मुंबई ( kalyani jadhav death ) : तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे.कल्याणी जाधव यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाद्वारे स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अपघाती निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या.काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव यांनी 'प्रेमाची भाकरी' नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.
आठवडाभरापूर्वीच कल्याणी ( kalyani jadhav death ) यांनी सोशल मीडियावर आपल्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ‘काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला. मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही, ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आहे. असंच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती. त्याचसोबत भाकरी थापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
दरम्यान कल्याणी यांचा अपघात ( kalyani jadhav death ) झालेला कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार होत आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.