राष्ट्राभिमानी ज्येष्ठ चित्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2022
Total Views |

bal thakur


बाळ ठाकूर ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर अर्थात भालचंद्र शिवराम ठाकूर यांचे दि. ८ जानेवारी रोजी कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड येथील राहत्या घरी निधन झाले. निधन होणं ही घटना दुःखद आहेच. परंतु, दि.२४ एप्रिल १९३० रोजी जन्मलेले बाळ ठाकूर हे त्यांच्या कलाजीवनातील तब्बल ६० हून अधिक वर्षांत, रेखा आणि रंगात रममाण राहिले... त्यांचं जाणं ही समस्त कला व दृश्यकला जगताला मनाला चटका लावून गेलेली घटना आहे...


च्या नावातच ‘बाळ’ आहे. त्यांनी त्यांचे अखेरचे केलेले काम देखील ‘बाळसेदारच’ ठरले. त्यांची लांब रेषा ही कधी खंडित वाटली नाही, त्यांच्या रेखांकनातील चेहरे हे (कदाचित) मूळ चेहर्‍यांहूनही तेजस्वी वाटायचे, त्यांच्या कथा-रेखांकनातील प्रसंग पाहूनच, कथेचा आशय समजायचा आणि ती कथा वाचावी अशी इच्छा वाचकांना व्हायची, हाच अनुभव त्यांच्या मुखपृष्ठाच्या बाबतीतही यायचा.त्यामुळेच कदाचित भल्या-भल्या प्रस्थापित आणि वाचकप्रिय लेखकांना, कथाकारांना आणि नाटककरांना, त्यांच्या शब्दकृतींना बाळ ठाकूरांच्या रेखाकृतींचा साज चढला तरच पूर्णत्व वाटायचे!!



 
कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या बाळ ठाकूर यांचे शालेय आणि प्राथमिक शिक्षण हे गावीच झाले. त्याकाळात शाळेत जाण्यासाठी जी खापराची पाटी मिळायची, ती फार काळ सुरक्षित राहत नसे. तिचे कधीच दप्तरात तुकडे झाले, तर एखाद्-दोन मोठ्या तुकड्यांवर ते पेन्सिलीने चेहरे रेखाटायचे. समोर दिसेल वा मनात असेल तो चेहरा रेखाटताना लहान्या बाळ यांना त्यांच्या स्मरणशक्तीची फार मदत होत असे, तर निरीक्षणशक्तीने त्यांच्या रेखांकनाला बळ मिळत असे. शालेय शिक्षणानंतर माध्यमिकचे मॅट्रिक पूर्ण केल्यावर मुसाकाजी बंदरातून बाळ, मुंबईत बोटीने प्रवास करुन पोहोचले. त्यांच्या वडिलांचे आणि मुंबईतील ढवळे यांचे मित्रत्वाचे संबंध, बाळ ठाकूरांच्या सुप्त कलाकाराला मूर्तस्वरुपात आणण्यास फार उपयुक्त ठरले.मुंबईत १९४८ साली त्यावेळच्या प्रतिष्ठा व सुप्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये बाळ ठाकूरांचे ‘कमर्शियल आर्ट’चे पदविका शिक्षण पूर्ण झाले आणि ‘कमर्शियल आर्ट’चे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाहिरात क्षेत्रात ठाकूरांनी पाय रोवला! मुंबईत असणार्‍या परंतु, जगप्रसिद्ध अशा जाहिरात संस्थांपैकी जे वॉल्टर थॉम्प्सन, अय्यर्स, एचएमव्ही, इएमआय, उल्का अशा जाहिरात संस्थांमध्ये त्यांनी ‘आर्टिस्ट’ म्हणून काम केले. ‘उल्का’ एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या एका कॅम्पेनसाठीचे, ठाकूरांचे काम फारच रसिकमान्य झाले होते. त्यांनी सतारवादक पं. रवी शंकर, शहनाईवादक, पं. बिस्मिल्हाह खाँ अशा पाच दिग्गजांची रेखांकने, त्या जाहिरात संस्थेचे देखील नाव मोठे करुन गेली.



