अकोला : एखादा व्यक्ती मृत झाल्यावर आजकाल समाजमाध्यमांवर त्याच्या नावाचे स्टेटस ठेवण्याची फॅशन आली आहे. पण आपण एखाद्या व्यक्ती मृत झाली म्हणून असे स्टेटस ठेवायचो आणि तो व्यक्ती खरंच तिरडीवरून उठून जिवंत परत आला तर? किती मोठा धक्का बसेल ना? अशीच घटना घडलीये अकोला येथे. अकोल्यातील एका २१ वर्षीय तरुणाला तो मृत झाल्याचे समजून घरच्यांनी स्मशानात अंत्यसंस्कारासाठी नेले आणि तो खरोखरच जिवंत होता आणि तिरडीवरून उठून परत आल्याची घटना घडली आहे. प्रशांत मेसरे असे या तरुणाचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली आहे.
अवघ्या २१ वर्षांचा प्रशांत मृत झाल्याचे समजून त्याच्या घरचे आणि नातेवाईक त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात घेऊन जायला निघाले. पण वाटेतच प्रशांतची हालचाल सुरु असल्याचे दिसून आले आणि प्रशांत चक्क तिरडीवरून उठून परत आला. झाला प्रकार एवढा धक्कादायक होता की बघ्यांची झालेली गर्दी हटवायला पोलिसांना पाचारण करावे लागले. प्रशांतच्या मित्रमंडळींनीही त्याच्या मृत्यूची खबर ऐकून 'मिस यु प्रशांत' असे स्टेटस ठेवायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता त्यांनाही जोरदार धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी मात्र प्रशांतवर कोणीतरी काळी जादू केल्याचा दावा केला आहे. आत पुढील प्रकाराची चौकशी होऊन खरं काय ते नक्कीच समोर येईल.
या सर्वातून मात्र त्या प्रशांतची आणि त्याच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. यातून तरी बोध घेऊन कुठल्याही आजार किंवा काही झाल्यास थेट स्वतःचे निष्कर्ष काढण्याआधी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे किती गरजेचे आहे हे समजून घ्यावे. आतातरी ग्रामीण भागापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.