आंब्याच्या किमान 500 जाती असून त्या भारताव्यतिरिक्त उष्ण कटिबंधातील पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, मेक्सिको, चीन, इंडोनेशिया, ब्राझील, नायजेरिया, फिलिपिन्स अशा अनेक देशांत वाढविल्या जात असल्या, तरी त्यातील अनेक मूळरूपी भारत, पाकिस्तान व बांगलादेशातील (पूर्वीच्या हिंदुस्तानातील) आहेत. बांगलादेशचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे. आम्रवृक्ष 120 फुटांपर्यंत उंच वाढतो आणि तो डेरेदार (40-50 फुटांपर्यंत व्यासाचा), भरपूर सावली देणारा असतो. त्याचे आयुष्यही भरपूर असते. 300 वर्षे वयाचे फळे येणारे आम्रवृक्ष पहिले गेलेत. याला थंडी मात्र सोसत नाही. तापमान जर शून्य डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून खाली गेले, तर हा वृक्ष मरतो.
आंब्याचं झाड लावण्यासाठी समशीतोष्ण ते उष्ण वातावरण व वसंत ऋतू उत्तम समजला जातो. कारण, या काळात जमिनीतील पाण्याचं प्रमाण ना अधिक ना कमी असतं. योग्य सूर्यप्रकाश मिळणार्या, मोकळ्या, रेताड, पाण्याचा निचरा होणार्या जमिनीवर लागवड केल्यास ती अधिक फलदायी ठरते. इतर झाडांपासूनचे अंतर हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण, आंब्याचा वृक्ष डेरेदार वाढतो. बाठीपासून किंवा लहान रोपांपासून लागवड करताना रोपांना योग्य आधार व त्याभोवती गुरे व इतर जनावरांपासून रक्षण करणारं कुंपण आवश्यक असतं. शेणखत, पाचोळ्यापासून बनवलेलं खत, मासळी पासून बनवलेलं खत या झाडास अधिक चांगलं. रासायनिक खत वापरताना जमिनीचा पोत, अल्कआम्लता, सिंचन या सार्यांचा, तसेच झाडाच्या वयाचा विचार करावा लागतो.
मोहोर येण्यापूर्वी खाते घातल्यास उत्तम परिणाम दिसतो. हवामान उत्तम राहिल्यास मोहोर चांगला येतो व फळे चांगली धरतात. द्रव रासायनिक खतांची फवारणी चांगली ठरते. सूक्ष्म पोषके (मायक्रो-न्यूट्रियंट्स) योग्य प्रमाणात मिळाल्यास फळे निरोगी व मोठी होतात. आंब्यावर हवेच्या गुणवत्तेनुसार विविध प्रकारच्या किडी येऊ शकतात. आंबा बागायतदारांना कीटकनाशासाठी पातळ ताकाच्या फवारणीचे उत्तम परिणाम मिळाले आहेत. गाईचे शेण व गोमूत्र यांच्यापासून तयार केलेले ‘जीवामृत’ देखील चांगला परिणाम देते. बाजारात अनेक व्यावसायिकांनी सेंद्रिय तसेच रासायनिक कीटकनाशके आंबा बागायतदारांसाठी उपलब्ध केलेली आहेत.
पुराणांमध्ये आंब्याचं झाड शिवाचे दोन्ही पुत्र गणेश व कार्तिकस्वामी (मुरुगन) यांचा आवडत असल्याचं म्हटलंय. दक्षिणेत असा समज आहे की, कार्तिकेयाने आपल्या भक्तांना आंब्याची पाने बांधण्याचं महत्त्व विशद केलं होतं. वास्तुशास्त्रानुसार आम्रवृक्ष वास्तूच्या पश्चिम आणि/अथवा दक्षिण दिशेस लावला असता सकारात्मक ऊर्जा वास्तूत वाढते व टिकून राहते. रामायण, महाभारत व इतर पौराणिक साहित्यात आंब्याच्या झाडाला सुपीकता, जननक्षमता व सृजनशक्तीचं प्रतीक मानलं गेलंय. कालिदासापासून अमीर खुश्रोपर्यंत अनेक रचनांमध्ये आंब्याचं गुणगान केलं गेलंय. केवळ आम्रवृक्षाची फळेच नव्हे, तर पाने, रस (सॅप), डिंक, साल (बार्क), लाकूड, बाठी, या सार्यांचे विविध उपयोग आहेत. आम्रवृक्षाची पानं हिरवीकंच, चमकदार व लांब असून त्यांचा देठ बुडाशी फुगीर असतो. त्यांना एक विशिष्ट सुगंधदेखील असतो.
