नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे बांधावर पोहोचले आहेत. त्यांनी धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली. "मी शहराकडचा आहे, मला शेतीतलं जास्त काही कळत नाही", असं नेहमी म्हणणारे आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर का होईना बांधावर हजर झाले. या दौऱ्यातही त्यांनी शिंदे सरकार, पन्नास खोके, याच मुद्द्यांवरुन सरकारवर टीका केली आहे.
आपल्या नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे म्हणाले, "यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली गावच्या स्थानिकांनी आत्ता भेट घेऊन दिलेले निवेदन स्विकारले आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेतले."
"सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील संपत रामनाथ शिंदे व दत्तात्रय धोंडू शिंदे ह्या शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन भेट घेतली. अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन धीर दिला. बळीराजा व्यथीत आहे,अडचणीत आहे,पण महाराष्ट्राचा अन्नदाता हरलेला नाही, शिवसेना त्याच्यासोबत आहे!", असेही ते म्हणाले.