आजच्या आपल्या लेखाची नायिका आहे चित्रकर्ती डॉ. मीनल राजुरकर. त्यांनी त्याच्या कल्पनाशक्तीला अनेक ‘अँगल’नी तपासले आहे, जोखले आहे. त्यांच्या प्रयोगशील विचारांचं कोंदण लाभलेल्या कल्पनेला मूर्त स्वरूपात साकारताना मोठी अद्भुतता, तर जाणवतेच. परंतु, विविधांगी वैशिष्ट्यांनी सजलेल्या त्यांच्या कलाकृती या कुठेही बीभत्स वाटत नाही. भाव-भावनांची अतिरेकी तोडफोड करणार्या वाटत नाहीत किंवा विद्रूपही वाटत नाहीत.
'जेन देखे रवि, ते देखे ’चित्रकार...!‘ असं काही प्रयोगशील चित्रकारांचे कलासृजन पाहून म्हणण्यास वाव आहे. आपल्याकडे कल्पनाशक्तीचं दृश्यस्वरूपात मांडणं आणि कल्पनाशक्ती म्हणण्यापेक्षा कल्पनाशक्तीची चिरफाड करून ती मांडणं, या दोन प्रकारची कामे दृश्यकलाप्रकारात पाहायला मिळतात. ’चिरफाड‘ करून मांडलेली दृश्यकला ही सवंग प्रसिद्धीच्या झोतामुळे खूप चर्चेला येते. कदाचित प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीच्या तो एक ’स्टंट‘ देखील असल्याचे बोलले जाते. थोडसं भूतकाळात डोकावलं, तर आपल्या ध्यानात येईल की, हिंदू देवदेवतांची विकृतपणे चित्रे रेखाटलेली कुठेतरी आढळतात. परंतु, ती वळवाच्या पावसाप्रमाणे किंवा एखाद्या वावटळीप्रमाणे येऊन निघूनही जातात. त्यांच्या त्या विक्षिप्त कृतीला कलारसिकचं काय, तर साधा समाजही विसरतो. कारण, त्यांच्या त्या कथित कलाकृती या उथळ विचारावर आधारित असतात. त्यामुळे फारशा स्मरणात राहतदेखील नाहीत.
आपल्याकडे इसवी सनाच्या पूर्वीपासून निर्माण झालेल्या कलाकृती मग त्या द्विमित असो की त्रिमित असो, आपणांस पाहावयास मिळते की, दोन किंंवा अधिक प्राण्यांचे उपकार हे मानवी आकारांशी जोडायचे, जो काही आकार बनेल, त्याला विशिष्ट नाव द्यायचं. याचं अत्यंत बोलकं उदाहरण म्हणजे ‘गजवदन’ म्हणजे हत्तीचा चेहरा घेऊन साकारण्यात आलेली आकृती. म्हणजे आजचा तुम्हा-आम्हाला सर्वांचा श्रद्धास्थानी असलेली श्रीगणेश, सिंहवदनी असलेले श्रीनरसिंह किंवा नृसिंह वानराचा चेहरा असलेले श्री हनुमंत अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. अशा प्रतिमांना, मूर्तींना देवशक्ती रूप मानले जाते.
त्यामागच्या भावना, श्रद्धा आणि निष्ठा या प्राचीन ऋषिमुनींच्या उपासनेतून, साधनेतून त्यांना आलेल्या अनुभूतीतून साकारलेल्या आहेत. हत्तीची प्रचंड स्मरणशक्ती, त्याची दृष्टी, त्याचं स्पर्शज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून ओळख असलेल्या श्रीगणेशांची रूपकात्मक आकृती यांचा संबंध तत्कालीन तपस्वी योगीमुनींना जाणवला असावा. त्यातून श्रीगणेशाकार आपल्या हृदयात बसला. अनेक विचारांतून या सर्व प्रतीकांकडे बघण्याचा दृष्टिकोन ही दिवसेंदिवस वाढत वाढत जात आहे. त्यांना उत्सवी स्वरूप प्राप्त होत आहे. प्रतीकांकडे पौराणिक, वैदिक, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याचा, त्यांचा अर्थ लावण्याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केलेला आहे, अनेक संदर्भ आहेत. तो अगदीच वेगळा विषय होईल. आजच्या आपल्या लेखाची नायिका आहे चित्रकर्ती डॉ. मीनल राजुरकर.
