संगीत नाटकाच्या 'शिलेदार' हरपल्या

ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन

    22-Jan-2022
Total Views | 138

Kirti Shiledar
 
 
पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. गेली ६० वर्ष संगीत नाटकासाठी काम केलेल्या ७० वर्षीय कीर्ती शिलेदार यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण कालाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
रंगभूमीचा वारसा लाभलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या १० व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केले होते. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होते. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली.
 
 
देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली होती. २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, विशेष म्हणजे एकमताने निवड झाली होती.
 
 
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन. एस. डी. तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’ च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. कीर्ती शिलेदारांना २००९मध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार , १९९९मध्ये नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान , २००६ मध्ये पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘मम सुखाची ठेव ‘ हा लघुपट त्यांच्या भगिनी दीप्ती भोगले यांनी प्रदर्शित केला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121