कसे राहावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याकडे वाघ यांनी लक्ष वेधले.