त्यांनी त्याच्या कल्पनाशक्तीला अनेक ‘अँगल’नी तपासले आहे, जोखले आहे. त्यांच्या प्रयोगशील विचारांचं कोंदण लाभलेल्या कल्पनेला मूर्त स्वरूपात साकारताना मोठी अद्भुतता, तर जाणवतेच. परंतु, विविधांगी वैशिष्ट्यांनी सजलेल्या त्यांच्या कलाकृती या कुठेही बीभत्स वाटत नाही. भाव-भावनांची अतिरेकी तोडफोड करणार्या वाटत नाहीत किंवा विद्रूपही वाटत नाहीत.
त्यांनी प्राण्यांच्या चेहर्यात माणसांचे चेहरे शोधण्याचा एक भन्नाट प्रयत्न केला आहे. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांनी त्यांच्या ’युगंधर‘मध्ये कुत्रा/श्वान या प्राण्याला ’ग्रामसिंह‘ असे संबोधले आहे. मग त्याची बसण्याची ऐट, कमकुवत दुसर्या प्राण्यावर करण्याचा हल्ला आदी गोष्टी पाहिल्या, तर तो ’ग्रामसिंह‘च भासतो. म्हणजे उदात्त हेतूंनी वा विचारांनी पाहण्यासाठीची दृष्टी त्यांनी वाचकांसमोर मांडलेली आहे, तर ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी कित्येक काळ त्यांच्या आयुष्याचा हा जंगलात, रानावनात पशुपक्षी यांच्या निरीक्षणांत घालवलेला आहे, अभ्यास केलेला आहे. त्यांची ही निरीक्षणे वाचताना अगदी चिमणीपासून तर गरूडापर्यंत आणि उंदरापासून तर सिंहापर्यंत प्रत्येक जीवात्म्याची प्राकृतिक वर्णने थक्क करणारी आणि वेगळ्या विश्वात नेणारी वाटतात. डॉ. मीनल राजुरकर यांच्या कलाकृतीदेखील अशाच एका अद्भुत विश्वात घेऊन जातात.
अनेक भारतीय आणि परदेशी दृश्यकलाकार त्यांच्या-त्यांच्या कलाकृती सादर करीत असतात. त्यांचे गट वा समविचारी कंपू असतात. हे सर्वजण एकमेकांच्या कलाकृती कशा उत्तमोत्तम आहेत किंवा अमुक एका कलाकराचे काम म्हणजे प्रगल्भतेचे उच्च शिखरच, असे काहीसे बोलत-बोलत एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने कथित उंची गाठण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. या व अशांच्या कंपूत सहभागी न होणार्या दृश्य कलाकारांना थोडा ’स्ट्रगल‘ सहन करावाच लागतो. अशा एका ’स्ट्रगल‘ला डॉ. मीनल राजुरकर यांना सामोरे जावेही लागलेले होते. परंतु, त्यांचे कलासृजनाचे विचार हे स्वतःचेच असल्यामुळे आणि कलानिर्मितीतंत्रदेखील स्वनिर्मित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शैली-तंत्राला कुणा कंपूच्या अधीन होऊ दिले नाही. त्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगूनही जातात की, त्यांच्या कलाकृतींना बाहेरची मागणी अधिक असते. या त्यांचा अनुभवाने खूप काही गोष्टी स्पष्ट होतात.
कदाचित असल्या कटूअनुभवांमुळेच त्यांना माणसांचे चेहरे काढणं, चितारणं, कंटाळवाणं वाटत असावं. त्या तेव्हा पदव्युत्तर पदवी शिक्षण म्हणजे मास्टर कोर्स करीत होत्या. तेव्हा संशोधनात्मक विचारांना दृश्यस्वरूपात आणावे लागते म्हणून वरील विचारांवर त्यांनी संशोधन करण्यास प्रारंभ केला.
