मुंबई : राज्यातील मोठे उद्योग महाराष्ट्रातून गेल्यावरून सध्या जोरदार आजकारण सुरु आहे. या राजकारणाला उत्तर म्हणून राज्यातील फडणवीस शिंदे सरकारने राज्यात उद्योग परत आणण्याचा आणि राज्यात याआधी बंद पडलेले उदयोग पुनरुज्जीवित करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. या धोरणानुसार कोकणासाठी महत्वाचा ठरलेल्या दाभोळ येथील एन्रॉन प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. राज्य सरकाकडून केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.
१९९५ साली आलेल्या युती सरकारच्या काळात सुरु झालेला हा प्रकल्प २०१३ पासून बंद पडला आहे. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे हा प्रकल्प बंद पडल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या मालकीची रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. या कंपनीकडे या प्रकल्पाची मालकी देण्यात आली आहे. तिच्याच मार्फत या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या प्रकल्पाचे दोन प्रकल्पांमध्ये विभाजन केले जाणार आहे. वीज निर्मिती आणि दुसरा गॅस पुरवठा यासाठी या दोन्ही कंपन्या काम करतील असे राज्यसरकारकडून ठरविण्यात आले आहे.
या प्रकल्पातून जवळपास ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. ज्यातून प्रामुख्याने रेल्वेकडून ही वीजखरेदी केली जाणार आहे. वीजनिर्मिती करणारी ही एन्रॉन कंपनी मध्यंतरी वादात सापडली होती. त्यानंतर या कंपनीने भारतातून काढता पाय घेतला होता. पण आता हा प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.