महाराष्ट्रातील घरांतून प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची डहाळी प्रवेशद्वाराजवळ अडकवली जाते अथवा पानांचं तोरण बांधलं जातं. पूजन-अर्चन करण्यासाठी तयार केल्या जाणार्या पूर्णकुंभात आंब्याची पाने व नारळ या दोहोंना महत्त्व आहे. आंब्याची पाने वाटून केसांना लावण्याने केस चांगले वाढतात. आतुरता, चिंता, अस्वस्थता, असे सध्याच्या पिढ्यांतील तरुणांना ग्रासणारे विकार आंब्याच्या पानांचे वाटण खाल्याने किंवा पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने नियंत्रणात येतात. आंब्याची पानं उकळून रात्रभर गार करून ते पाणी सकाळी पिण्याने रक्तशर्करा नियंत्रणात येते. सावलीत वाळवलेल्या पानांची पूड पाण्याबरोबर घेतल्याने रक्ती आव (ब्लिडिंग डिसेंट्री) बरी होते, तसेच मुतखडे (किडनी स्टोन्स)/ पित्त खडे (गॉल स्टोन्स) विरघळून जातात. याने विषार निघून शरीरशुद्धीदेखील होते. आंब्याची पानं जाळून त्यांचा धूर घेतल्याने उचकी थांबते. आंब्याची पाने घालून उकळलेले पाणी नियमित पिण्याने पोटातील अंतव्रण (अल्सर) बरे होतात. असं पाणी पिण्यानं अल्झायमर/ पार्किन्सनस सारखे मेंदूचे विकार टाळले जाऊ शकतात व शरीराची चयापचय क्षमता सुधारते.
आंब्याची पानं व खोडाची साल तुरट असून त्यांचा वापर संधिवात व रोगसंसर्ग यांवर केला जातो, तर आंब्याचा डिंक त्वचारोग आणि टाचेच्या भेंगांवरील उपचारात गुणकारी असतो. कैरी किंवा आंब्याचे कच्चे फळ आंबट-तुरट असून त्यापासून लोणचे, पन्हे, मुरंबा, छुंदा, यांसारखे पदार्थ तर बनविले जातातच, पण त्याचे तुकडे मीठ-तिखट लावून खाण्याच्या नुसत्या विचारानेदेखील तोंडाला पाणी सुटते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात व आशियातसुद्धा कैर्या/आंब्यांपासून अनेक पाककृती केल्या जातात. पिकलेल्या अंब्याचा स्वाद व सुगंध इतका अप्रतिम असतो की, त्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा न आवडणारी माणसं अभावानंच आढळतात. प्रत्येक जातीच्या आंब्याचा आकार, रंग, स्वाद विशिष्ट असतो व तो बाजारात येण्याचा काळही वेगळा असल्याने आम्रप्रेमींना वर्षातील किमान चार-पाच महिने आंबे खायला मिळतात.
आंब्याच्या फोडी करून, चोखून, रस काढून, सासम करुन, आंबापोळी/ अंबाबर्फी/आंबा आईस्क्रीम, आम्रखंड, आंबा-जॅम अशा नाना रूपात आवडीने खाल्ला जातो. आमरस-पुरी, आमरस-पुरणपोळी, अगदी आमरस-भातदेखील मेजवानी असते. कैरी/ आंबा यांत 84 टक्के पाणी, 15 टक्के पिष्टमय पदार्थ, एक टक्का प्रथिने, नगण्य प्रमाणात मेद-पदार्थ, अ, ब, क, ई व के जीवनसत्वे तसंच मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, लोह, झिंक, यांसारखी मूलद्रव्ये असतात. 100 ग्राम आंब्यापासून सुमारे 250 किलो ज्यूल्स अथवा 60 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा प्राप्त होते.
