भारतीय कुटुंब संस्था ही एक प्राचीन व अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. आपली संयुक्त कुटुंब पद्धती ही पाश्चात्त्य देशातील अभ्यासकांचा कुतूहलाचा विषय आहे. कालानुरूप यात अनेक बदल होत गेले. मात्र, कुटुंब संस्थेच्या भूमिका व जबाबदार्या, आजही कायम व तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कुटुंबाचे संवर्धन आणि चिरंतन कल्याणासाठी कुटुंब प्रबोधन महत्त्वाचे. कुटुंब प्रबोधन संकल्पना इथे मांडत आहे.
आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कुटुंब संस्थेचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुलाची पहिली शाळा ही त्याचे कुटुंबच असते. धर्म, रितीरिवाज, संस्कृती, भाषा, प्रकटीकरणाच्या पद्धती, नाते-संबंधांची ओळख व जोपासना, सामाजिकीकरण अगदी भाव-भावनांचे व्यवस्थापनदेखील याच शाळात प्रत्येक मूल शिकते. संयुक्त कुटुंबात अनेक वयोगटातील सदस्य असल्यामुळे दैनंदिन जीवन व्यवहारातून, सर्वच सदस्य कृती व अनुभवांच्या माध्यमातून समृद्ध व मूल्याधिष्ठित आयुष्याचे सूत्र आत्मसात करतात. संयम, कृतज्ञता, त्याग, सेवाभाव, प्रसंगी माघार घेणे ही मूल्ये परस्पर व्यवहारातून शिकली जातात. मात्र, कालानुरूप कुटुंबांची रचना बदलत असताना, जीवन-व्यवहार कौशल्ये शिकविणारी ही व्यवस्था कुठे तरी कमकुवत होताना दिसते. अर्थात, याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक-भावनिक-शारीरिक व आर्थिक जीवनावर होत आहे, हे नक्की. बाह्य जगातील आर्थिक-सामाजिक आव्हाने, समाजातून जाणिवपूर्वक उभे केले जाणारे चुकीचे विमर्श व परिणामी वाढीस लागलेली स्वकेंद्रित व भोगवादी वृत्तीमुळे पुन्हा एकदा कुटुंब प्रबोधनाचे कार्य हाती घेणे, आज गरजेचे झाले आहे.
आपली कुटुंब संस्था ही पूर्वीप्रमाणेच सक्षमपणे कार्य करू लागली, तरच कौटुंबिक नात्यांची वीण ही अधिक घट्ट व प्रगल्भ अशी विणली जाईल. कुटुंबात समाधान, आनंद, उत्साह व एकोपा वाढीस लागला, तर सुदृढ व सकस परिवार दिसू लागतील. सकस व सुदृढ कुटुंब व्यवस्था ही कुटुंबातील काही दृश्य लक्षणांमधून समजून येते. ही दृश्य लक्षणे अधिकाधिक कुटुंबांनी आत्मसात करावीत, याकरिता कुटुंब प्रबोधन उपक्रमांतर्गत ‘अमृत परिवार’ संकल्पना समाजात रुजविली जात आहे. अष्ट लक्षणेयुक्त असे आपले ‘अमृत परिवार’ असावे, या प्रयत्नात आपण ही सहभाग घ्यावा. चला तर मग, समजून घेऊ ‘अमृत परिवारा’ची अष्ट लक्षणे.
कुटुंबाचे मनःस्वास्थ्य हे त्या कुटुंबाच्या आध्यात्मिक बैठकीवर अवलंबून असते. कुटुंबात साजरे होणारे सण-उत्सव, धार्मिक ग्रंथांचे वाचन, केली जाणारी उपासना, देवदर्शन-सत्संग अगदी नित्यनेमाने म्हटल्या जाणार्या आरत्या-स्तोत्र या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा मन:स्वास्थ्यावर होत असतो. अशा कुटुंबातील सदस्य हे कट्टर व सकारात्मक विचारसरणीचे असतात. आध्यात्मिकतेसह अंतर्मुखता, मनोबल व वैश्विकता ही वाढीस लागलेले असे परिवार असतात ‘शिव परिवार.’ भारतीय खाद्य संस्कृती ही सर्व ऋतुमानांमध्ये, आपले शारीरिक आरोग्य जपणारी अशी आहे. कुटुंबातील खुला संवाद व आधारव्यवस्था हे आपले मानसिक आरोग्य अबाधित ठेवत असते, तर एकाच छताखाली अनेक भाव-भावनांचा निचरा होण्याची मुभा असल्यामुळे आपले भावनिक आरोग्य ही सकस राहते.