 
कला महाविद्यालयीन जीवनात त्यांना द. ग. गोडसे यांच्या चित्रांनी भूरळ घातली. आजही ‘दगं’ची काही चित्रे सर ‘ज.जी.ए. क.म.’च्या संग्रहात आहेत (असं ऐकायला मिळतं). ‘दगं’ बरोबरच त्यावेळचे बाळ ठाकूरांचे एक प्राध्यापक मधुकर जोमराज यांचीही रेखाटने त्यांना भूरळ घालीत. महाविद्यालयीन जीवनात आवडणार्‍या कलाकाराच्या कामाचा प्रभाव हा त्या त्या विद्यार्थ्याच्या कामावर पडतोच. तो दोष नसतो. ती एक श्रद्धेय घटना असते. त्यातूनच त्या कलाकाराला स्वत:चा मार्ग गवसत असतो. जन्मत:च कोणीही परिपूर्ण नसतो. मात्र, पूर्णत्वाजवळ जाणार्‍या वा गेलेल्या व्यक्तींचा सहवास लाभला की, भक्ताचं-शिष्याचं वा विद्यार्थ्याचं जीवन त्याला गवसतं. त्याला मार्ग सापडतो. बाळ ठाकूर यांनाही त्यांची हक्काची रेषा गवसली. स्वच्छंदी, मनाला पटेल आणि आत्मानंद प्राप्त होईल असंच काम करण्याचं त्यांनी मनाशी पक्क केलं. जाहिरात संस्थेतील कामाची पद्धत त्यांना फारशी मानवली नाही. ‘बॉस सांगेल तसं काम करायचं असेल, तर आपण कुठे दिसतोय त्या कामात?’ या प्रश्नानं त्यांना दिवसरात्र ग्रासलं आणि जेमतेम दोन-तीन वर्ष, जाहिरात संस्थेचा अनुभव घेऊन बाळ ठाकूर यांनी ‘फ्रीलान्स’ कामे करण्याचा निर्णय घेतला.





साल होतं १९५०. उंच आकाशात उडणार्‍या गरुडाला त्याच्या पंखांवर विश्वास असतो, म्हणूनच तो डोंगरांहून उंचच उंच भरारी घेऊ शकतो. बाळ ठाकूर यांना त्यांच्या कुंचल्यावर, क्रुकवेलवर, पेन्सिलीवर असीम विश्वास होता. मुळात साहित्याची आवड-जाण, आकलन, मनन, चिंतन, क्षमता आणि कौशल्ये या सप्तरंगावर त्यांची अपार श्रद्धा होती. या श्रद्धेलाच बाळकडू मिळालेे असल्यामुळे बाळ ठाकूर हे ‘मुखपृष्ठकार’ या नाव लौकिकाचे हक्कदार ठरले. आपल्या पुस्तकासाठी वा आपल्या लेखांसाठी अनुरुप-अचूक आणि अतिशय बोलके मुखपृष्ठ वा रेखांकने असावी अशी अपेक्षाच नव्हे, तर हट्ट धरणारे समकालीन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कांदबरीकार, प्रकाशकाकडे, बाळ ठाकूरांच्या कलेची साथ मागू लागले. अत्यंत अल्पावधीत बाळ ठाकूर हे मराठी सारस्वतातील नावाजलेले, अभ्यासू- चिंतनशील चित्रकार म्हणून गणले जाऊ लागले.




त्यांनी त्यांच्याकडे एखादी ‘झीस्ट’ वा ‘ब्रीफ’ कुणी पाठविले तर त्यावर रेखांकन केलं नाही. त्यांना पूर्ण पुस्तक वा पूर्ण लेख... ज्यासाठी त्यांना मुखपृष्ठ वा रेखांकन करायचं आहे, ते साहित्य पूर्ण वाचल्याशिवाय कधीही त्यांनी ब्रश वा रंगांना हात लावला नाही. इतकी निष्ठा, इतका कर्मठपणा आणि इतका पारदर्शीपणा फार क्वचितच एखाद्या दृश्यकलाकाराठायी आढळतो. ते म्हणायचे की, “ही कामे मी माझ्या मनाच्या स्वातंत्र्याने करतो-करु शकतो. मात्र, एजन्सीत वा इतर ठिकाणी हे स्वातंत्र्य मिळत नाही.” त्यांच्या मते, मुखपृष्ठ, आतील रेखांकने यांची निर्मिती प्रक्रिया ही विशिष्ठ ध्येये आणि उद्दिष्टे घेऊन आलेली असते.




