सांगली : सांगली आकशवाणीवरून श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे जेष्ठ वृत्तनिवेदक वामन काळे यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षे ते आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. आपल्या संवाद कौशल्याने आणि शब्दांवरच्या हुकमतीने त्यांनी अनेक कार्यक्रम गाजवले होते. आकाशवाणीवरील 'प्रभातीचे रंग'पासून ते आपली आवड यांपर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे निवेदन ते करत असत. आपल्या आवाजाने रसिकांवर छाप पाडण्याची त्यांची विलक्षण हातोटी होती.
अनेक क्षेत्रांचा सखोल अभ्यास, विविध विषयांचा व्यासंग यांमुळे त्यांचे प्रत्येक कार्यक्रम नेहमीच लोकप्रिय व्हायचे. निवृत्तीनंतरही ते साहित्य, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत होते. वामन काळे यांच्या निधनाने वृत्तनिवेदन क्षेत्रातले एक अनुभवी मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले अशीच भावना व्यक्त होत आहे. वामन यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.