ज्या कुटुंबात शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने एक सकस व्यवस्था कार्यरत असते, अशा कुटुंबास स्वस्थ परिवार असे म्हटले जाते. अनेकदा ’श्रीमंती’ व ‘ऐश्वर्य’ या दोन शब्दांचे अर्थ समजून घेण्यात आपण गल्लत करतो. श्रीमंती ही काही आकड्यात मोजली जाऊ शकते. मात्र, एखाद्या कुटुंबाचे ऐश्वर्य मोजताना, जोडलेली माणसे, नाते संबंधातील गुंतवणूक, प्रसंगी एखाद्याच्या मदतीला धावून जाणारे किंवा संबंधितांच्या मदतीला धावून येणारे या संखेतून नक्कीच मोजता येईल. खरंतर कुटुंबाचे आरोग्य हे सगळ्यांनी ‘अर्थभान’ जपण्यातून सांभाळले जाते. ज्या कुटुंबाला योग्य ठिकाणी, योग्य तितकाच खर्च करण्याची कौशल्ये अवगत असतात, ती कुटुंबे आपल्या नेमक्या गरजा ओळखू शकतात. ईर्षा, स्पर्धा किंवा मोठेपण या गोष्टींना फाटा देत, कमाविलेला पैसा व खर्चाचे नियोजन याची उत्तम सांगड घालत, चार पैसे राखणारी ही कुटुंबे असतात. ’काटकसर’ या शब्दाचा नेमका अर्थ जाणणारी ही कुटुंबे असतात. सुख, आनंद किंवा समाधान हे पैशाच्या विनियोगातून मिळते, उधळपट्टीतून नव्हे हे जाणारी ही कुटुंबे ‘संपन्न परिवार’ असतात.
आपल्या समाजात व काही प्रमाणात कुटुंबात ही स्त्रियांना दुय्यमतेची वागणूक दिली जाते. कौटुंबिक श्रमाचे मूल्य नसल्यामुळे, अनेक कुटुंबांतील मातृशक्तीही दुर्लक्षित असते. संधी व अधिकारांपासून वंचित असते. मात्र, ज्या कुटुंबातील मातृशक्तीचा योग्य आदर, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, संधी स्वीकारण्याची मोकळीक व मुख्य म्हणजे ’माणूस’ म्हणून जगण्यची मुभा असते. ते असते ‘शक्तीकृपा’ परिवार. आपल्या मातृभूमीवर प्रेम सगळ्यांचेच असते. मात्र, हे प्रेमकृतीतून, दृश्यस्वरुपात कुटुंबात दिसले पाहिजे. एका पिढीकडून पुढील पिढीकडे हे प्रेम हस्तांतरित होण्याच्या दृष्टीने, कुटुंबात राष्ट्रीय सण साजरे होणे, घरात स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असणे, कुटुंबात चरित्र्य-गोष्टींचे वाचन होणे इ. गरजेचे आहे. मुळात देशप्रेम हे कुटुंबातून प्रथम शिकविले गेले पाहिजे. ज्या कुटुंबांमध्ये असे घडते, त्यांना देशिक परिवार असे म्हणले जाते. कुटुंबातील ‘एकोपा’ हा सकारात्मक संवादामुळे फुलत जातो.
कुटुंबातील सण-उत्सव सर्वांनी एकत्रितपणे साजरे करणे, यानिमित्ताने कौटुंबिक नात्यांना वेळ देणे, एकत्रित भोजन, भ्रमण, भजन करणे. भारतीय कुटुंबास साजेशी भूषा करणे, आपल्या घरात तुळस, काही फळा-फुलांची झाडे लावणे, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने योग्य वस्तूंचा वापर व विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींचा अवलंब करणे, आपले घर भारतीय पद्धतीने सजविणे, अशा अनेक गोष्टी करणार्या कुटुंबांना ‘मंगल’ व ‘हरित परिवार’ असे म्हणता येईल. असे म्हणतात खरा धर्म हा ’माणुसकीचा’ असतो. एकमेकांना ’माणूस’ म्हणून वागविणे, समाजाच्या उतरंडीवरील अगदी शेवटच्या घटकाशीदेखील माणूसपणाने वागविणे, आपल्याला सेवा देणार्या लोकांना/समाजास प्रसंगी धावून जाऊन मदत करणे, प्रसंगी आपल्या कुटुंबात आमंत्रित करणे, या सगळ्या गोष्टी कुटुंबांतून होणे गरजेचे आहे. अशा कृतीतून समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचा साकव बांधणारी कुटुंबे ही ‘समरसता व सेवा’ परिवार असतात. ‘अमृत परिवारा’ची अष्ट लक्षणे आपण समजून घेतली. आपल्यापैकी अनेक कुटुंबात ही अष्ट लक्षणे दिसून येत असतील. काही कमतरता जाणवत असेल, तर गुणात्मक सुधारणेस कायम वाव असतो, नाही का?
- स्मिता कुलकर्णी