मुखपृष्ठ निर्मितीमागे ते इतर स्पर्धक पुस्तकांमधून कसे लक्ष वेधून घेईल, हे पाहिले जाते. संपूर्ण पुस्तकाच्या मांडणीमध्ये ते कसे उठून दिसेल याकडे लक्ष द्यावे लागते. मात्र, त्याच पुस्तकातील रेखांकने ही मर्यादित विषयांवर चितारलेली असतात. एखाद्या लेखाचे वा कथेचे रेखांकन हे दुसर्‍या लेखाला वा कथेला जोडून चालत नाही. त्याची निर्मिती ही मर्यादित विषयावर निश्चित असते. जरी ही दोनही कलाप्रकारांची गुणवैशिष्ट्ये भिन्न असली तरी, ती एकाच चित्रकाराने चितारलेली आहेत, हे त्यांच्या शैली व तंत्रांवरुन निश्चित ठरत असते आणि तीच घटना म्हणजे त्या चित्रकाराची ओळख असते. इतका सूक्ष्म विचार करणारे चित्रकार आणि अशा चित्रकारांचा सन्मान करणारे मान ठेवणारे साहित्यिक, पूर्वीच्या तुलनेने फार कमी होताना दिसतात.बाळ ठाकूरांच्या चित्रांकनातील त्यांच्या रेषा या सलग वा अखंड असतात. त्यांनी एकदा कुंचला वा पेन्सिल हातात धरली की, कुठे थांबायचं आहे, हे फक्त ‘त्या’ दोघांनाच माहिती असायचं, एक म्हणजे बाळ ठाकूरांची प्रतिभाशक्ती आणि त्यांच्या टोकदार बोटांनी पकडलेली पेन्सिल वा कुंचला. त्यामुळे त्यांच्या रेषा या खंडीत वा तुटक-तुटक नसायच्या. त्यांच्या अखंडीत रेषांमुळेच त्यांचा सुमारे ९२ वर्षांचा अखंड कलाप्रवास हा फार कमी कलाकारांच्या वाट्याला येणारा... जो त्यांना लाभला.




त्यांच्या कुंचल्याचं कोंदण ज्यांनी ज्यांनी अनुभवलं अशा प्रकाशक आणि लेखकांची नावे नुसती वाचली तरी अभिमानाने उर भरुन येतो. लक्ष्मीबाई टिळक, बा. सी. मर्ढेकर,बा. भ. बोरकर, माडगुळकर, शंकर पाटील, महेश एलकुंचवार, श्रीपु भागवत, ना. वि. काकतकर, अशोक शहाणे, सदानंद रेगे, चिं. त्र्यं. खानवलकर, बालकवी अशा साहित्य-इतिहास रचणार्‍या साहित्यिकांसह प्रकाशकांनीही त्यांची प्रकाशने-मासिके ही बाळ ठाकूरांच्या कुंचल्याने सुशोभित तर केलीच; परंतु, बाळसेदारही बनविली. विशेषतः ‘रहस्यरंजन’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘सा. विवेक’, ‘जाहिरनामा’, ‘बनगरवाडी’, ‘ललित’, ‘आत्मकथा’, ‘प्रतिबिंब’, ‘गणुराया’ अशा विविध साहित्यकृतींना, बाळ ठाकूरांनी सजविले.


 

 
त्यांनी विविध विचारसरणीच्या मासिक वा नियतकालिकांसाठी काम केले. परंतु, त्यांच्या रेषांनी आणि रंगांनी समस्त भिन्न विचारसरणीत आपले समर्पण होऊ दिले नाही. इतकं पातिव्रत्य त्यांच्या रंग-रेषांनी जपलं. त्यांच्या प्रयोगशील कलाखंडात म्हणजे जेव्हा ‘ऑफसेट प्रिंटिंग’ तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा, ‘स्क्रिन प्रिंटिंग’चा वापर करुन अद्भुत ‘रिझल्ट’ आणून मुखपृष्ठे साकारलीत. येथे राजा रविवर्मा यांनी ‘लिथोग्राफी’चा वापर करुन रंगीत ‘लिथोप्रींट्स’ जसे अद्भुततेने मिळविले त्या घटनेची आठवण होते. रंगीत वा पांढर्‍या पेपर्सवर बहुरंगी ‘स्क्रिन प्रिंटिंग’ घेऊन उत्तमोत्तम मुखपृष्ठे साकारण्याचं श्रेय बाळ ठाकूरांकडे जातं.आधुनिक तंत्रज्ञानाकडे सकारात्मकतेने पाहात त्यांनी म्हटले आहे, की या तंत्रज्ञानाने भलेही त्रास कमी होत असेल. मात्र, कलाकाराच्या कल्पनेपुढे आधुनिक तंत्रज्ञान हे जितका चांगला उपयोग करुन परिणाम मिळविता येईल तितके चांगलेच आहे. प्रचंड स्थिर विचाराचे नियमितपणा, सातत्य आणि अभ्यासूपणा यामुळे ते दीर्घायुष्यासह त्यांच्या कलाकार्यामुळे अजरामरच आहेत. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्रनिर्मिती कधीही केली नाही. अशा या राष्ट्राभिमानी चित्रकारांस विनम्र अभिवादन.


- प्रा. डॉ. गजानन शेपाळ


 

 
@@AUTHORINFO_V1@@