मुंबई: शिवतीर्थावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना थोडेसे भान ही ठेवले नाही. ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. "शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीचा निषेध करावा तितका कमी आहे." असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
"शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद. शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद. पदे वाटताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात... हे करत असताना त्याच्या आईच्या मनाचा जराही विचार केला नाही की तिला काय वाटले असेल. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवले, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला याआधी कधीही गेले नव्हते..ज्यांनी नेले त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे." अशी भूमिका चित्राताईंनी मांडली.