यांतील रंगद्रव्ये अॅण्टिऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. म्हणूनच आंबा पौष्टिक, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारा, शरीराची झीज भरून काढणारा व पेशींना बळकटी देणारा ठरतो. आंबा रक्तवर्धक, शरीराचे वजन, पचनशक्ती व रोगप्रतिकार क्षमता वाढविणारा असतो. त्यात असणार्या बाठीमुळे आंब्याला ‘स्टोन फ्रूट’ म्हणतात. फळाच्या तुलनेत बाठ 20 ते 60 टक्के असून त्यातील बी 45 ते 75 टक्के जागा/ वजन व्यापते. वाळलेल्या बीमध्ये 58 ते 80 टक्के पिष्टमय पदार्थ, 6 ते 13 टक्के प्रथिने व 6 ते 16 टक्के मेद पदार्थ असतात. प्रत्येक किलोग्रॅम बीमध्ये 67 ग्राम टॅनिन्स असतात. त्यामुळे भाजलेल्या बिया सुपारी सारख्या खाता येतात व स्वादिष्ट लागतात.
बाठी सर्वसाधारणपणे फेकल्या जातात व त्यामुळे समाजातील वंचित घटकांत त्यातील बियांचे पीठ करून त्या पिठाच्या भाकर्या करून खाल्ल्या जातात, तसेच गुरांचे खाद्य म्हणूनही वापरल्या जातात. आंब्याच्या बी पासून काढलेले तेल चेहर्याच्या त्वचेला तजेला देते व त्यातील ‘कोलॅजिनेझ’ त्वचेची लवचिकता वाढवते आणि मुक्त मूलकांचा (फ्री रॅडिकल्स) नाश करते, ज्यामुळे हे तेल वयःस्थापक म्हणून वापरले जाते. आंब्याचं लाकूड अधिक घनतेचं व टणक असतं. त्याचा वापर शेतीच्या अवजारांची निर्मिती, बैलगाडी बांधणी, घराचे वासे, दारे-खिडक्या बनविण्यासाठी तसेच गृहांतर्गत सजावटीसाठी (फर्निचर) देखील केला जातो. आंब्याच्या लाकडांतील ‘टॅनिन्स’मुळे ते टिकावू व कीडरोधक असते. त्याची चमक व ‘पॉलिश’ चांगलं राहत असल्याने व ते तुलनेत स्वस्त असल्याने आंब्याचे लाकूड खेडेगावांतून अधिक वापरले जाते.
आंब्याच्या कोवळ्या पालवीचा रंग लालसर असतो व त्यापासून ‘मँजीफेरीन’ हे रंगद्रव्य मिळवितात. जून पाने, खोडाची साल, फळांची साल यातूनही हे रंगद्रव्य मिळवले जाते. याचा वापर वेदनाशामक, सूज- उतरविणारे, चेता-संरक्षक, रोगप्रतिकारक्षमता वाढविणारे रसायन म्हणून तसेच विभिन्न कर्करोगांत पेशींची अनैसर्गिक वाढ रोखण्यासाठी प्रभावी ठरते. आंब्याची पाने, खोड, साल यांतील ‘उरुशिऑल’ या रसायनाच्या संपर्कामुळे अनेकांना त्वचेवर पुरळ उठणे किंवा श्वसनास त्रास होणे असे विकार उद्भवतात. आंब्याच्या मोहोरांतून निघणार्या बाष्पनशील रसायनांमुळे तसेच परागकणांमुळेदेखीलकाहींना श्वासांचा त्रास, डोळ्यांची जळजळ, खाज येणे असे असात्मीयतेचे (अॅलर्जी) विकार उद्भवतात.
नीट न धुतलेले आंबे खाल्याने, त्याच्या देठाजवळील चीक लागून त्वचा विकार होतो, ज्याला ‘आंबा उबारणे’ असं म्हणतात. आमराईत तापमान इतरत्र असलेल्या तापमानाहून किमान तीन ते पाच डिग्री सेल्सियस कमी असते. आंब्याची झाडे जमिनीची धूप रोखून त्यातील कर्ब वाढवतात. हवेतील अतिरिक्त कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डियॉर्कसाईड) शोषून तापमानवृद्धी रोखतात. रेताड जमिनीत व तुलनेने कमी पाण्यात आंब्याची झाडे वाढू शकत असल्याने व त्यापाससून अनेक प्रकारचे फायदे मिळत असल्याने या वृक्षाची लागवड जोमाने व्हावी. रस्त्याच्या कडेला लावण्याने तापमान कमी राखून इंधनाची बचतही होईल. या महाराष्ट्राच्या राज्य वृक्षाचे संरक्षण, संवर्धन जाणीव पूर्वक केल्यास पर्यावरण तर उत्तम राखले जाईलच, त्यासोबतच् ग्रामविकासदेखील होईल.
-डॉ. पुरुषोत्तम काळे
(लेखक निवृत्त जीवशास्त्र प्राध्यापकव निसर्गमित्र आहेत.)