केवळ काँग्रेस नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळेच कर्नाटक सीमाप्रश्न पेटलेलाच!

केशव उपाध्येंचा आरोप

    25-Nov-2022
Total Views |
Keshav Upadhyay


मुंबई:
“महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्याच्या बदनामीची सुपारी घेतली आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. महाविकास आघाडीने (मविआ) आधी राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची हाकाटी पिटली होती. पण, त्यातून वास्तव बाहेर आले असून ते प्रकल्प त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे गेले होते, हे स्पष्ट झाले. तसाच प्रकार महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावरदेखील घडत असून अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न केवळ काँग्रेस पक्षातील नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळेच पेटलेलाच राहिला,” असा आरोप महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी केला.

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटकचा दावा सांगितल्यापासून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात मविआकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले जात असून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

एस. एम. जोशींचे पुस्तक अन् काँग्रेसवर निशाणा


एस. एम. जोशींच्या पुस्तकाचा संदर्भ देत उपाध्ये म्हणाले की, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी आपल्या ’मी एस एम’ या आत्मचरित्रात अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला होता. काँग्रेसच्या सीमावादावर असलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर आणि सीमाभागातील रहिवाशांवर कशाप्रकारे अन्याय झाला, याचे विस्तृत वर्णन करण्यात आलेले आहे. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेमुळेच आजही हा प्रश्न सुटलेला नाही.
एस. एम. जोशी हे भाजपच्या विचारसरणीच्या विरुद्ध विचारसरणीचे होते. तरीही आम्ही हा प्रश्न राज्याचा असल्यामुळे त्यांच्या भूमिकेचा संदर्भ देत आहोत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान भाजपचे विधान नसून देवेंद्र फडणवीसांची भूमिका हीच भाजपची भूमिका आहे,” असे केशव उपाध्येंनी म्हटले आहे






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.