यवतमाळ : यवतमाळमध्ये एका २४ वर्षीय तरुणाने स्वतःचे असे एक स्वतंत्र्य हेलिकॉप्टर बनवण्याचा निर्णय घेतला आणि हे स्वप्न त्याने पूर्णत्वासही आणले होते. मात्र, चाचणीदरम्यान त्याच हेलिकॉप्टरचा पंख डोक्याला लागून मृत्यू झाला आणि त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. ही घटना आहे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी या गावातली. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम या तरुणाने स्वतःच्या हाताने कठोर परिश्रम करत हेलिकॉप्टर बनवले. महाराष्ट्रभर त्याच्या या कार्याची चर्चा झाली. मात्र, चाचणीदरम्यान त्याचा अंत झाला.
शेख इस्माईलने केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले होते. तसेच, तो एक पत्राकारागीर असल्याने तो लहान आकाराची कपाट, कुलर अशा वस्तू बनवायचा. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना सुचली. त्याने कठोर परिश्रम करत हेलिकॉप्टर बनवले देखील. या हेलिकॉप्टरची चाचणी तो घेत होता. यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्र देखील उपस्थित होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरू केले, हेलिकॉप्टर आकाशात झेपावू लागले. मात्र, असे होत असतानाच पंखे तुटले आणि काही कळण्याच्या आत होत्याचे नव्हते झाले. पंखा तुटून इब्राहिमच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.