माणूस ही माकडाची सुधारलेली आवृत्ती आहे. माणसांच्या चेहर्यावरील भाव आणि प्राण्यांच्या चेहर्यावरील भाव यामध्ये त्यांना साम्य दिसू लागले. व्यक्तिचित्रण अथवा ‘पोर्ट्रेट’ जसे केले जाते, तसे त्यांनी प्राण्यांच्या चेहर्याची वा शरीररचनेची त्यांच्या कलाकृतीसाठी योजना केली. प्राण्यांच्या चेहर्यांकडे त्यांनी माणसांच्या चेहर्याची प्रतीके म्हणून पाहिले. अशाच स्वरूपाच्या त्यांच्या एका कलाकृतीला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या प्रदर्शनात प्रतिसाद मिळाला. ती कलाकृती बाहेरच्या व्यक्तीने खरेदी केली, तो क्षण राजुरकर यांच्या कलासाधनेतील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.
त्यांनी ‘रॉयल पोर्टे्रट्स’ साकारायला सुरुवात केली. ‘रॉयल’ या अर्थाने की, पूर्वी राज-राजवाडे, संस्थानिक महाराजे, मोठे धनिक धनवान अशी मंडळी प्राणी पाळीत असत. कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे चित्ता पाळलेला होता, हे नुकतेच वृत्तपत्रातून वाचायला मिळालेले आहे. हे सर्व भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही प्राणी पाळले जायचे. नरवीर तानाजीकडे तर घोरपड होती. घोडे, कुत्रे-श्वान, हत्ती असे प्राणी तर सर्रास पाळलेले असल्याचे संदर्भांवरून समजते. हे प्राणी जर त्यांच्या-त्यांच्या, महाराजांच्या वा सांस्कृतिकतेच्या पेहरावांत कसे दिसतील, या कल्पकतेतून डॉ. मीनल राजुरकर यांनी त्यांच्या कलाकृती साकारल्या. या कलाकृतींना त्यांनी ‘रॉयल पोर्टेट्स’ असे म्हटलेले आहे. या कलाकृती नावाप्रमाणेच भासतात. त्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी तशाच ‘रॉयल’ वाटणार्या रंग माध्यमांचा उपयोग केलेला आहे.
‘अर्थ-कलर’ म्हणजे नैसर्गिक रंग, जे रंगीत दगडांपासून बनवलेल्या पावडरींपासून तयार केले जातात. ते रंग आणि ‘नेपाली’ नावाचा पेपर यावर त्यांची कलाकृती साकारली जाते.
विविध प्रकारची कोजळी किंवा काजळी बनवून तिच्यापासून बनविला जाणारा गडद रंग, रंगीत दगडांची पूड आणि ‘नेपाली’ पेपर, मुंबईत याच पेपराला ‘राईस पेपर’ असंही म्हणतात. हा कागद त्या मद्रास वा कोलकत्यामधून मागवतात.
अशा प्रकारचे माध्यम चोल, अजिंठा, माग या काळात वापरले गेले आहे. ‘कलर’ची ‘इंटेन्सिटी’ अर्थात विशुद्धत्ता ही कालपरत्वे भिन्न असू शकते. परंतु, रंगकाम हे एकाच पद्धतीचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या अध्ययनाच्या व नंतरच्या काळात ‘पिछवाई’ (पिचवाई) वर्कशॉप केलेले होते, त्याचाही अनुभव हे रंगमाध्यम निश्चित करताना त्यांना उपयुक्त ठरला.
‘नॅचरल’ पद्धतीने रंगलेपनातील आनंद पारंपरिक बाज आणत असल्यामुळे एक प्रकारच्या ’रिचनेस’ त्यांना जाणवतो, असं त्या सांगतात. प्रचलित परिस्थितीवरही त्यांनी त्यांच्या मनातील हिंदोळ्यांना जागा मोकळी करून दिलेली आहे. राजकीय परिस्थितीतील विदारकता आणि काळे-गोरे वर्णवादासह जातीयवाद अशा संवेदनाक्षम विषयांवरही त्यांच्या कुंचल्याने आसुडाप्रमाणे कोरडे ओढलेले आहेत.
अशा प्रयोगशील ठाम आणि सूक्ष्म अभ्यासातून दृश्य कलानिर्मिती करणार्या कलाकारांची आवश्यकता आहेच. डॉ. मीनल राजुरकर या ‘डॉ. वसंतदादा आर्ट अॅण्ड डिझायनिंग कॉलेज, चेंबूर’ येथे ‘पेंटिंग’ विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या कलाप्रवासाला आणि कलाध्यापनाला अनेक शुभेच्छा...!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